एकनाथ शिंदेंचा इशारा, 'आनंद दिघेंबाबत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार, योग्यवेळी बोलेन' #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) आनंद दिघेंबाबत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार, योग्यवेळी बोलेन - शिंदे

"शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघेंबाबत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे, योग्यवेळी नक्की बोलेन," असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. एबीपी माझाने ही बातमी दिलीय.

एकनाथ शिंदे म्हणाले, "आणखी काही गोष्टी माझ्या आणि त्यांच्यातल्या आहेत. त्या मी आज सांगणार नाही. मात्र, जसं समोरून बोलणं होईल, तसं मलाही बोलावं लागेल. मलाही भूकंप करावा लागेल.

"धर्मवीरांच्या बाबतीत देखील जे-जे काही झालं आहे, सिनेमाचं फक्त तुम्हाला उदाहरण दिलं आहे. मात्र, प्रत्यक्ष जीवनात देखील ज्या काही घटना घडल्या आहेत. त्याचा मी साक्षीदार आहे. योग्यवेळी नक्की बोलेल."

यानंतर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंनी एकनाथ शिंदेंना उत्तर दिलंय.

"मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्याबाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार. मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?" असं उत्तर केदार दिघेंनी शिंदेंना दिलंय.

2) कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी संजय राऊतांवर गुन्हा दाखल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी मुंबईथील वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय कलम 507 अंतर्गत राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

या कथित ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती महिलेला शिवीगाळ करत असल्याचे ऐकू येते. ही व्यक्ती संजय राऊत असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केलाय.

वाकोला पोलीस ठाण्यात ज्या महिलेनं राऊतांविरोधात तक्रार दिली, त्या महिलेनं कथित ऑडिओ क्लिपही पोलिसांकडे सुपूर्द केलीय.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संजय राऊतांवर कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केलीय.

3) 'बुकर'विजेत्या गीतांजली श्री यांचा कार्यक्रम स्थगित

आंतराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या लेखिका गीतांजली श्री यांच्या सन्मानार्थ होणार असलेला कार्यक्रम आयोजकांनी शनिवारी (30 जुलै) स्थगित केला. कादंबरीमध्ये देवतांविषयी आक्षेपार्ह लेखन केल्याचा आरोप करून गीतांजली श्री यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

सांस्कृतिक संघटना 'रंगलीला' आणि आग्रा थिएटर क्लबने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

"बुकर पुरस्कार विजेत्या गीतांजली श्री यांच्या विरोधातील तक्रारीनंतर वाद निर्माण झाल्याने कार्यक्रम स्थगित करण्यात आला," अशी माहिती 'रंगलीला'च्या अनिल शुक्ला यांनी दिली.

"शादाबादमधील हाथरस येथील संदीप कुमार पाठक यांनी लेखिकेविरोधात तक्रार दाखल केली असून गीतांजली श्री यांनी शंकर आणि पार्वती या देवतांविषयी आक्षेपार्ह मत व्यक्त केल्याचा आरोप केला आहे," असंही ते म्हणाले.

4) उदारमतवादी लोकशाही मजबूत करण्यातच भारताचं भवितव्य - रघुराम राजन

उदारमतवादी लोकशाही मजबूत करण्यातच भारताचं भवितव्य असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ज्ञ रघुराम राजन यांनी व्यक्त केलं.

अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेसच्या पाचव्या संमेलनात ते बोलत होते. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये प्रोफेशनल काँग्रेसचं हे संमेल पार पडलं. एनडीटीव्हीनं ही बातमी दिलीय.

तसंच, रघुराम राजन पुढे म्हणाले की, देशातील अल्पसंख्याकांना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवण्याचे प्रयत्न देशाला विभागू शकतात.

देशात असं वातावरण असायला हवं, ज्यात प्रत्येक व्यक्तीला विकासाच्या संधी उपलब्ध असतील, असंही रघुराम राजन म्हणाले.

5) तीस्ता सेटलवाड, श्रीकुमार यांचा जामीन अर्ज गुजरात कोर्टानं फेटाळला

अहमदाबाद सेशन कोर्टानं सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड आणि माजी आयपीएस अधिकारी आरबी श्रीकुमार यांचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. द हिंदूनं ही बातमी दिलीय.

2002 च्या गोध्रा हत्याकांडानंतरच्या न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान खोटे कागदपत्र तयार केल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे.

सेटलवाड आणि श्रीकुमार यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी राजकीय पक्ष, तसंच परदेशातून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र तयार केल्याचाही आरोप करण्यात आलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)