आंब्याची गोष्ट : वात्स्यायनच्या कामसूत्रापासून तैमूरच्या द्वेषापर्यंत

फोटो स्रोत, ANI
- Author, अशोक पांडे
- Role, बीबीसी हिंदीसाठी
आंब्याशिवाय आपण भारतीय उन्हाळ्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. कितीही कडक उन पडल असूद्यात, कच्च्या कैऱ्यांनी लगडलेली आंब्याची झाडं आणि त्याच्या दाट पानांमध्ये लपलेली कोकिळ आपलं गाणं काही थांबवत नाही.
रोज सायंकाळी मावळणाऱ्या सूर्याच्या हलक्या पिवळसर किरणांचा रंग या कैऱ्यांमध्ये उतरणार असल्याचं कोकीळ त्याच्या गाण्यातून आपल्याला आश्वस्त करत असतो.
हे आंबे जेव्हा पिकतात तेव्हा त्यात सूर्याच्या मावळतीचा रंग उतरलेला असतो. तर कोकिळच्या आवाजातला गोडवा त्या आंब्याच्या रसात उतरलेला असतो.
आंबा भारताच्या म्हणी-लोककथा-कविता-कथांचा अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आंब्याच्या पहिल्या मोहोरापासून ते त्याच्या रसाळ चवीपर्यंतच वर्णन आपल्याला आपल्या साहित्यात आढळतं.
कैरीचं लोणंच, आमचूर, चटण्या, आंबा पोळी, आमरस, मुरांबा या गोष्टींशिवाय आपलं जेवणाचं ताट निरस वाटेल, इतकी आपल्याला या चवींची ओढ आहे.
बंगालचे नवाब मुर्शिद जफर खान यांनी 1704 मध्ये आपली राजधानी ढाका येथून मुर्शिदाबाद इथं हलवली होती.
आंब्याची विशेष आवड असलेल्या या नवाबाने आणि पुढं त्याच्या वंशजांनी पुढची अनेक दशके आपल्या बागांमध्ये आंब्याच्या अनेक नवीन जाती विकसित केल्या.
या नवाबांमध्ये एक होते नवाब हुसेन अली मिर्झा बहादूर. ज्यांनी आपल्या बागेत कोहे-तूर नावाचा आंबा लावला. पण या आंब्याची जात विकसित केली होती युनानी हकीम आगा मोहम्मद यांनी.

फोटो स्रोत, ANI
ही कोहे-तूर आंब्याची जात चविष्ट तर होतीच पण याचं फळ ही अगदी सुडौल होतं. हकीमसाहेबांनी आंब्याच्या मोसमात एक टोपली नवाबसाहेबांना भेट म्हणून दिली. आंब्याची चव चाखल्यानंतर नवाब साहेबांना या आंब्याचा मोह पडला. त्यांनी या जातीचं झाड हकीमसाहेबांना मागून आपल्या बगिच्यात लावायला सांगितलं. आणि संपूर्ण झाडाच्या बदल्यात त्यांनी हकीम आगा यांना दोन हजार रुपये दिले. पुढं ही कोहे-तूर आंब्याची जात नवाबांसाठी मर्यदित करण्यात आली.
ए ट्रीटीज ऑन मँगो
प्रबोधचंद्र नावाच्या एका बागायतदाराने दीडशे वर्षांपूर्वी, 1897 मध्ये 'अ ट्रीटाइज ऑन मँगो' हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकात आंब्यांची नोंद करण्यात आलीय. प्रबोधचंद्र हे मुर्शिदाबादच्या निजामत गार्डनचे अधीक्षक होते.
या महत्त्वाच्या पुस्तकात त्या काळातील मुर्शिदाबादमध्ये पिकणाऱ्या आंब्यांची तपशीलवार यादी आहे. त्यात अली बक्श, बिरा, बिजनौर सफ-दा, दो-अंटी, दुधिया, काला पहाड, खानम पसंद, नाजूक बदन अशा एकूण एकशे तीन प्रजातींचा उल्लेख आहे.
पुस्तकाच्या शेवटच्या भागात दरभंगा, जियागंज, बॉम्बे, गोवा, मद्रास, म्हैसूर, जयनगर आणि हाजीपूर या भागात पिकणाऱ्या आंब्याचा तर समावेश आहेच. पण या आंब्यांव्यतिरिक्त मालदामधील आंब्यांच्या सुमारे पन्नास प्रजातींची यादीही देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, ANI
मुर्शिदाबादच्या आंब्याच्या बागांशी निगडित एक ऐतिहासिक गोष्टही या पुस्तकात दिली आहे. 1757 च्या प्लासीच्या लढाईत रॉबर्ट क्लाइव्हच्या सैन्याने मुर्शिदाबादपासून तीस मैल दूर असलेल्या एका मोठ्या आंब्याच्या बागेत आपली छावणी टाकली होती.
लिखित साधनांचा विचार केला तर भारतीय उपखंडात गेल्या चार हजार वर्षांपासून आंबा खाल्ला जातोय. वाल्मिकी लिखित रामायणात सीतेच्या शोधात निघालेला हनुमान, रावणाच्या लंकेत असलेल्या अशोक वाटिकेच्या आम्र-कानन भागात पोहोचल्याचा उल्लेख आढळतो.
कामसूत्रातही आंब्याचा उल्लेख
आंब्याचा संदर्भ कुठं आढळत नाही म्हणून विचारा. गौतम बुद्धाच्या चमत्कारांपासून ते श्रीलंकेतील पट्टीनिहेलाच्या लोककथांपर्यंत आणि ज्योतिषाशास्त्रातील गणनेपासून ते अगदी वात्स्यायनाच्या कामसूत्रापर्यंत आंब्याचा उल्लेख आढळतो.
पट्टीनिहेलाच्या मते, आंब्याच्या फळातून सुंदर स्त्रिया जन्माला आल्या. कालिदासाच्या अर्ध्याअधिक उपमा तर आंबे आणि मोहोरांशिवाय पूर्णच होणार नाहीत.
वसंत ऋतूने पाच पुष्पबाण निर्माण केले आहेत. लाल कमळ, अशोकपुष्प, आम्रमंजरी, ताजीजुई आणि निळे कमळ हे मदनाचे पाच बाण आहेत. वसंताच्या पाच बाणांपैकी एक बाण आम्रमंजिरीचा असल्याचं कालिदास सांगतात.
ह्युएन संग आणि इब्न बाबुता यांच्या प्रवासवर्णनातही आंब्याचं वर्णन आढळतं.

फोटो स्रोत, ANI
अबुल फजलच्या 'आईने-अकबरी'मध्ये आंब्याचा उल्लेख आहे. अकबर आणि जहांगीरच्या कारकीर्दीत हुसेन नावाचा एक हकीम होता, ज्याच्या बागेत अनेक जातीचे आंबे असल्याचं या आईने-अकबरीमध्ये सांगितलंय.
त्याच्या या गुणवत्तेवर खूश होऊन अकबराने त्याला प्रथम आग्रा आणि नंतर बिहारचा राज्यपाल नेमलं होतं.
11 नंबर आंब्याची गोष्ट
सन 1539 मध्ये मुघल सम्राट हुमायूनचा पराभव केल्यानंतर शेरशाह सूरीने आपल्या आवडत्या आंब्याला चौसा या जागेचं नाव दिलं. या ठिकाणीच शेरशहाने युद्ध जिंकलं होतं.
भारतीय उपखंडाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, जनतेपासून सम्राटांपर्यंत आंबा हा सर्वांचाच लाडका विषय आहे. त्यामुळे प्रत्येक भागातल्या आंब्यामागे एखादी कथा असल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण राहत नाही.
1498 साली कलकत्त्यात उतरलेल्या पोर्तुगीज खलाश्यानी जेव्हा पहिल्यांदा आंब्याची चव चाखली तेव्हाच त्यांनी हे अनोख फळ जगभर नेण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, ANI
त्यामुळे सोळाव्या शतकात भारतीय आंबा ब्राझीलमध्ये पोहोचला होता. वेस्ट इंडिजमध्ये आंब्याची नंबर 11 ही विशिष्ट प्रजाती प्रसिद्ध आहे.
या नंबर 11 आंब्याची गोष्ट आहे 1782 सालातली. 1782 मध्ये जमैकाच्या किनार्याजवळ असलेल्या एक फ्रेंच जहाजावर ब्रिटिशांनी ताबा मिळवला. या जहाजात मसाले आणि आंबे भरलेले होते.
टॉमी ऍटकिन्स
या लोकांना लुटीत मिळालेली आंबे त्यांनी खाऊन त्याच्या कोयी जवळच असलेल्या चर्चच्या बागेत रुजवल्या. जे आंबे रुजले त्याला नंबर देण्यात आले.
त्या शेकडो रोपांपैकी फक्त एकच रोप जगलं. अशा प्रकारे 11 नंबरचा आकडा अस्तित्वात आला. त्यानंतरच्या शंभर वर्षांच्या काळात, आंब्याच्या सुमारे दोन डझन इतर प्रजाती भारतातून जमैकामध्ये नेण्यात आल्या.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटीश सैनिकांमध्ये टॉमी ऍटकिन्स हा शब्द लोकप्रिय झाला होता.

फोटो स्रोत, ANI
कोणत्याही सरासरी दिसणाऱ्या, असहाय आणि विनम्र अशा सैनिकाला या नावाने हाक मारली जायची. जेव्हा पहिलं महायुद्ध संपलं तेव्हा अमेरिकेतील फ्लोरिडात वाढणाऱ्या आंब्याच्या प्रजातीला टॉमी ऍटकिन्स असं नाव देण्यात आलं.
शेल्फ लाइफ जास्त असल्यामुळे या प्रजातीचा प्रसार झाला. आज युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या आंब्यांपैकी 80 टक्के आंबे टॉमी ऍटकिन्स जातीचे आहेत. किती निरस गोष्ट आहे बघा ना!
दीड हजाराहून अधिक प्रजाती
भारतात पिकणाऱ्या आंब्यांच्या नावांबाबत मात्र असं काही घडताना दिसत नाही.
आपल्याकडे सफेदा, चुस्की, दशहरी, कलमी, चौसा या स्थानिक नावांव्यतिरिक्त, काही हृदयस्पर्शी नाव देखील आढळतात. यात मधुदूत, मल्लिका, कामांग, तोतापरी, कोकिलवास, जर्दालू, कामवल्लभा ही नाव आहेत.
भारतात आंब्याच्या दीड हजारांहून जास्त प्रजाती आढळल्याचा अंदाज आहे. गेल्या अनेक शतकांपासून आपल्या देशात आंब्याच्या प्रजातींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आहे.

फोटो स्रोत, ANI
आपल्याकडे उपलब्ध असलेली भौगोलिक परिस्थिती, माती आणि हवामानाची विविधता यामुळे क्रॉस-ब्रीडिंग सोप होतं. आंब्याच्या बाबतीत जितकं मानवी श्रम आणि कौशल्य लागतं त्याहून जास्त द्यावं लागतं ते प्रेम.
दशहरी आंबे रोहिल्ले आणि लखनवी नवाबांच्या आश्रयाखाली वाढले. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी काकोरीजवळील दशहरी गावात मोहम्मद अन्सार जैदी यांच्या बागेत उगवलेल्या या आंब्याने लखनऊला एक वेगळी ओळख मिळवून दिली.
आंब्यावर शायरी
बनारस जसा लंगड्या आंब्यासाठी ओळखला जातो. तसंच उत्तर प्रदेशातील मेरठ-मुझफ्फरनगर आणि उत्तराखंडमधील रामनगर-हल्दवानी हे भाग गेल्या काही दशकांपासून त्यांच्या स्थानिक आंब्यासाठी ओळखले जातायत.
महाराष्ट्रातील रत्नागिरीतील हापूस, आंध्रमधील बैगनपल्ली आणि इमामपासंद आणि जुनागढमधील केसरशिवाय ही यादी अपूर्ण असेल.

फोटो स्रोत, ANI
आता जर आपण भारतात पिकणाऱ्या आंब्याची यादी बनवायची ठरवली तर ही यादी कधीच परिपूर्ण असणार नाही. कारण प्रत्येक वेळी कोणतं ना कोणतं नाव लिहायचं राहूनच जाईल.
आंब्यावर खरं प्रेम कोणी केलं असेल तर ते उर्दू कवींनी केलंय. मिर्झा गालिबचं आंब्यावर असणारं प्रेम आणि आंबा न खाणाऱ्यांची गाढवाशी बरोबरी केल्याचा किस्सा तर सर्वांनीच ऐकला असेल.
असं म्हणतात की उन्हाळ्याच्या दिवसांत मिर्झा गालिबचा जीर्ण वाडा दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि आंब्याच्या कोयांनी भरलेला असायचा.
शहरांमधील अंतर
आंब्याने नेहमीच लोकांमध्ये असणार नातं आणि मैत्री जपून ठेवली. ज्यांच्या घरी आंबे असायचे ते इतरांच्या घरी आंबे पाठवायचे. त्यांनी दिलेलं आदरातिथ्य फेडण्यासाठी इतर लोक पुन्हा त्यांच्याकडे आंबे पाठवायचे. हा स्नेह असाच चालायचा.
अकबर इलाहाबादी यांनी अल्लामा इक्बालसाठी आंबे पाठवल्याचा हा किस्सा आहे. अकबर अलाहाबादी यांच्याकडे होती दशहरी आंब्याची बाग, तर अल्लामा इक्बालकडे चौसा आंब्याची बाग होती. शहराशहरांमध्ये असणाऱ्या अंतराचा काही विशेष असा फरक पडायचा नाही.
आता हे आंबे पाठवायचे होते अलाहाबादहून लाहोरला. अंतर होतं साडेनऊशे किलोमीटर. त्याकाळी कच्चे रस्ते आणि दळणवळणाची साधनं फारच कमी होती. पण आंबे सुखरूप पोहोचले.

फोटो स्रोत, ANI
आंबे सुखरूप पोहोचल्यावर चाचांनी शेर लिहिला -
असर ये तेरे अन्फ़ासे मसीहाई का है अकबर,
इलाहाबाद से लंगड़ा चला लाहौर तक पहुंचा
याचा अर्थ असा की, तू या आंब्यावर कृपेचा जो मंत्र फुंकलायस, त्यामुळे आंबे खराब न होता आरामात योग्य त्या ठिकाणी पोहोचलेत.
हेच अकबर इलहाबादी आपल्या मित्राकडे निर्लज्जपणे आंबे मागायचे..
नामा न कोई यार का पैग़ाम भेजिए
इस फ़स्ल में जो भेजिए बस आम भेजिए
ऐसा ज़रूर हो कि उन्हें रख के खा सकूं
पुख़्ता अगरचे बीस तो दस ख़ाम भेजिए
मालूम ही है आप को बंदे का ऐडरेस
सीधे इलाहाबाद मिरे नाम भेजिए
चविष्ट आंबे
आंब्याचे खूप सारे प्रकार असताना देखील शायरीमध्ये एका नावाला मोठं स्थान मिळालं. तो आंबा म्हणजे लंगडा. कारण या शब्दाचे दोन अर्थ निघतात. त्यामुळेच तर सागर खय्यामी म्हणतात...
आम तेरी ये ख़ुश-नसीबी है
वर्ना लंगड़ों पे कौन मरता है
भारतीय इतिहासात, तैमूर लंगला त्याच्या पराक्रमामुळे कमी पण त्याच्या लंगड्या पायामुळे जास्त प्रसिद्धी मिळाली. लंगडा नाव असल्यामुळे तैमुर लंगने या आंब्याला आपल्या राजवाड्याची दार कायमची बंद केली होती. शायरीच्या भाषेत म्हणायचं झालं तर...

फोटो स्रोत, ANI
तैमूर ने कस्दन कभी लंगड़ा न मंगाया
लंगड़े के कभी सामने लंगड़ा नहीं आया
माझे जवळचे मित्र असगर अली फळांचे व्यापारी आहेत. आंब्याचा मोसम सुरू झाला की, ते मला तीन महिन्यांत जवळपास एकापेक्षा एक असे स्वादिष्ट आंबे आणून देतात. सुरुवातीला सफेदा आणतात, नंतर दोन-एक आठवड्यांनी कलमी आणतात.
त्यानंतर हा क्रम दशहरी, लंगडा, चौसा मार्गे आम्रपाली, तोतापुरी, बम्बइया आणि मल्लिकापर्यंत जाऊन पोहोचतो.
रंग, आकार, वास आणि चव
माझा आणखी एक मित्र, जो दरवर्षी लखनऊहून मला मलीहाबादी दशहरी आंब्याची पेटी पाठवून देतो. सोबत तो एक शेर सुद्धा लिहितो-
उठाएं लुत्फ़ वो बरसात में मसहरी के
जिन्होंने आम खिलाये हमें दशहरी के
खुद अपने लिए कोई आदमी इससे बड़ी दुआ क्या करेगा!
आंब्याचा रंग, आकार, वास आणि चव यापलीकडे जर तुम्हाला आंबा समजून घ्यायचा असेल तर जोशुआ कॅडिसन यांचं एक पुस्तक आहे,
'आंबा खाण्याच्या सतरा पद्धती'. खूपच सुंदर असं हे पुस्तक आहे.
या पुस्तकात जे. नावाच्या एका तरुणाची गोष्ट सुद्धा दिली आहे.

फोटो स्रोत, ANI
जे. नावाचा एक तरुण वनस्पतिशास्त्रज्ञ बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असतो. त्याची कंपनी आंबे पॅकिंग करण्यासाठी कारखाना सुरू करण्याचा विचारात असते. त्यासाठी कोणती कोणती तयारी करावी लागेल हे समजून घेण्यासाठी कंपनी जे. ला एका दुर्गम अशा बेटावर पाठवते.
त्या बेटावर जे. एका साधूला भेटतो. हा साधू जे. ला आंब्यांच्या आधारे जीवनाचा खरा अर्थ सांगतो.
पुस्तकाच्या एका भागात साधू त्याला आंब्याची चव घ्यायला सांगतात. साधू जे. ला सांगतो की आंबा ज्या गोष्टीपासून बनतो... मोहोर, झाडाचे खोड, पाने, मुळे, माती, सूर्य आणि उष्णता या सर्व गोष्टींचा आस्वाद तू घ्यायला हवास.
जे. डोळे बंद करून साधूने सांगितलेल्या गोष्टींचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्यात साधू त्याला म्हणतात,
"आता आंबा नेमका जिथे संपतोय तिथून आकाश सुरू होतंय त्याचाही अनुभव घे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








