आषाढी एकादशी : वारकऱ्यांसाठी विठ्ठलच माय, बाप, बहिण, भाऊ का आहे, हे मला आता उमगलं - ब्लॉग

पंढरपूर, वारी

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

    • Author, मानसी देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी, पंढरपूरहून

याआधी वारीचं सलग वृत्तांकन करण्याची वेळ माझ्यावर आली नव्हती. देहू आणि आळंदीवरुन पालखीचं प्रस्थान एवढ्यापुरतं माझं वारीचं रिपोर्टिंग मर्यादित होतं. पालखी प्रस्थानाच्या दिवसाचं रिपोर्टिंग हे बऱ्यापैकी चालू घडामोडींवर केंद्रित असतं. वारकरी देहू-आळंदीमध्ये आले, दिंड्या आल्या, पालखी प्रस्थानाची तयारी सुरू आहे, पालखी प्रस्थान होतंय, वारकरी दर्शन घेताहेत आणि दिवस संपतो.

पण वारकऱ्यांचा पंढरपूरकडचा खरा प्रवास तर पुणे ओलांडल्यावर सुरू होतो. ज्याला वारीतला दिनक्रम म्हणतात तो खऱ्या अर्थाने पुणे शहरातला मुक्काम हलल्यावर सुरू होतो. तो टप्पा मी ऐकून होते. इतरांच्या वार्तांकनामधून बघून होते. पण स्वतः अनुभवायची संधी मलाही मिळाली.

गेली दोन वर्षं कोरोनामुळे पायी आषाढी वारी झाली नाही आणि यावर्षी आषाढी वारीचे सुरुवातीचे दिवस हे राज्यातल्या राजकीय नाट्याने झाकोळले गेले. पण शेवटच्या आठवड्यात तरी वारीचं व्यवस्थित वार्तांकन करायचं असं आम्ही ठरवलं आणि मी कॅमेरा पर्सन नितीन नगरकर आणि गाडीचे चालक राजूदादांसोबत पुण्याहून अकलूजकडे प्रस्थान केलं.

वारकऱ्यांची भक्ती, त्यांचा पंढरपूरपर्यंत चालत जाण्याचा निर्धार आणि विठ्ठलावरचं निस्सीम प्रेम याविषयी ऐकून होते. वाचलं होतं. वारकऱ्यांसाठी सगळी नाती गोती म्हणजे विठ्ठलच आहे असं ऐकून होते. खरं सांगायचं तर असं खरंच असतं का याविषयी माझ्या मनात काही प्रश्न होते.

अजून बरंच कुतूहल होतं. पंढरपूरपर्यंत वारी कव्हर करताना काही उत्तरं शोधण्याता प्रयत्न करायचा मनात आलं.

पंढरपूर, वारी

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

पण पिराची कुरोली या गावाजवळ भेटलेल्या एका मावशींमुळे वारकरी विठ्ठलाला माऊली का मानतात हे नव्याने उमजलं. साधारणपणे पन्नाशीतल्या या मावशी कर्नाटकतल्या बेळगांव जिल्हातल्या होत्या. लहानपणीच एका पायाने अधू झाल्या होत्या.

त्यांनी सांगितलं की, मी वारी कधीच चुकवत नाही. विठ्ठलाविषयी त्यांच्या मनात इतकी श्रद्धा का आहे हे विचारलं तर त्यांना गहीवरुन आलं. त्यांच्या डोळ्याला अश्रूंच्या धाराच लागल्या. त्यांनी सांगतिलं, लहानपणी ताप येऊन एका पायानं त्या अधू झाल्या.

त्यांचं लग्न झालं पण त्या कधी सासरी गेल्याच नाहीत. माहेरी भावांच्या संसारात राहत होत्या. यासगळ्यांत विठ्ठलाचा आधार मिळाला. त्याची भक्ती जडली आणि आई-बाप-भाऊ-बहिण विठ्ठलच झाला असं त्या म्हणाल्या.

त्या विठ्ठलाच्या भेटीचं एक निमित्त म्हणजे वारी. वारीमध्ये सगळे पंढरपूरकडे जातात. तिथे लाखो लोकं एकाच भावनेनं एकत्र येतात. तेव्हा जाणवलं यामुळे कुठेतरी एक भावनिक सुरक्षितताही निर्माण होत असेल. ज्याला इंग्रजीमध्ये belongingness म्हणतात तो तयार होत असेल.

या मावशींसारखे लाखो वारकरी आहेत. ज्यांना विठ्ठलाविषयी आत्यंतिक जिव्हाळा वाटतो. त्यांची विठ्ठलाची भक्ती ही कर्मकांड स्वरूपातील नाही असं लक्षात आलं. त्यांची भक्ती हे विठ्ठलावरचं निस्सिम प्रेम आहे आणि आपल्यावरही त्या पांडूरंगाचं तेवढंच प्रेम आहे ही भावना त्यांच्या मनात असते.

त्यामुळे विठ्ठलाला हे चालणार नाही, ते चालणार नाही, विठ्ठलाला प्रसन्न करण्यासाठी खूप काही वेगळं करावं लागेल, तसं झालं नाही तर विठ्ठल आपल्यावर रागावेल हे सामान्य वारकऱ्यांच्या गावीही नसतं.

आपण जसं आहोत, तसं विठूमाऊली आपल्याला स्वीकारेल आणि काहीही झालं तरी आई आपल्या लेकरांवर जसं प्रेम करते तसं विठूमाऊली ही करेल हीच भावना सच्च्या वारकऱ्यांशी ठायी जाणवली. त्यामुळे वारकऱ्यांची भक्ती ही अत्यंत सहज सोपी मार्गाची आहे. त्यांची विठ्ठलावरची भक्ती हा माऊलीवरच्या प्रेमाचा आविष्कारच आहे. त्यामध्ये कर्मकांड दिसत नाही. दांभिकता जाणवत नाही.

पंढरपूर, वारी

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

म्हणूनच की काय, मासिक पाळी आली म्हणून महिला पंढरीची वाट सोडत नाहीत. विठ्ठलाच्या चरणी सगळं लिन आहे असं एका महिलेने मला सांगतिलं.

राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूराकडे येतात. एकमेकांशी बोलतात. एकमेकांसोबत राहतात. यातले बहूतांश हे शेतकरी, मजूर, गोर गरिब ग्रामीण भागातले स्त्री पुरुष रहिवासी असतात.

हा एक महिना सगळं मागे सारुन ते एकत्र येतात. वारी झाली परत 11 महिने संसाराच्या रहाटगाड्याकडे परत जातात. पण परत जातानाही मनात पुन्हा पुढच्या वारीची ओढ असते. हा एक महिना सगळ्या चिंता, जबाबदाऱ्या, वैर- वैमनस्य बाजूला सारुन एकत्र येण्याची संधी असते. यामुळे वारीविषयी भावनिक ओढ वाटणं साहजिक आहे.

पंढपूरपर्यंत पोहोचेपर्यंत काही प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. पण वारी हा काय काही दिवस कव्हर करुन सोडून देण्याचा विषय नाही असंही लक्षात आलं. वारीचं वार्तांकन हे म्हणजे फक्त चालू घडामोडींचं निरुपण नाही. मानवी जीवनाचा, स्वभावांचा अभ्यास आहे आणि ते काही एकाच वर्षी होणं शक्य नाही.

पंढरपूर, वारी

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

पंढरपुरच्याजवळ एका मोकळ्या शेतात, सातारा जिल्हातल्या एका दिंडीने आपला तळ ठोकला होता. मी तिथून जात असताना त्या दिंडीतले वारकरी तुकारामांचा खाली दिलेला एक अभंग प्रार्थनेच्या रुपात म्हणत होते. 5 दिवसांच्या वारीसोबतच्या प्रवासानंतर तुकोबांच्या या ओळींचा अर्थ नव्याने समजला.

विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान ।

विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥

विठ्ठल कुळींचें दैवत। विठ्ठल वित्त गोत ।

विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥

विठ्ठल विस्तारला जनीं । सप्त ही पाताळें भरूनी ।

विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥

विठ्ठल जीवाचा जिव्हाळा। विठ्ठल प्रेमाचा पुतळा।

लावियेलें चाळा । विश्व विठ्ठलें ॥

विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता । विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका ह्मणे आतां नाहीं दुसरें ॥

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)