देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंचा माईक काढून घेतला तेव्हा...

फोटो स्रोत, ANI
सोमवारी विधानसभेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारने बहुमत सिद्ध केलं. त्यानंतर नेत्यांच्या भाषणांनी दिवस रंगला. एकनाथ शिंदेंनी भाषणात अनेक रंजक किस्से सांगितले आणि चर्चेला भरपूर वाव दिला.
परवापर्यंत शिवसेनेबरोबर असलेल्या संतोष बांगर यांनी शिंदे गटात सोमवारी पहाटे प्रवेश केला. त्यामुळे सभागृहाच्या नाट्यमय घडामोडीत आणखी एक नोंद झाली.
पहिल्या दिवसानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एकनाथ शिंदेना प्रश्न विचारला की शिवसेनेचे नेते संतोष बांगर कोणत्या पक्षातून तुमच्या गटात आले आहेत? तेव्हा एकनाथ शिंदे गांगरले. त्यांना काय उत्तर द्यावे ते कळेना. ते म्हणाले, "कुठल्या म्हणजे? शिवसेनेतून आलेत ना." त्याचं हे उत्तर पूर्ण होण्याआधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडून माईक हिसकावून घेतला आणि हसत उत्तर दिलं, "ते शिवसेनेतून खऱ्या शिवसेनेत आले आहेत. आतापर्यंत ते चुकीच्या गटात होते."
उत्तर दिल्यानंतर त्यांनी माईक पुन्हा एकनाथ शिंदेंकडे दिला. मात्र तेव्हापर्यंत एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर प्रचंड अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती.
हा प्रसंग झाल्यानंतर पत्रकार परिषद पुढे गेली खरी पण या एका प्रसंगाने सरकारमध्ये कोणाचं वर्चस्व असणार हे स्पष्ट झालं.
असाच एक प्रसंग सरकारने बहुमत जिंकल्यानंतर झाला. एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर देवेंद्र फडणवीस भाषण करायला उभे राहिले. अत्यंत उत्साहात त्यांनी भाषणाला सुरुवात केली. तेवढ्यात शिंदेंनी त्यांना थोडंसं थांबवून अभिवादन करू का? असं इशाऱ्याने विचारलं. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी लगेच होकार भरला. एकनाथ शिंदेंनी सभागृहाला अभिवादन केलं.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सोनवारी सभागृहात भाषण केलं. तेव्हा त्यांनी त्यांच्या पेटाऱ्यातून अनेक किस्से सांगितले. शेवटी देवेंद्र फडणवीसांना डोक्याला हात मारावा लागला.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मीच दिला होता-फडणवीस
"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्र्रस्ताव सुद्धा मीच दिला होता. मी सरकारमध्ये नसेन, असेही ठरले होते. मात्र, केंद्रीय नेतृत्त्वाने आग्रह धरल्याने मी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला", असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपूर प्रेस क्लबतर्फे आयोजित 'मिट द प्रेस' कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस नागपूरला पोहोचले. तिथे त्यांचं जोरदार स्वागत झालं.
ते पुढे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अतिशय सुयोग्य निर्णय घेतला. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पदावर बसविले, त्या पक्षाचा आदेश माझ्यासाठी शीर्षस्थानी आहे".
"मी मुख्यमंत्री झालो नाही, याचे 'सामना'ला दु:ख होण्याचे कारण नाहीच. त्यामुळे त्यांनी उपहासात्मकच लिहिले आहे. उपहासाला उत्तर द्यायचे नसते", असा टोला त्यांनी हाणला.
"शिवसेनेत एक उठाव झाला. ते बंड नाही. त्यातून ते आमच्यासोबत आले आणि आम्ही त्यांना मदत केली. आम्ही म्हटले असते, तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळाले असते. पण, पदाची लालसा आम्हाला नव्हती. उलट शिवसेनेचाच मुख्यमंत्री करु, हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता", असं ते म्हणाले.
"आमची चिंता करू नका. आम्ही एकमेकांना देणारे आहोत, एकमेकांकडून घेणारे नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ठामपणे उभी राहणारी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. पारिवारिक वारसा हा उद्धव ठाकरे यांच्याकडे असला तरी वैचारिक वारसा सुद्धा महत्त्वाचा असतो. हा वैचारिक वारसा घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात आहेत", असं त्यांनी सांगितलं.
आणि मुख्यमंत्र्यांचं बोलणं ऐकून देवेंद्र यांनी डोक्याला हात लावला...
"मी आणि फडणवीस कधी भेटायचो हे आमच्याही लोकांना माहिती नव्हते. सगळे झोपल्यावर मी फडणवीसांना भेटायला जायचो आणि सगळे उठायच्या अगोदर परत यायचो," एकनाथ शिंदे असं म्हणताच देवेंद्र फडणवीसांनी डोक्याला हात लावला आणि सगळं उघड करू नका अशी म्हणायची वेळ फडणवीसांवर आली.
"फडणवीसांनी एकच शपथविधी होईल असं सांगितलं होतं आणि सगळं माहिती असल्याने ते खूश होते. पण आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार घेतला आहे. त्यांचा आणि आमचा अजेंडा सारखाच आहे. त्यांचे 115 आणि आमचे 50 असे मिळून 165 झाले. अजितदादा तुम्ही मगाशी म्हणालात की आम्ही निवडून येणार नाही. पण जे पूर्वी गेले ते विरोधी पक्षात गेले, हिंदुत्वाचा विरोध केला त्यांच्याकडे गेले. आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार कऱणाऱ्यांकडे गेलो आहे. त्यामुळे 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार," असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

फोटो स्रोत, Maharashtra Vidhan Sabha
भाषण करणं ही एक कला आहे. कसं बोलायचं, काय सांगायचं, काय नाही सांगायचं, कुठल्या शब्दांचा उपयोग करायचा, कुठे थांबायचं अशी सगळी कसरत असते. विधिमंडळातल्या भाषणाला औपचारिकतेची डूब असते. पण नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर पहिलंच भाषण खुसखुशीत तर होतंच पण या भाषणाने अनेक घटनांवरचा पडदा हटला.
मुख्यमंत्री शिंदेंच्या दिलखुलास बोलण्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुरुवातीला हसवलं, नंतर ते थोडे अस्वस्थ दिसले. नंतर तर त्यांच्यावर कपाळावर हात मारण्याची वेळ आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणादरम्यान अनेक किस्से सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले," राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने 42 आकडा ठरवला पण घेतल्या 44. राष्ट्रवादीने 43 घेतले. एवढं झालंय तरी आपली जागा निवडून येऊ शकते. बघितलं- साला आमचा दुसरा माणूस पडला."
मुख्यमंत्र्यांकडून अससंदीय शब्दाचा प्रयोग झाल्यानंतर सभागृहात हास्यकल्लोळ झाला. त्यांनी तात्काळ तालिका अध्यक्षांकडे शब्द मागे घेतो असं सांगितलं.
त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील म्हणाले, "मुख्यमंत्री महोदय तुम्ही शब्द मागे घेऊ नका. ते नॅचरल फ्लोमध्ये आहे. ते तसंच सुरू राहू द्या. जे नैसर्गिक आहे ते आपण केलं पाहिजे, त्यात अडथळा यायला नको," असं जयंत पाटील म्हणताच पुन्हा सभागृहात हशा पिकला. तुमच्या शेजाऱ्यांचा परिणाम होऊ देऊ नका असा टोलाही पाटलांनी लगावला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









