बच्चू कडू : शेतकरी, अपंगांचे 'कैवारी' की एक 'गद्दार' राजकारणी?

फोटो स्रोत, Bacchu Kadu
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
राज्यातील भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हे कुत्रे आसामला पाठवावेत, तिथे भटक्या कुत्र्यांचं मांस खाल्लं जातं, तिथे कुत्रे 8 ते 9 हजारांना विकले जातात, असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे.
भटक्या कुत्र्यांबाबत सुरु असलेल्या लक्षवेधीवर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, खरे तर भटक्या कुत्र्यावर सोप्पा इलाज आहे. पाळीव कुत्रे रस्त्यांवर येत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याच्यावर समिती नेमण्यापेक्षा कृती योजना जाहीर करायला हवी. एखाद्या शहरात तसा प्रयोग करण्यात यावा.
"रस्त्यांवर असलेल्या भटक्या कुत्र्यांना उचलून आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये कुत्र्यांना किंमत आहे. आठ ते नऊ हजार रुपयांना कुत्रे विकले जातात. आम्ही गुवाहाटीला गेल्यावर तिथे कळलं, जसं आपल्याकडं बोकडाचं मांस खाल्लं जातं. तसे, तिकडे कुत्र्यांचं मांस खाल्लं जातं," असं बच्चू कडूंनी सांगितलं.
यामुळे बच्चू कडू यांच्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचा आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला आढावा...

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. चांदूरबाजार इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एका नेत्यानं स्वत:ला गळ्यापर्यंत जमिनीत गाडून घेतलं. बराच वेळ जमिनीखाली राहिल्यामुळे या नेत्याची तब्येत प्रचंड खालावली. पण, तो काही मागे हटायला तयार नव्हता. त्यावेळी अमरावतीचे काही पत्रकार आर.आर.पाटील यांच्या मंत्रालयातील कॅबिनमध्ये बसलेले होते. आर.आर.पाटलांनी या पत्रकारांना सांगितलं, काहीही करा पण त्या नेत्याला आंदोलन मागे घ्यायला सांगा. त्यानंतर मग पत्रकारांच्या विनंतीवरून या नेत्यानं आंदोलन मागे घेतलं.
पुढे याच नेत्यानं अनेकदा जीवाशी खेळून आंदोलनं केली आणि महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण केली. या नेत्याचं नाव आहे बच्चू कडू.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू (ओमप्रकाश बाबूराव कडू) यांचं नाव नेहमीच चर्चेत असतं.
त्यांच्या आंदोलनांची स्टाईल असो की सरकारी अधिकाऱ्याला केलेली मारहाण, बच्चू कडू या ना त्या कारणाने सतत चर्तेत असतात.
एकनाथ शिंदेंबरोबर बंड केलेल्या आमदारांमध्ये बच्चू कडू देखील होते. बच्चू कडूंचं हे वागणं अनेकांना न पटल्याचं सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमधून दिसून आलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
3 जुलैला महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाची निवड झाल्यानंतर बच्चू कडू यांनी फेसबुक ट्विटरवर एक व्हीडिओ पोस्ट केला.
या व्हीडिओच्या खाली आलेल्या कमेंटमध्ये अनेकांनी त्यांना 'गद्दार' असं संबोधलं आहे.

फोटो स्रोत, facebook/twitter
पण, बच्चू कडू यांनी मात्र नेहमीच स्वत:ला शेतकरी आणि अपंगांचा कैवारी म्हणून जनतेसमोर प्रेझेंट केलं आहे. किंबहुना त्यांची ही ओळख निर्माण होईल, अशी कार्यपद्धती अवलंबली आहे.
त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात आपण नेहमी कष्टकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं दिसून आलं आहे.
पण, आता मात्र त्यांच्यावर कठोर ठीका होत आहे. त्यामुळे बच्चू कडू नेमके कोण आहेत? त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास कसा राहिला? ते शेतकरी-अपंगांचे कैवारी आहेत की गद्दार राजकारणी आहेत, याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
एका घटनेपासून राजकीय प्रवासाची सुरुवात
बच्चू कडू शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील शेती करायचे. राजकारणापासून हे कुटुंब कोसो दूर होतं.
पण, एका घटनेपासून बच्चू कडू यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. बच्चू कडू यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी एबीपी माझाच्या कार्यक्रमात सविस्तर माहिती सांगितली होती.
ते म्हणाले होते, "1990-91 मध्ये कबड्डी खेळताना मित्राला रक्ताची उलटी झाली. त्याला मुंबईला दवाखान्यात न्यावं लागलं. तिथं मी पहिल्यांदा रक्तदान केलं. माझ्या मित्राचा जीव वाचला. त्यानंतर मग आजारी पडल्यावर मदतीसाठी अनेक जण माझ्याकडे यायला लागले. बिमार पडला तर बच्चू कडू, असं समीकरण त्यावेळी तयार झालं.
"त्याचदरम्यान निवडणूक लागली. आम्ही पन्नास-साठ जण बसलो होतो, तर विधानसभा लढायची ठरवलं. पण मग अर्ज भरायला गेलो तर पैसे नव्हते. तेव्हा कुणीतरी बातमी केली की, एक उमेदवार असाही ज्याच्याकडे अर्ज भरायला पैसे नाही! हे लोकांना माहिती झालं. त्यांनी वर्गणी केली आणि मग अर्ज भरला."

फोटो स्रोत, Bacchu kadu
बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक. त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा प्रचंड प्रभाव होता. त्यामुळे मग त्यांच्या सार्वजनिक राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेपासून झाली.
ते शिवसेनेचे चांदूरबाजार समितीचे सभापती झाले. सभापती असताना त्यांनी शौचालय घोटाळा उघडकीस आणला आणि तो प्रचंड गाजला. पुढे अपंगांना सायकल वाटप करण्यासाठी निधी न दिल्यामुळे त्यांचा शिवसेना नेत्यांशी वाद झाला आणि ते शिवसेनेतून बाहेर पडले.
बच्चू कडू यांनी 1999 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा थोड्या फरकानं पराभव झाला. 2004 साली लोकसभेची निवडणूकही त्यांनी लढवली आणि याहीवेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर काही महिन्यांनी आलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी बाजी मारली. आमदार झाल्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली.
2004 पासून सलग चारवेळा (2004, 2009, 2014 आणि 2019) ते अचलपूर मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत.
गरिबांचा कैवारी की गद्दार राजकारणी?
ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर यांनी बच्चू कडूंचा राजकीय प्रवास जवळून अनुभवला आहे.
ते सांगतात, "बच्चू कडू हे संघर्षातून, आंदोलनं करुन राजकारणात समोर आले. अपंग आणि शेतकरी बांधवांशी असलेली त्यांची आपुलकी निर्विवाद आहे. अचलपूर मतदारसंघातून सलग चारवेळा अपक्ष म्हणून निवडून येणं यावरून त्यांची लोकप्रियता कळते. ते त्यांच्या शोले स्टाईल आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत. लोकांना त्यांची ही शैली आवडते. हे झालं समाजकारणी म्हणून.
"पण जेव्हा तुम्ही बच्चू कडू यांच्याकडे एक आमदार किंवा राजकारणी म्हणून पाहता तेव्हा ते अत्यंत धोरणी, मुत्सद्दी आणि चाणाक्ष असल्याचं लक्षात येतं. आमदार म्हणून निवडून आल्यावर ज्यांचं सरकार आहे, त्यांच्यासोबत ते जातात. 2014 मध्ये ते भाजपच्या जवळ गेले, 2019ला उद्धव ठाकरेंच्या जवळ गेले. पण, जेव्हा उद्धव ठाकरेंचं आसन डळमळीत होतंय हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते एका क्षणात शिंदे गटात सामील झाले."
"अपक्ष आमदार म्हणून बच्चू कडू यांना त्यांच्या मर्यादा माहिती होत्या. त्यामुळे मग विद्यमान सत्ताधाऱ्याच्या मागे उभा राहून मतदारसंघासाठी अधिकाधिक निधी कसा मिळवायचा, असं त्यांचं धोरण आहे. त्यांची सध्याची भूमिका ही त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाला अनुकूलच आहे. कारण बच्चू कडू यांना इतर पक्षांप्रमाणे वैचारिक बांधिलकी किंवा राजकीय विचासरणी नाहीये," गजानन जानभोर पुढे सांगतात.

फोटो स्रोत, Bacchu kadu
मीडिया वॉचचे संपादक आणि अमरावतीचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश दुधे यांच्या मते, "बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेंच्या गटात जाण्याचा जो निर्णय घेतला, तो त्यांच्या चाहत्यांना दुखावणारा आहे. ज्या माणसाच्या आयुष्याची उभारणी प्रामाणिकपणाने झाली आणि त्याने आयुष्यभर ती जपली, अशा माणसानं बाजारू आमदारांसोबत जाणं हे अनेकांना चुकीचं वाटत आहे.
"त्यामुळे मग प्रामाणिक मूल्यांनी चालणारा माणूस अशी बच्चू कडूंची जी प्रतिमा होती, तिची मोठी हानी झाली आहे. आता त्यांना कदाचित मंत्रिपद मिळेलही. पण, त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या प्रतिमेचं दीर्घकालीन नुकसान झालं आहे."
अमरावतीस्थित लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार मोहन अटाळकर यांच्या मते, "बच्चू कडू यांची महत्त्वाकांक्षा मोठी आहे. त्यांना पक्षाचा विस्तार करायचा आहे. त्यामुळेच त्यांनी वर्धा, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये स्थानिक निवडणुका लढवून यश मिळवलं आहे. त्यांच्या अपेक्षांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे."
"गेल्या काही वर्षांमध्ये विदर्भात अपक्षांचा प्रभाव जास्त दिसतोय. रवी राणा, बच्चू कडू यांच्यावरून हे दिसून येतं. पण, सत्तास्थापनेच्या वेळी हे पक्ष तात्कालिक राजकीय हित लक्षात घेतात. त्यामुळे होणारा दूरगामी परिणाम विचारात घेत नाहीत. त्यामुळे मग काहीवेळेला फसगत होते. ही एकप्रकारची राजकीय अपरिपक्वता असते," अटाळकर पुढे सांगतात.
बच्चू कडूंनी मंत्रिपदाच्या अडीच वर्षांत काय केलं?
बच्चू कडू यांनी 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. त्याबदल्यात त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास अशी वेगवेगळ्या खात्यांचं राज्यमंत्रीपद त्यांना मिळालं. यावेळी रक्तदान करून त्यांनी मंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतला.
बच्चू कडू यांनी गेल्या वर्षांत त्यांच्या मतदारसंघात रोजगार मेळाव्यांचं आयोजन केलं. तसंच राहुटी या उपक्रमांतर्गत सरकारी यंत्रणा गावागावात नेत तेथील नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

फोटो स्रोत, Bacchu Kadu
बच्चू कडू यांची मंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षांतील कामगिरी कशी राहिली, असं विचारल्यावर अविनाश दुधे सांगतात, "राज्यमंत्रिपदाला मर्यादा असतात. गेल्या अडीच वर्षांत बच्चू कडूंना अकोल्यात काही भरीव कामगिरी करता आली नाही. उलट त्यांच्या मागेच चौकशीचा ससेमिरा लागला.
"त्यांच्या स्वत:च्या मतदारसंघासाठी त्यांनी मात्र राज्यमंत्रीपदाचा उपयोग करून घेतला. अचलपूर, चांदूर बाजार येथे सौंदर्यीकरणाचं काम केलं. येथील अकडून पडलेले सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावले."

फोटो स्रोत, Bacchu kadu
तर गजानन जानभोर यांच्या मते, "बच्चू कडू यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्री असताना अवाढव्य फी घेणाऱ्या शाळांवर अंकुश घालण्याचा प्रयत्न केला. मोठ्या शाळांनी पालकांना लुटू नये अशी यामागे त्यांची भूमिका होती. त्यांनी कोरोना काळात जिल्हा रुग्णालयात स्टिंग ऑपरेशनही केलं.
"पण असं असलं तरी अकोल्याचा पालकमंत्री म्हणून ते अकोल्याचा पाहिजे तसा विकास करू शकले नाही. प्रशासनावर जशी पाहिजे तशी पकड ते निर्माण करू शकले नाही, ही वस्तुस्थिती आहे."
आंदोलनांमुळे प्रसिद्धीच्या झोतात
बच्चू कडूंचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावात बेल्लोरा इथं झालं. त्यानंतर पुढील शिक्षण तालुका आणि अमरावतीच्या ठिकाणी झालं. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी पहिलं आंदोलनं केलं.
याविषयी सांगताना ते म्हणाले होते, "माझ्या गावात (बेल्लोरा) तमाशा आला होता. दहावीची परीक्षा होती. तितक्यात नाचगाण्याचा आवाज येत होता. तेव्हा मग आम्ही 40 किलोमीटर अंतरावर एसडीओंकडे गेलो. तिथंच थांबलो. दुसऱ्या दिवशी एसडीओ गावात आले, त्यांनी तमाशा बंद केला. पण तमासगिरांची उपासमार होऊ नये म्हणून आम्ही त्यांना वर्गणी करून गहू-तांदूळ घेऊन दिले. अशापद्धतीनं हे पहिलं आंदोलन यशस्वी झालं."

फोटो स्रोत, Bacchu kadu
यानंतर सुरू झालेली एक आगळ्यावेगळ्या आंदोलनांची परंपरा. बच्चू कडूंनी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं केली. आंदोलनांच्या स्टाईलसाठी ते ओखळले जाऊ लागले.
सरकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून केलेलं शोले स्टाईल आंदोलन, अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये साप सोडून केलेलं आंदोलन, शेतकऱ्यांच्या प्रश्नी, 'सीएम ते पीएम'च्या घरापर्यंत काढलेली आसूड यात्रा या आणि अशापद्धतीनं बच्चू कडूंनी आंदोलनं केली.
शेतकरी प्रश्नांवर केलेल्या आंदोलनात गनिमी कावा करत ते थेट गुजरातमध्ये पोहोचले होते. तसंच अपंगांच्या प्रश्नांसाठी त्यांनी दिल्ली येथे मोठे आंदोलन केले होते.
त्यांच्या आंदोलनाच्या स्टाईलविषयी ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर सांगतात, "बच्चू कडूंना त्यांच्या आंदोलनांच्या पद्धतीसाठी ओळखलं जातं. नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्याविरोधातही त्यांनी आंदोलनं केली आहेत. वनाधिकाऱ्याच्या घरातही त्यांनी साप सोडला आहे. याप्रकारच्या आंदोलनातून आपलं कार्यकर्तेपण आमदारापेक्षाही ठसठशीतपणे कसं समोर येईल, हा त्यांचा प्रयत्न असतो."
सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्यामुळे वादात
सरकारी अधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीमुळे बच्चू कडू अनेकदा वादात सापडले आहेत. 2016 मध्ये मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भा. र. गावित यांना मारहाण केली होती. याप्रकरणी त्यांना अटक झाली होती.
तर आताचं अलीकडचं उदाहरण म्हणजे 2021 मध्ये अकोला जिल्हा रूग्णालयातील मेसचा कारभार पाहून संताप आल्यानं बच्चू कडूंनी तिथल्या स्वयंपाक्याच्या कानशीलात लगावली होती.

फोटो स्रोत, Bacchu kadu
बच्चू कडूंनी आपल्या या वर्तनाविषयी स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं, "सगळ्याच अधिकाऱ्यांवर काही आमचा राग नाही. पण, जे मुद्दामहून खोडसाळपणा करतात. सामान्य लोकांना फसवतात. त्यांच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर एक थापड मारायला काय हरकत आहे? आम्ही थापडही हळू मारतो. कुणी कायदा पाळत असेल तर तो आम्हाला हातात घ्यायची गरज नाही."
बच्चू कडूंच्या या वर्तणुकीविषयी गजानन जानभोर सांगतात, "सरकारी अधिकारी सामान्य माणसाला खूप त्रास देतात. अशावेळी एखादा आमदार किंवा लोकप्रतिनिधी अशा अधिकाऱ्यांना अद्दल घडवतो हे पाहून लोकांना भारी वाटतं. यामुळेही बच्चू कडू अनेकांचे हीरो झालेत. पण, अशाप्रकारच्या मारहाणीचं समर्थन होऊ शकत नाही. सोबतच सरकारी अधिकाऱ्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करणं हेही योग्य होणार नाही."
बच्चू कडूंच्या या स्टाईलमुळे अधिकारी वर्गात एक धाक निर्माण झाला होता. पण याचा अर्थ त्यांनी केलेल्या मारहाणीचं कदापि समर्थन केलं जाऊ शकत नाही, असं मत अविनाश दुधे व्यक्त करतात.
मंत्रिपदाविषयी तेव्हा आणि आता...
बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या प्रहार पक्षाचे 2 आमदार आहेत. एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात जलसंधारण, कृषी किंवा ग्रामविकास विभागाचं कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी मागणी बच्चू कडूंनी केल्याचं माध्यमांमध्ये आलं आहे.
बच्चू कडूंची अशी मागणी आहे का? आणि त्यांच्यावर होणाऱ्या टीकेवर त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं बच्चू कडूंशी वारंवार संपर्क साधायचा प्रयत्न केला. पण, अद्याप संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, 2017 साली मंत्रिपदाविषयी बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं होतं, "मंत्री कुणाला व्हावं वाटत नाही? पण ते सन्मानानं व्हायला पाहिजे, गुलामीत राहून नाही. उद्या मंत्रिपद आलं तर आम्ही सांगू की आम्ही आमच्या पद्धतीनं जाऊ. तुमचे निर्णय घेऊन आम्ही डोक्यावर मंत्रिपद घेऊन नाही मिरवणार."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








