भरत गोगावले की सुनील प्रभू, कोणाचा व्हीप ग्राह्य धरला जाणार? पुढे काय होणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं विशेष अधिवेशन आज (3 जुलै) बोलावण्यात आलं. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. कुलाबा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे भाजप आमदार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदावर निवड झाली आहे.
पण, विधानसभेत अध्यक्षपदाची निवडणूक होत असताना काही रंजक गोष्टी समोर आल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
शिवसेनेकडून मतदानासाठी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी आपापाल्या बाजूने व्हीप काढले होते. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या व्हीपनुसार 16 आमदारांवर, तर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या व्हीपनुसार 39 आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
त्यामुळे बंडखोर आमदारांच्या बळावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली त्यांच्यावर टांगती तलवार अद्याप कायम असून या प्रकरणात पुढे काय होणार याची उत्सुकता अजूनही कायम आहे.
ठाकरे गटाकडून व्हिप
सर्वप्रथम ठाकरे गटाने नियुक्त केलेले प्रतोद सुनील प्रभू यांनी काल (2 जुलै) रात्री शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयामार्फत 3 लाईन व्हिप जारी केला.

यामधील आशयानुसार, विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलं आहे. शिवसेना पक्षाच्या सर्व विधानसभा सदस्यांनी संपूर्ण वेळ सभागृहात उपस्थित राहून साळवी यांना मतदान करावं, असा पक्षादेश व्हीपमधून देण्यात आला.
3 लाईन व्हीप हा गंभीर मानला जातो. याचा अर्थ साळवी यांना मतदान केलं नाही तर पक्षाविरोधात भूमिका घेतली म्हणून थेट अपात्रतेची कारवाई केली जाईल, असं शिवसेनेने म्हटलं.
एकनाथ शिंदे गटाकडूनही व्हीप जारी
शिंदेगट आणि फडणवीस यांच्यामार्फत राहुल नार्वेकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आल्यानंतर त्यांनीही यासंदर्भात व्हीप जारी केला.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात 3 जुलै रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नार्वेकर यांना मतदान देण्याबाबत पक्षादेश काढण्यात आला.

"हा व्हीप पक्षाच्या उर्वरित 16 आमदाराना देखील लागू असेल. व्हीपची प्रत ह्या सन्माननीय आमदार महोदयांना देखील पाठवण्यात आलेली आहे," असंही शिंदे गटानं यावेळी म्हटलं.
अधिवेशनात काय घडलं?
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सर्व आमदार सभागृहात दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम मंत्र्यांचा परिचय झाला. यानंतर अध्यक्षांच्या निवडणुकीबाबतचा विषय पटलावर ठेवण्यात आला.
राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदावर निवड करण्यासाठीचा प्रस्ताव शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यामार्फत भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी मांडला, तर महाविकास आघाडीच्या वतीने राजन साळवी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्याचा प्रस्ताव चेतन तुपे यांनी मांडला.

फोटो स्रोत, Mlscomputer
राहुल नार्वेकर यांची निवड करण्यासंदर्भात प्रस्तावाला सुरुवातीला आवाजी मतदानामार्फत मतदान झालं. याला 'होय'चे बहुमत आहे, असं झिरवळ यांनी सांगितलं. पण विरोधकांच्या मागणीनुसार पोल म्हणजेच शिरगणती करण्याचं झिरवळ यांनी जाहीर केलं.
शिरगणती म्हणजे प्रत्येक सदस्याला उभे राहून आपले नाव आणि अनुक्रमांक सांगून मतदान करावे लागेल, त्याप्रमाणे त्यांची नोंद घेण्यात येईल. मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी पाच मिनिटे सभागृहातील घंटा वाजवण्यात येईल, घंटा वाजल्यानंतर सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करण्यात येईल, अशी प्रक्रिया असल्याचं उपाध्यक्ष झिरवळ यांनी सांगितलं.
त्यानुसार सर्व आमदारांनी मतदान केलं. यामध्ये राहुल नार्वेकरांना 164 मतं, तर राजन साळवींना 107 मतं मिळाली.
उपाध्यक्षांकडून प्रभूंच्या पत्राची नोंद
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शिंदे गटाने शिवसेनेचा व्हीप मोडला आहे, याची आपण नोंद घ्यावी, हे रेकॉर्डवर घ्यावं, अशी मागणी केली.

यानंतर बोलताना झिरवळ म्हणाले, "अध्यक्षपद निवडीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यादरम्यान शिवसेना सदस्यांनी पक्षाच्या आदेशाविरुद्ध जाऊन मतदान केले, असे माझ्या निदर्शनास आले आहे. ही प्रक्रिया माझ्यासमोर असून पुढील शिवसेना सदस्यांना पक्षाच्या आदेशाविरुद्ध मतदान केल्याचं सिद्ध झालं आहे. याबद्दल व्हीडिओ शूटिंगही उपलब्ध आहे. माझे आदेश आहे की या सर्व सदस्यांचे पक्षाविरोधीचे मतदान रेकॉर्डवर घ्यावे आणि त्यांची नावे लिहून घ्यावीत."
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 164 मते प्राप्त झाल्याने भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार आमदार राहुल नार्वेकर विजयी झाल्याचं झिरवळ यांनी जाहीर केलं. यानंतर नार्वेकर यांना अध्यक्षस्थानी बसवण्यात आलं.
अध्यक्षांकडून गोगावलेंच्या पत्राची दखल
नार्वेकर अध्यक्षपदी स्थानापन्न झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सर्वांची भाषणे झाली. भाषणादरम्यान शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी 39 आमदारांनी व्हीप मोडल्याचा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या 16 आमदारांना आम्हीही अपात्रतेची नोटीस काढू शकतो, पण आम्ही आज तसे बोलणार नाही, असे सांगत व्हीपची चर्चा बाजूला ठेवूयात असे म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेले मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी यासंबंधित एक पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवलं.
सर्वांच्या भाषणानंतर अध्यक्ष नार्वेकर म्हणाले, "एक पत्र आलं आहे, त्याची आपण नोंद घ्यावी. शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांचे पत्र मला प्राप्त झाले आहे. त्याप्रमाणे शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या 16 सदस्यांनी पक्षादेशाविरुद्ध मतदान केलं आहे. त्याची नोंद मी घेतली आहे.
मतदानानंतर आदित्य ठाकरे सुनील प्रभू काय म्हणाले?
अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे नेते सुनील प्रभू म्हणाले, "या सदनात आमचा व्हिप झुगारून 39 आमदारांनी विरोधात मतदान केलं. यामुळे लोकशाहीची पायमल्ली झाली हे महाराष्ट्राची 13 कोटी जनता विसरणार नाही आणि इतिहासात याची नोंद घेतली जाईल."
"शिवसेना पक्षाच्यावतीने जो व्हीप दिला गेला त्याविरोधात 39 आमदारांनी मतदान केलं. हे आम्ही लेखापत्राद्वारे नोंदवलं आहे. सस्पेंशन करायला हवी ती सुनावणी 11 तारखेला होणार. शिवसेनेचा व्हीप जुगारला म्हणून आणि त्यासोबत अपात्रतेचीही केस आहे. न्याय आमच्या बाजूने होईल, असा आम्हाला विश्वास आहे.
पुढे काय होणार?
एकूणच शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून व्हीपचं उल्लंघन झाल्याने त्यांच्यापैकी एका गटावर कारवाई होणार, हे स्पष्ट आहे. पण नेमका कोणत्या प्रतोदांचा व्हीप या निवडणुकीसाठी ग्राह्य धरला जाईल, यावर सगळं अवलंबून आहे.
आगामी काळात याविषयी काय घडामोडी घडतात, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ही लढाई आता न्यायालयात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर याबाबत एबीपी माझाशी बोलताना विधिमंडळाचे माजी सचिव डॉ. अनंत कळसे म्हणाले, "यामध्ये एक मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. आजघडीला शिंदे गटाकडे विधिमंडळ पक्षातील दोन-तृतीयांश सदस्य आहेत. व्हीप हा विधिमंडळ पक्षाकडून जारी केला जातो. त्यामुळे आज तरी विधिमंडळ पक्षात शिंदे गटाचं पारडं जड आहे. तर मूळ शिवसेनेत जेमतेम 16 सदस्य राहिले आहेत. न्यायालय किंवा अध्यक्ष या प्रकरणाचा जेव्हा विचार करेल, तेव्हा हा आकडा नक्कीच लक्षात घेतील.
ते पुढे म्हणतात, "उपाध्यक्ष आणि अध्यक्ष दोघांनीही हे पत्र प्राप्त झालं आहे, असं म्हटलं आहे. त्यामध्ये त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. बहुमत चाचणीच्या आधी हा निर्णय होणं अपेक्षित आहे. पूर्वी अध्यक्षपद रिक्त असल्याने उपाध्यक्षांकडे याबाबतचे अधिकार आले होते. पण आता अध्यक्षपदी सदस्यांची निवड झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे यासंबंधित निर्णय घेण्याचे अधिकार गेले आहेत. म्हणून ते काय निर्णय घेतात, यावर सर्व काही अवलंबून आहे."
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते, "कोणत्याही तक्रारीनंतर त्याला प्रतितक्रार दाखल होते. तशा पद्धतीने शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांच्या व्हीपनंतर भरत गोगावले यांनी आपलं पत्र अध्यक्षांना पाठवून दिलं. कोर्टासमोर आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून सुरू आहे."
"आता ही लढाई कायदेशीर पातळीवर गेली आहे. 11 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे निश्चितपणे न्यायालयात काय होतं, त्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत," असं अभय देशपांडे म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








