'सांगलीतल्या म्हैसाळमधली एकाच कुटुंबातील 9 जणांची हत्या गुप्तधनासाठी?'

फोटो स्रोत, Sarfraj sanadi/bbc
काही दिवसांपूर्वी सांगलीतील म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील 9 जण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली होती.
डॉक्टर माणिक वनमोरे यांच्यावर प्रचंड कर्ज असल्याने आर्थिक विवंचनेतून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा गावात सुरू झाली. पण आता या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे.
ही आत्महत्या नसून खून असल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.
विषारी औषध घालून या कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती गेडाम यांनी दिली आहे.
गुप्तधनाच्या प्रकारातून हे हत्याकांड केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे, याप्रकरणी दोघा मांत्रिकांना अटक करण्यात आल्याचं अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
काय आहे प्रकरण?
हॉटेल राजधानी कॉर्नर परिसरातील घरामध्ये कुटुंबप्रमुख पशु वैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा वनमोरे, त्यांची पत्नी रेखा माणिक वनमोरे, आई आकताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे, मुलगा आदित्य माणिक वनमोरे, पुतण्या शुभम पोपट वनमोरे या 6 जणांचे मृतदेह आढळले होते.
तर चौंडजे मळा येथील घरात डॉ. माणिक यांचे शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, पत्नी संगीता पोपट वनमोरे, मुलगी अर्चना पोपट वनमोरे या 3 जणांचे मृतदेह आढळून आले होते.

फोटो स्रोत, Sarfraj sanadi/bbc
या घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली.
ही घटना 20 जूनला घडली होती.
मिरजेच्या शासकीय रुग्णालयात सर्व मृतदेहांचं शवविच्छेदन सुरू असून नेमकं या 9 जणांच्या मृत्यूचं कारण समोर येईल, असं पोलिसांनी म्हटलं होतं.
तपासात पोलिसांच्या हाती एक चिठ्ठी लागली होती. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला. या चिठ्ठीमध्ये काही व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याचं समोर आलं.
या चिठ्ठीवरून वनमोरे कुटुंबीयांनी सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये वनमोरे कुटुंबीयांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे 25 सावकारांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी आतापर्यंत 18 जणांना अटक देखील केली आहे
मात्र घटनास्थळी,ज्या पद्धतीने मृतदेह आढळले होते आणि इतर काही गोष्टींमुळे हे नेमकी आत्महत्याच आहे की घातपात आहे असा देखील संशय व्यक्त करण्यात आला होता.
यादृष्टीने तपासासाठी एक विशेष पथक नियुक्त करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी त्यावेळी सांगितलं होतं.
तपासानंतर या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली. धक्कादायक माहिती म्हणजे गुप्तधनाच्या गुप्तधनाच्या लालसेपोटी वनमोरे कुटुंबीयांचे हत्या करण्यात आल्याचं समोर आले आहे.
मांत्रिक धीरज चंद्रकांत सुरवशे (वय 39 वर्षे) आणि अब्बास मोहम्मद अली बागवान (वय 48 वर्षे) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








