'एकनाथ शिंदेंचे बंड आनंद दिघेंना कधीच आवडले नसतं'

"आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे... बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही."
आनंद दिघेंचा वैचारिक वारसा सांगणारे एकनाथ शिंदे हे तीसहून अधिक आमदार सोबत घेऊन गुवाहाटीत बसले आहेत. ती वारंवार सांगत आहेत की आमची बांधिलकी ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या विचारांशी आहे.
आमची बांधिलकी हिंदुत्वाशी आहे असं ते सांगत आहेत. पण एकनाथ शिंदेंचे कृत्य हे आनंद दिघेंना कधीच आवडले नसतं, असं आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना वाटतं.
केदार दिघे हे ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि शिवसैनिक देखील आहेत. शिवसेनेनं नेहमीच कठीण परिस्थितीवर मात केली आहे आणि यावेळी देखील असेच होईल, असा विश्वास त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला.
एकनाथ शिंदेंचे बंड
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाराष्ट्राचं राजकीय वातावरणच ढवळून काढलं आहे. एकनाथ शिंदे हे उद्धव यांचे निकटवर्तीयच नाही तर कट्टर शिवसैनिक मानले जातात. त्यामुळे या बंडांच्या बातमीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

फोटो स्रोत, FACEBOOK
आधी राज्यसभेच्या निवडणुकीत आणि नंतर विधान परिषदेत महाविकास आघाडीला मिळालेल्या धक्क्यानंतर सावरण्याचा वेळ मिळतो न मिळतो तोच एकनाथ शिंदेंचा फोन नॉट रिचेबल आला.
सकाळ उजाडयाच्या आत बातम्या पसरल्या की एकनाथ शिंदे सुरतमध्ये आहे. त्यांच्यासोबत 11 आमदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक ठेवलेली असतानाच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या मनसुब्यांचे तीन तेरा वाजवले.
पुन्हा बातम्या येऊ लागल्या की एकनाथ शिंदेंसोबत 11 नाही तर 20 हून अधिक आमदार आहेत नंतर तो आकडा 30 च्या पार गेला. सुरतहून शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुवाहाटीत पोहोचले. तिथे पोहोचल्यावर एकनाथ शिंदेंनी आणखी एक धक्का दिला. ते म्हणाले, आमच्यासोबत 31 नाही तर 40-41 आमदार आहेत.
आनंद दिघे यांच्या काळातही मतभेद होते पण...
एकनाथ शिंदे हे सातत्याने आनंद दिघेंचे नाव घेत आहेत याकडे तुम्ही कसं पाहता असं विचारलं असता केदार दिघे सांगतात, की आनंद दिघेंनी त्यांच्या या कृत्याला कधीच मान्यता दिली नसती.

फोटो स्रोत, Facebook
"आनंद दिघेंच्या काळात हे मतभेद नव्हते का? नक्कीच होते पण त्यासाठी पूर्ण पक्षाला वेठीस धरणे, आपसांत चर्चा न करता दुसऱ्या राज्यात निघून जाणे हे मार्ग त्यांनी कधीच स्वीकारलं नसतं. आपलं म्हणणं पक्षप्रमुखासमोर मांडून त्यावर तोडगा काढता आला असता पण एकनाथजींनी हा मार्ग निवडला. हे अयोग्य आहे," असं ते सांगतात.
ठाण्यातील शिवसैनिक हा शिवसेनेच्याच बाजूने
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेकांच्या मनात हा प्रश्न येत आहे की अशावेळी ठाण्यातल्या शिवसैनिकांना काय वाटतं यावर केदार दिघे सांगतात, शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच सत्तेत आला आहे.

फोटो स्रोत, Kedar Dighe - Facebook
"पक्षशिस्त ही संघटनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे सामान्य शिवसैनिकालाही वाटतं त्यामुळे ठाण्यातील शिवसैनिक देखील शिवसेनेच्याच बाजूने आहेत. सध्या ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्या अत्यंत दुर्दैवी आहेत," असं दिघे सांगतात.
शिंदेसमर्थक आमदार
1- प्रताप सरनाईक (माजिवडा, ठाणे)
2- श्रीनिवास वनगा (पालघर)
3- अनिल बाबर (खानापूर)
4- नितिन देशमुख (अकोला)
5-लता सोनवणे (चोपडा)
6- यामिनी जाधव (भायखळा)
7- संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)
8- महेंद्र दळवी (अलिबाग)
9- भारत गोगवले (महाड)
10.प्रकाश सर्वे (मागाठणे)
11.सुहास कांदे (नांदगाव)
12. बच्चू कडू , प्रहार पार्टी (अचलपूर)
13- नरेन्द्र बोंडेकर, अपक्ष (भंडारा)
14- संजय गायकवाड (बुलडाणा)
15- संजय रायमूलकर (मेहेकर)
16-बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर)
17- रमेश बोरनारे (वैजापूर)
18- चिमणराव पाटील (एरंडोल)
19- किशोर पाटील (पाचोरा)
20-नितीनकुमार तळे (बाळापूर)
21-संदीपान बुमरे (पैठण)
22-महेंद्र थोरवे (कर्जत)
23-शंभूराजे देसाई (पाटण)
24- शहाजी पवार
25- तानाजी सावंत (परांडा)
26- शांताराम मोरे (भिवंडी)
27-विश्वनाथ भोईर (कल्याण)
28- शहाजी पाटील (सांगोला)
29-प्रदीप जैसवाल (औरंगाबाद मध्य)
30-किशोर पाटील
31-उदयसिंह राजपूत
32-महेश शिंदे (कोरेगाव)
33-ज्ञानराज चौगुले (उमरगा)
34- राजकुमार पटेल
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








