'आनंद दिघेंचा पुतण्या असूनही शिवसेनेनं माझ्यावर अन्याय केलाय'

फोटो स्रोत, Kedar Dighe - Facebook
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
'शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या हत्येसाठी बाळासाहेब ठाकरे जबाबदार होते,' असा आरोप काँग्रेस नेते निलेश राणे यांनी केला आहे. यानंतर या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.
केदार दिघे (38) हे आनंद दिघेंचे पुतणे आहेत. त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी आनंद दिघेंना अग्नी दिला होता. सध्या ते ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान चालवतात.
आनंद दिघेंच्या मृत्यूप्रकरणी झालेल्या आरोप-प्रत्यारोपांसदर्भात आम्ही त्यांच्याशी बातचीत केली.
प्रश्न - आनंद दिघेंच्या मृत्यूला बाळासाहेब जबाबदार होते, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. याबद्दल काय सांगाल?
दिघे साहेबांचा 26 ऑगस्ट 2001ला मृत्यू झाला. 2001 ते 2018 या कालावधीत महाराष्ट्रामध्ये अनेक निवडणुका झाल्या. प्रत्येक निवडणुकीत दिघे साहेबांच्या मृत्यूचा विषय बाहेर आला आणि निवडणूक संपल्यानंतर तो विषय संपला. त्याबाबतीत कोणीच वाच्यता केली नाही.
जर का निलेश राणेंकडे दिघे साहेबांच्या मृत्यूसंबंधीचे पुरावे असतील तर त्यांनी ते समोर आणावेत. मी दिघे साहेबांना अग्नी दिलाय. मी त्यांचा पुतण्या आहे. त्यामुळे सत्याच्या बाजूनं उभं राहणं माझं कर्तव्य आहे. ते मी पार पाडायला तयार आहे.
पण राणेंकडे पुरावे नसतील तर निवडणूक येत असताना नुसतं बोलू नये, शिवसैनिकांच्या भावनांशी खेळू नये.

फोटो स्रोत, Kedar Dighe/ Facebook
प्रश्न - दिघेंचा मृत्यू कसा झाला, याबद्दल काही आठवतं का?
त्या दिवशी साहेबांचं ऑपरेशन यशस्वी झालं आणि मी फ्रेश होण्यासाठी दुपारी दवाखान्यातून घरी आलो. मी रात्री परत दवाखान्यात जाणार होतो पण संध्याकाळी त्यांच्या मृत्यूची बातमी आली. ही बातमी सगळीकडे आग लागल्यासारखी पसरली. काय झालं, काय नाही झालं हे सांगण्यासाठी त्यावेळी मी दवाखान्यात नव्हतो. पण त्याच्यानंतर आजतागायत निलेश राणे म्हणतात तशी कोणती गोष्ट असेल, तर त्यांनी ती सिद्ध करावी.
मी 19व्या वर्षी दिघे साहेबांना अग्नी दिलाय.दिघे साहेबांना जो अग्नी मी दिलाय, त्याची आग आजदेखील माझ्या हृदयात आहे. माझ्या वडिलांना अग्नी दिल्यासारखा, पुत्राप्रमाणे मी त्यांना अग्नी दिलाय.
प्रश्न - बाळासाहेब आणि दिघे यांच्यात काही तणाव होता का?
या दोघांमध्ये काही तणाव असल्याचं माझ्यातरी ऐकण्यात आलं नव्हतं.

फोटो स्रोत, FACEBOOK
प्रश्न - दिघेंच्या मृत्यूनंतर ठाण्यातील शिवसेनेच्या राजकारणाबद्दल काय सांगाल? तुम्हाला राजकारणात यायची इच्छा आहे का?
मी राजकारणात होतो. 2006ला मी शिवसेनेत प्रवेश केला. तसंच धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान सुरू केलं. त्याद्वारे मी समाजकार्याला सुरुवात केली. 2013ला मला युवा सेनेचं निरीक्षक पद बहाल करण्यात आलं. 6 वर्षं सातत्यानं पक्षाचं काम करुनही शिवसेनेनं मला शहर निरीक्षक पद दिलं नाही, ग्रामीण दिलं गेलं. तिथं मग मी युवा सेनेची सगळी घडी व्यवस्थित बसवली. माझं वय आज 38 आहे, त्यामुळे युवासेनेच्या पदावर कार्यरत राहणं चुकीचं आहे असं मला वाटतं.
मुख्य प्रवाहात येण्यासाठी मी 2017ला त्या पदाचा राजीनामा दिला. पण नोव्हेंबर 2017 ते आजतागायत माझ्यावर कोणत्याही प्रकारची जबाबदारी शिवसेनेनं अथवा स्थानिक नेत्यांनी दिली नाही. म्हणजे आजही मी कार्यकर्ता म्हणूनच कार्यरत आहे.
प्रश्न - असं असल्यास तुमच्यावर अन्याय झाला असं वाटतं का?
नक्कीच. दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून मी कधीच वावरलो नाही. गेल्या 18 वर्षांत पक्षाकडे आमदारकी, खासदारीसुद्धा मागितली नाही. 2019 साठी मी शिवसेनेकडे ठाणे शहर या विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मागतोय. कारण गेल्या वेळी इथे भाजपचा उमेदवार जिंकला आहे. म्हणून उमेदवारी मागण्यात मला काही वावगं वाटत नाही. पण शिवसेनेकडून मला अजूनपर्यंत काहीच प्रतिसाद मिळालेला नाही.
प्रश्न - उमेदवारी मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत?
शिवसेनेनं मला जिल्ह्याचं एक साधं पद दिलं नाही किंवा मुख्य प्रवाहातही सामावून घेतलेलं नाही.
केदार दिघे तुम्ही आमच्याकडे या, असं आव्हान मध्यंतरी मनसेनं मला केलं होतं. पण मी तेव्हा काही निर्णय घेतला नाही. पण योग्य वेळेला योग्य तो निर्णय मी घेईल. पण 2019 मी नक्की लढवणार, कुणी उमेदवारी देवो अथवा न देवो.
स्थानिक नेत्यांची भूमिका काय?
ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्याशी आम्ही संपर्क साधला.
जिल्हा स्तरावरचं कोणतंही पद अद्यापर्यंत मला शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी दिलं नाही, असं केदार दिघे यांनी म्हटलं आहे, यावर नरेश म्हस्के सांगतात,
"त्यांचं तसं म्हणणं असेल, पण मी कशाला यावर प्रतिक्रिया देऊ? मी थोडेच पदं देणार आहे? मी देखील गेली 30 ते 35 वर्षं शिवसेनेसाठी काम करतोय. मी या बाबतीत काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








