सोनू निगम आणि ठाकरे कुटुंबाचा संबंध कधी आणि कसा आला?

निलेश राणे आणि सोनू निगम

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, निलेश राणे आणि सोनू निगम
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"बाळासाहेबांना सोनू निगमला ठार मारायचं होतं, अनेक वेळा त्याला ठार मारायचे प्रयत्न झाले, बाळासाहेबांच्या सांगण्यावरून सोनू निगमला मारण्यासाठी शिवसैनिक गेले होते. सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं काय नातं होतं हे मला सांगायला लावू नका," असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी केला आणि सर्वत्र चर्चा सुरू झाली.

नारायण राणे यांचे पुत्र निलेश यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणे यांना 'फालतू' असं संबोधलं आहे. तसंच राणे यांच्या आरोपांना उत्तर देण्याइतपत ते मोठे नाहीत, असंही म्हटलं आहे.

सोनू निगमच्या हत्येचा कट बाळासाहेबांनी रचल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. बीबीसी मराठीशी बोलताना विनायक राऊत यांनी हा आरोप फेटाळून लावला आणि म्हणाले की "निलेश राणेंचा त्यावेळी जन्म तरी झाला होता का?"

पण मुळात सोनू निगम आणि ठाकरे कुटुंबीयांचा संबंध कसा आला, हे आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला.

याबद्दल ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी सांगितलं, "सोनू निगमच्या संदर्भात निलेश राणेंनी बाळासाहेब ठाकरेंवर काही आरोप केले आहेत. हा तो काळ होता जेव्हा सोनू निगम पार्श्वगायक म्हणून समोर आला होता आणि बाळासाहेबांची सून म्हणजेच जयदेव ठाकरे यांची पत्नी स्मिता ठाकरे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं होतं. दोघांनीही हसीना मान जायेगी आणि इतर एक दोन चित्रपटांसाठी एकत्र काम केलं होतं. चित्रपट क्षेत्रात असल्यानं दोघंही एकमेकांच्या संपर्कात आले, अशी त्यावेळी कुजबूज होती. पण अशा कुजबूजीला काही अर्थ नसतो. कारण त्यातून काही निष्पन्न होत नाही."

निलेश राणेंच्या आरोपांवर बोलताना देसाई सांगतात, "कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर अशी जाहीरपणे निंदानालस्ती करणं योग्य नाही. निलेश राणेंनी हे आरोप केले कारण भाजपला राणे फॅमिलीचा निवडणुकीत फायदा करून घ्यायचा आहे. कारण भाजपच्या प्रचार समितीवर नारायण राणे आहेत. शिवाय भाजपनं शिवसेनेशी युती केलेलं नारायण राणेंना आवडणार नाही. कारण तसं झाल्यास भाजप फक्त एक हत्यार म्हणून आपला वापर करत राहील, असं त्यांना वाटत असावं."

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 20 सदस्यांची एक समिती तयार केली आहे. या समितीत खासदार नारायण राणे यांचा समावेश करण्यात आला आहे.

"नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत राणे आणि ठाकरे कुटुंबीयांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. यातून लोकांना भावनिक साद घालून या दोन्ही बाजूंनी आपापली राजकीय पोळी भाजून घेतली आहे. पण याप्रकारे वैयक्तिक आयुष्यावर आरोप करणं, मला तरी योग्य वाटत नाही," देसाई पुढे म्हणतात.

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, STRDEL

पत्रकार सुजाता आनंदन यांच्या मते, "बाळासाहेब ठाकरेंची सून स्मिता ठाकरे आणि गायक सोनू निगम यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. एका मुलाखतीसाठी स्मिता आणि सोनू हे दोघं अमिताभ बच्चन यांच्याकडे गेले होते. स्मिता ठाकरेंनी तेव्हा अमिताभ यांना विचारलं होतं की, तुम्ही माझ्या चित्रपटात काम कराल का?"

"काम करायचं की नाही हे मी चित्रपट पाहून ठरवेन, असं अमिताभ यांनी त्यांना सांगितलं होतं. स्मिता आणि सोनू या दोघांची चांगली मैत्री होती. यापलीकडे दोन्ही कुटुंबीयांमध्ये काही संबंध होते, असं मला वाटत नाही."

"निलेश राणेंनी जे आरोप का केले आहेत, त्याबद्दल मला अधिक काही माहिती नाही," सुजाता पुढे सांगतात.

IMDb या वेबसाईटवर जगभरातील चित्रपट, टीव्ही कार्यक्रम, व्हीडिओ यांची माहिती मिळते. या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, स्मिता ठाकरे यांनी सोसायटी काम से गई, कैसे कहें, सँडविच, हम जो कह ना पाये आणि हसीना मान जायेगी या 5 चित्रपटांची निर्मिती केली आहे.

सोनू आणि स्मिता एकमेकांबद्दल काय म्हणाले होते?

'जीना इसी का नाम है' या शोमध्ये एकदा सोनू निगम आले होते. तेव्हा हा शो सुरू असताना स्मिता ठाकरे यांनीही उपस्थिती नोंदवली होती. या शोचे होस्ट दिवंगत अभिनेते फारूक शेख होते.

तेव्हा सोनू निगमनं स्मिता यांच्याविषयी बोलताना म्हटलं होतं की, "स्मिता मला माझ्या कुटुंबासारख्या आहेत. 1997मध्ये आमची पहिल्यांदा भेट झाली होती. स्मिता यांच्या कुटुंबांला संपूर्ण देशभरात मान आहे, प्रतिष्ठा आहे. मलाही स्मिता यांच्याविषयी आदर आहे. आमच्या दोघांची मैत्री इतकी चांगली होती की, यांचं माझ्या कुटुंबाविषयीचं आणि माझं यांच्या मुलांविषयीचं प्रेम दिवसेंदिवस वाढत गेलं."

स्मिता ठाकरे

फोटो स्रोत, Smita Thackeray/FACEBOOK

यानंतर स्मिता यांनी सांगितलं होतं की, "मी पहिल्यांदा सोनू यांना एका शोमध्ये बघितलं. आशा भोसले आणि सोनू हे दोघंही एकाच स्टेजवर होते. जेव्हा मी यांचा परफॉरमन्स बघितला तेव्हा मला आश्चर्य वाटलं की, इतक्या कमी वयात हा किती छान परफॉर्म करत आहे. नंतर हा एक चांगला माणूस आहे हे माहिती झालं. माझ्या आणि सोनूच्या मैत्रीत तुम्ही मला सोनुची बहीण म्हणू शकता, मित्र म्हणू शकता, जवळची सहकारी म्हणू शकता, आईसुद्धा म्हणू शकता."

"सोनूचा विचार करण्याचा अंदाज खूपच वेगळा आहे. तुम्ही विचारही करू शकणार नाही की, इतक्या कमी वयात सोनू असा विचार करू शकतो. मला असं वाटतं की तो देवाच्या खूप जवळ आहे आणि देवाचा त्याच्यावर आशीर्वाद आहे," स्मिता यांनी पुढे म्हटलं होतं.

निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांबद्दल सोनू निगम यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे. पत्रकार परिषदेत हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी आधी चेहरा वेडावाकडा केला आणि नंतर स्मितहास्य करून उत्तर देणं टाळलं, अशी बातमी लोकसत्ताने दिली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)