बारावी निकाल : मुलगा, सून आणि वडील; तिघेही एकाच वेळेस झाले बारावीची परीक्षा पास

फोटो स्रोत, Samir Dehade
- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
चांगली गोष्ट करायची असेल तर त्याला वेळेची आणि वयाची मर्यादा नसते असं म्हटलं जातं. नाशिकच्या देहाडे कुटुंबीयांनी ही गोष्ट प्रत्यक्षात आणली आहे. आपला धाकटा मुलगा बारावीला आहे तेव्हा त्याच्यासोबत आपणही का बारावी करू नये, असा विचार लक्ष्मण देहाडे यांनी केला आणि त्यांनी परीक्षा दिली. त्याच बरोबर काही महिन्यांपूर्वीच घरी आलेल्या सुनेने देखील परीक्षा दिली आणि ती पास झाली.
अशा प्रकारे एकाच कुटुंबातील तीन जण बारावीच्या परीक्षेत पास झाले.
महाराष्ट्र राज्याचा बारावीचा निकाल बुधवार 8 जून रोजी जाहीर झाला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोकण विभाग प्रथमस्थानी आहे. तर उत्तीर्ण झालेल्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे.
4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली. यानंतर प्रतीक्षा होती ती निकालाची. बुधवारी हा निकाल जाहीर झाला. नाशिक जिल्ह्याचा एकूण निकाल 95.35 टक्के लागला आहे.
बारावीच्या परीक्षेला 1,60,610 विद्यार्थांनी परीक्षा दिली. या परीक्षेत त्रंबकेश्वर तालुक्यात देहाडे कुटुंबाचा समावेश होता. देहाडे कुटुंबाची सून ऋतिका तिचे सासरे लक्ष्मण, आणि दीर समीर या तिघांनीही बारावीची परीक्षा सोबत दिली आहे.
देहाडे कुटुंब नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आवटे येथे राहतात. या कुटुंबात एकूण पाच जण आहेत. कुटुंब प्रमुख लक्ष्मण देहाडे हे दहावी पास आहेत. तर त्यांचा एक मुलगा बीएसस्सीला आहे. तर एक मुलगा बारावीला आहे.

फोटो स्रोत, Pravin Thakre
त्यांच्या मोठ्या मुलाचं काही महिन्यापूर्वी लग्न झालं आहे. त्यांची सून दहावी शिकली होती. मात्र सुनेने सुद्धा आपल्या मुलांप्रमाणे उच्च शिक्षण घ्यावं अशी कुटुंबाची इच्छा होती. याबरोबर लक्ष्मण यांना सुद्धा अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती.
लक्ष्मण देहाडे यांनी वयाच्या 48 व्या वर्षी परीक्षा दिली. त्यांच्या धाकट्या मुलासह सुनबाईंनी बारावी दिली.
लक्ष्मण देहाडे म्हणाले की, "वय झाले किंवा वेळ गेली तरी परीक्षा देता येते हे मला माहिती होते. मला बारावी पास नसल्याची खंत तर होतीच, मनातून पास व्हायची इच्छाही हाती. माझा धाकटा मुलगा आणि सुनबाई बारावीच्या परीक्षेची तयारी करत होते. मुला बरोबर चर्चा झालेली, दोघांनी मला परीक्षा देण्यास सुचवलं, आणि उत्साहितही केलं. त्यानुसार मी फॉर्म भरुन परीक्षा दिली अन पासही झालो."

फोटो स्रोत, Pravin Thakre
दहाडे कुटुंबातील तीन सदस्यांनी सोबत परीक्षा दिली. यामध्ये ऋतिका हिने दाभाडे येथील परीक्षा केंद्रावर, सासरे लक्ष्मण यांनी कुडाळ येथील परीक्षा केंद्र आणि मुलगा समीर याने सामुंडी येथील कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर दिली होती.
निकाल जाहीर झाला असता सून ऋतिका हिला 50 टक्के, सासरे लक्ष्मण यांना 64.50 टक्के आणि मुलगा समीर याला 64 टक्के गुण मिळाले आहेत.
या निकालाने ग्रामीण भागातील सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या देहाडे कुटुंबात आनंदाचे वातावरण असून तर सर्वत्र या कुटुंबाचं कौतुक केलं जात आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









