कोकणात कातळशिल्पं कोरणारा माणूस कुठे राहायचा? पाहा फोटो

कोकणातल्या कातळावर दिसणारी ही शिल्पं कोणी कोरली असावीत याचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये ही अशी शिल्पं कोकणात हजारोंच्या संख्येने सापडत आहेत.

कोकणतल्या रत्नागिरी-राजापूर पट्ट्यात अचानक जमिनीतून वर यावीत तशी ही कातळशिल्पं गेल्या काही वर्षांत समोर आली आहेत. याअगोदर त्यांच्याकडे कोणा पुरातत्वशास्त्रज्ञाचं लक्ष का गेलं नाही हे एक कोडंच आहे. पण काही स्थानिक देवदेवतांचं स्वरूप घेऊन, तर बहुतांश सड्यांवरच्या मातीखाली दबली गेली होती.

मुळात ही कातळशिल्पं आहेत तरी काय? कोकणातल्या सड्यांवर, म्हणजे खडकाळ भूभागांवर, कोरलेली ही चित्रं आहेत. ती अनेक प्रकारची आहेत. त्यात प्राणी आहेत, पक्षी आहेत, मानवी आकृत्या आहेत, भौमितिक रचना आहेत, नुसतेच आकार आहेत. या चित्रांवरून लगेचच समजतं की अप्रगत मानवानं अगदी प्राथमिक टप्प्यात कोरलेली ही चित्रं आहेत. मानवी संस्कृतीच्या विकासाच्या प्रवासात अशा प्रकारची कोरलेली चित्रं जगाच्या अनेक प्रदेशांत सापडतात. काही अभ्यासक त्यांना 'खोदशिल्पं' असंही म्हणतात, तर इंग्रजीमध्ये त्यांना 'पेट्रोग्लिफ्स' असं म्हणतात.

2018 मध्ये 'बीबीसी मराठी'ची टीम पहिल्यांदा तिथं गेली होती. पण आता गेल्या चार वर्षांत नवं संशोधन, उत्खनन झालं आहे. काही उत्तरं मिळाली आहेत. आता पर्यंत या अज्ञात चित्रकाराबद्दल काय समजलं आहे, हे जाणून घेण्यासाठी सड्यांना पुन्हा एकदा भेट देण्यात आली.

महाराष्ट्र पुरातत्व संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे याबाबत सांगतात, आपण सुरुवातीला जो कालखंड कल्पना केला होता, त्यापेक्षा तो मोठा आहे. ऐतिहासिक काळातही हे कातळशिल्प निर्मिर्तीचं काम सुरु राहिलेलं आहे. ज्यावेळेस उत्तर कोकणात कान्हेरीसारखी लेणी खोदली जात होती, त्याच वेळेला दक्षिण कोकणात कातळशिल्पं पण खोदली गेली आहेत. म्हणजे थोडक्यात हा कालखंड 20 हजार वर्षं ते ख्रिस्तपूर्व दुसरं शतक इतका मोठा आहे

कोकणातल्या सड्यांवरच्या या कातळशिल्पांमध्ये प्राण्यांसोबत अनेक अगम्य आकार किंवा भौमितिक रचनाही पहायला मिळतात. यातल्या काही चित्रांचे आकारही अवाढव्य आहेत. काही चित्रं तर अगदी 50 फुटांहूनही अधिक लांबीची आहेत आणि काहींमध्ये असलेलं भौमितिक प्रमाणही तोंडात बोटं घालायला लावतं. म्हणजे या माणसाला भूमितीची जाण असावी का?

आश्चर्याची गोष्ट ही की या कातळशिल्पांमध्ये दिसणारे गेंडा, पाणघोडा यांच्यासारखे काही प्राणी हे कोकणात आढळतही नाहीत. मग या माणसानं ते पाहिले तरी कुठे? तो स्थलांतरित होता की त्या काळात हे प्राणी कोकणभागात होते? असे अनेक प्रश्न अभ्यासानंतर सुटणार आहेत.

भारतविद्या आणि कलाइतिहास अभ्यासक सायली पलांडे-दातार सांगतात, "जेव्हा आपण पुरातत्वशास्त्राच्या अंगानं बघतो तेव्हा आपल्याकडे उत्खननं केली जातात. त्यात आपण खोल खाली जाऊन सांस्कृतिक क्रम आहे तो शोधतो. इथे सडा आहे सगळीकडे. माती कुठेच नाही की जिच्यात मानवी अस्तित्वाच्या खुणा मिळतील. थोडीफार हत्यारं मिळाली आहेत, पण उत्खननात जे अन्डिस्टर्ब्ड लेयर्स मिळाल्या पाहिजेत, तसं इथे मिळत नाही. किमान शिल्पांच्या आसपास मिळत नाही. म्हणून आपल्याला इतर प्रकारच्या गोष्टी वापरायला लागत आहेत. त्यासाठी मी आर्ट हिस्टॉरिक मेथड्स वापरायचा प्रयत्न करते आहे.

ज्या चित्रपाशी आता आपण उभे आहोत त्याकडे बघतांना आपल्याला वाघासारखे दोन मोठे महाकाय प्राणी दिसतात आणि मधे तुम्हाला एक मानवी आकृती दिसते. त्यात जी सिमेट्री आहे ती त्यांनी विलक्षण साधलेली आहे. हे करणं जिकीरीचं काम आहे. त्यांनी आऊटलाईनवरुन तो एक उठाव दिलेला आहे. एम्बॉस केलेला आहे. आत वेगवेगळे भौमितिक आकार दिसतात. जो मूळचा वाघ आहे त्यामध्ये वेगळेपण आणण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे. यात माणसांचं आणि पशूंचा एक संबंध आपल्याला दिसतो आहे"

कोकणाच्या संपन्न समुद्रकिनाऱ्यावर कायम काहीतरी समृद्ध करणारं मिळालं आहे. अगदी नारळ-पोफळी-आंब्याच्या बागांपासून ते मराठी साहित्य समृद्ध करणा-या साहित्यिकांपर्यंत. आता ही कातळशिल्पं मानवी संस्कृतीच्या आतापर्यंत झालेल्या अभ्यासाला समृद्ध करणार आहेत.

कातळशिल्पं तयार करणारा माणूस कुठे राहायचा असा प्रश्न आल्यावर त्याकाळचा मानव गुहेत राहात असावा असा समज असतो. त्यामुळे या परिसरात कुठे गुहा आहेत का याचा शोध सुरू झाला. तो राहाण्याची ठिकाणं शोधली जाऊ लागली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळोशी येथे अशा प्रकारच्या गुहेचा शोध घेण्यात आला. शिल्पं कोरण्यासाठी या मानवानं कातळाची का निवड केली? त्यातून त्याला काय सांगायचं आहे याचा शोध घेणं सुरू आहे.

केळोशी येथील या गुहेत आदिम काळातली हजारो हत्यारं सापडली आहेत. त्यासाठी वापरलेले दगड जवळपासच्या नदीपात्रातूनच आणली असावीत असा अंदाज आहे. त्या काळात माणूस याच गुहांमध्ये बसून हत्यारं बनवत असावा असं तज्ज्ञांना वाटतं.

पुरातत्व अभ्यासक ऋत्विज आपटे यांनी आम्हाला याबाबत अधिक माहिती दिली.

ते म्हणाले, "दोन ठिकाणी आम्ही ट्रेन्चेस घेतल्या होत्या. त्या ट्रेन्चेसमध्येच आम्हाला खूप सारी दगडी हत्यारं मिळाली. जवळपास हजाराच्या संख्येनं दगडी हत्यारं मिळाली. त्यानंतर हे मटेरियल कुठनं आणलं असेल याचा आम्ही शोध सुरु केला. हे कोकणात मिळणारं मटेरियल नाही किंवा सिंधुदुर्गात मिळणारं मटेरियल नव्हतं. कुठं मिळतं ते? तर जिथे वॉटर बॉडी आहे, नाला आहे, नदी आहे अशा ठिकाणी मिळतात. त्याचा आम्ही शोध घेतला. दोन दोन किलोमीटर नदीपात्रातच मिळाला. तो आम्हाला असा अंदाज आला की हा माणूस तिकडनं दगडं उचलून या गुहेत आणायचा आणि गुहेत बसून तो दगडी हत्यारं बनवत होता. त्यामुळं याला पुष्टी मिळाली की ही हैबिटेशनल साईट होती. इथं माणूस राहिला होता बरीच वर्षं. आणि इथं बसून तो हत्यारं बनवत होता."

कोकणातल्या काही कातळशिल्पांजवळ चुंबकीय क्षेत्रातही काही बदल होत असावेत असं जाणवतं. होकायंत्रातली चुंबकीय सुची विचलित होत असल्याचं दिसतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)