शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं, महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही करू - संजय राऊत, #5मोठ्याबातम्या

शरद पवार आणि संजय राऊत

फोटो स्रोत, @SANJAYRAUT.OFFICIAL

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. शरद पवार आणि शिवसेनेने एकत्र यावं ही बाळासाहेबांची भूमिका होती - संजय राऊत

शिवसेना आणि शरद पवार यांनी एकत्र येण्याबाबत बाळासाहेब ठाकरे यांचीही भूमिका होती. शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावं, देशाचं नेतृत्त्व करावं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही करू, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.

पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान संजय राऊत यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी संजय राऊत यांना विचारण्यात आलं की महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेबांना आवडला असता का?

यावर ते म्हणाले, 'नक्की आवडला असता. मुळात बाळासाहेब असते तर त्यांची असं काही करायची हिंमत झाली नसती. बाळासाहेबांना ते चळाचळा कापायचे. मातोश्रीवर येण्याआधी दहावेळा विचार करायचे. आता परिस्थिती बदलली आहे असं नाही. पण आता शिवसेनेचे नेतृत्व टोकाचे सुसंस्कृत. पण आमच्यावर बाळासाहेबांचा प्रभाव आहे.'

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार

फोटो स्रोत, PHOTO BIOGRAPHY OF RAJ THACKERAY

तसंच पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत असंही म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशांचं नेतृत्त्व करावं आणि आम्ही महाराष्ट्राचं करू.

देशात विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची ताकद आणि क्षमता शरद पवार यांच्यात आहे. पण, मी पंतप्रधान पदाविषयी बोलत नाहीय, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि पंतप्रधानपदाचा विषय 2024 चा आहे. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

2. 'अक्षय कुमार इतिहास न वाचता बोलतो आणि कोट्यवधी कमवतो'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभिनेते अक्षय कुमार यांच्यावर तीव्र शब्दात टीका केलीय. अक्षय कुमारचा नवीन सिनेमा 'सम्राट पृथ्वीराज' प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुलाखत देत असताना अक्षय कुमारने वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या.

या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय कुमारवर निशाणा साधलाय. ते म्हणाले, "अक्षय कुमार इतिहास न वाचता बोलतो आणि कोट्यवधी कमवतो. पृथ्वीराज चौहान सर्वांना माहिती आहेत. इतिहासात त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे. ते कोण होते हे तुम्हाला माहिती नसले तर तुम्ही गुगल करा. पृथ्वीराज चौहान 26 वर्षांचे असताना घोड्यावर बसले आणि अक्षय कुमार 50 चा आहे."

जितेंद्र आव्हाड

फोटो स्रोत, FACEBOOK

अक्षय कुमारचा उल्लेख त्यांनी 'मूर्ख माणूस' असाही केला आहे. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय कुमारने 2011 साली इंधनांच्या वाढलेल्या किमतींवरून केलेलं ट्वीट सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केलं होतं.

मनमोहन सिंग यांचं सरकार असताना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींवर अक्षय कुमारने ट्वीट केलं होतं. 'पेट्रोलचे दर वाढण्याआधी मुंबईकरांनी पेट्रोलपंपावर रांगा लावल्या आहेत. त्यामुळे मला रात्री घरी जाण्यासही उशीर झाला.' हे ट्वीट समोर आणत जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय कुमारला काही प्रश्न विचारले होते.

"अक्षय, तू ट्वीटरवर सक्रिय नाहीस का? तू कार वापरणं बंद केलंस का? तू वर्तमानपत्र वाचत नाहीस का? तुझ्या माहितीसाठी सांगतो की देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत."

3. काश्मिरी पंडितांच्या परिस्थितीवर आमचं बारीक लक्ष - उद्धव ठाकरे

काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहिल आणि त्यांच्यासाठी जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करेन असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांना लक्ष्य केलं जात असल्याच्या घटना घडत आहेत.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

उद्धव ठाकरे यांनी काश्मीर खोऱ्यातील या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. "काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. त्यांना घरवापसीची स्वप्ने दाखविली गेली, पण घरवापसी तर दूरच उलट तेथील पंडितांना वेचून वेचून मारले जात आहे. या भयानक परिस्थितीत पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले, ही धक्कादायक तितकीच अस्वस्थ करणारी घटना आहे." असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

"महाराष्ट्राने कश्मिरी पंडितांसोबत कायमच संवेदनशील नाते जपले आहे. हे आम्ही आमचे कर्तव्य मानतो आणि कर्तव्य भावनेनेच त्याकडे पाहतो. सध्या खोऱ्यातील परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे. कश्मिरी पंडितांच्या नेत्यांशीही चर्चा सुरू आहे. त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल," असंही ते आपल्या निवेदनात म्हणाले होते. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

4. पंतप्रधानांनी रशिया-युक्रेन युद्ध तीन तास थांबवलं होतं - रविशंकर प्रसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध 3 तास थांबवलं होतं असा दावा भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.

भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून काढण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये तीन तास युद्धविराम झाला होता असा दावा रविशंकर प्रसाद यांनी केलं आहे.

रविशंकर प्रसाद

फोटो स्रोत, Getty Images

यापूर्वीही असा दावा करण्यात आला होता. केंद्र सरकारने हा दावा फेटाळला होता. 3 मार्च 2022 रोजी परराष्ट्र मंत्रालयान हा दावा फेटाळला होता. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

रविशंकर प्रसाद म्हणाले, युद्ध शिगेला पोहचले असताना ही घटना घडली होती. पंतप्रधानांनी नेत्यांना सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्यात येईल. त्यांनी केलेल्या चर्चेनंतर युद्ध तीन तास थांबवलं आणि विद्यार्थ्यांना परत आणलं.

5. 'बूस्टर डोस'साठी 'या' तिसऱ्या लसीकरण कंपनीला मान्यता

महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत बूस्टर डोस घेण्याविषयी जनजागृती केली जातेय. कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन लशींना भारतात लसीकरणासाठी मान्यता देण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच बूस्टर डोससाठी तिसऱ्या कंपनीला मान्यता देण्यात आली आहे.

लशींचे उत्पादक करणाऱ्या बॉयोलॉजिकल-ईच्या प्रोटीन सब युनीटकडून कोव्हिड-19 लस कॉर्बेवॅक्सला बूस्टर डोससाठी मान्यता मिळाली आहे. म्हणजेच ज्यांनी कोव्हिशिल्ड किंवा कोवॅक्सीन लशीचे दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांना (प्रौढांना) कॉर्बेवॅक्सीन बूस्टर डोस म्हणून घेता येणार आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलं आहे.

आतापर्यंत भारतात एकाच व्यक्तीने दोन वेगळ्या कंपनीच्या लशी घेण्यास परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे तिसरा डोस घेण्यासाठीही आधी जे वॅक्सीन घेतलं आहे तेच घ्यावं लागेल असं स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु आता आणखी एका कंपनीला लसीकरणासाठी मान्यता दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)