राज्यसभा : जेलमधले 2 आणि MIMचे 2 आमदार ठरवणार 6वा खासदार शिवसेनेचा की भाजपचा?

उद्धव ठाकरे आणि फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

येत्या 10 जूनला महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतांच्या संख्याबळानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक उमेदवार आणि भाजपचे 2 उमेदवार निवडून येऊ शकतात हे स्पष्ट आहे.

पण 6 व्या जागेसाठी शिवसेनेकडून दुसरा आणि भाजपकडून तिसरा उमेदवारही रिंगणात उतरवण्यात आला आहे. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांकडेही तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसं संख्याबळ नसल्याने छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून 29 आमदारांची मतं यामध्ये निर्णायक ठरणार आहेत.

ही मतं कोणती आहेत? कशामुळे या छोट्या पक्षांना आणि अपक्ष आमदारांना महत्त्व प्राप्त झाले आहे? याबाबतचा हा आढावा...

'ती' 29 महत्वाची मतं कोणती?

विधानसभेत 13 अपक्ष आमदार आहेत तर 16 छोट्या पक्षांचे आमदार आहेत. छोटे पक्ष कोणते आहेत?

बहुजन विकास आघाडी - 3

समाजवादी पार्टी - 2

एमआयएम - 2

प्रहार जनशक्ती पक्ष - 2

कम्युनिस्ट पक्ष - 1

स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1

मनसे - 1

राष्ट्रीय समाज पक्ष - 1

क्रांतीकारी शेतकरी पक्ष - 1

जनसुराज्य शक्ती - 1

शेतकरी कामगार पक्ष - 1

या पक्षांपैकी बहुजन विकास आघाडी (3), समाजवादी पक्ष (2) , प्रहार जनशक्ती पक्ष (2), स्वाभिमानी शेतकरी संघटना (1) ,शेकाप (1) ,क्रांतीकारी शेतकरी पक्ष (1), कम्युनिस्ट पक्ष (1) आणि 8 अपक्ष आमदार महाविकास आघाडीसोबत आहेत. महाविकास आघाडीकडे एकूण 169 आमदार आहेत.

भाजपबरोबर जनसुराज्य पक्ष (1), राष्ट्रीय समाज पक्ष (1) आणि 5 अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे भाजपकडे 113 आमदार आहेत.

महत्त्वाचं म्हणजे मनसे आणि एमआयएम या पक्षाचे तीन आमदार सत्तास्थापनेसाठी तटस्थ राहीले होते.

त्यात आता मनसेचा आमदार भाजपच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. त्याची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही.

शिवाय एमआयएमनं त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांची 2 मतं म्हणूनच निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

याआधी एमआयमनं औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेला अप्रत्यक्ष मदत केल्याचा इतिहास आहे.

मतांचं गणित कसं असेल?

मतांच्या सूत्रानुसार विधानसभेची एकूण सदस्य संख्या म्हणजे 287 ( एका आमदाराचं निधन झाल्यामुळे 287 सदस्य आहेत.) जागांना रिक्त जागांच्या संख्येत अधिक 1 म्हणजे 7 यांचा भागाकार करून येणारी कोटा हा 41.1 आहे.

शिवसेना, भाजप, विधानसभा निवडणूक

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

यानुसार राजकीय पक्षांकडून मतांचा कोटा साधारण 42 धरला जाईल. त्यामुळे राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 42 आमदारांच्या मतांची गरज असेल.

या मतांच्या सूत्रानुसार, भाजप - 113 मतांपैकी 84 मतांनी दोन खासदार सहजपणे निवडून येतील. त्यातून भाजपकडे 29 मतं शिल्लक राहतात. भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येण्यासाठी 13 अधिक मतांची गरज आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येकी एक उमेदवार दिल्यामुळे त्या दोन्ही जागा सहजपणे निवडून येऊ शकतील तर शिवसेनेचीही एक जागा सहजपणे निवडणूक येऊ शकते.

तिसर्‍या जागेसाठी, शिवसेनेकडे 13 मतं शिल्लक राहतात, कॉंग्रेसकडे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 12 मतं शिल्लक राहतात. त्याचबरोबर महाविकास आघाडीला 16 इतर पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा आहे. ही सर्व मतं जरी शिवसेनेच्या दुसर्‍या उमेदवाराला मिळाली तरी त्याची संख्या 28 असेल. मग शिवसेनेला अधिक 14 मतांची गरज असेल.

पण साधारणपणे अशा निवडणूकांमध्ये आमदारांची मतं बाद होणं किंवा इतर कारणांमुळे कोटा पूर्ण न होणं ही भीती असते म्हणून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला कोट्यापेक्षा काही मतं जास्त देण्यावर पक्षाचा भर असतो.

त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अधिकची किती मतं शिवसेनेला देऊ शकतील याबाबत निर्णय घेतला जाईल. भाजपमध्येही दोन सहजपणे निवडणूक येणाऱ्या उमेदवारांना काही अधिकची मतं देऊन सुरक्षित केलं जाण्याची शक्यता आहे.

मग तिसर्‍या उमेदवारासाठीचा विचार केला जाईल. त्यामुळे एकंदरीत सहावी जागा निवडून आणणं हे शिवसना आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी कठीण आणि चुरशीचं असेल.

'राष्ट्रवादी'चे दोन आमदार तुरुंगात, शिवसेनेच्या एकाचं निधन

अपक्ष कोणाला मतदान करणार याबद्दल सस्पेन्स असला आणि तिथेच घोडाबाजार होण्याची शक्यता असली तरीही काही राजकीय पक्षांना स्वत:च्याच हक्काची मतं मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

हे पक्ष आहे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना. कारण राष्ट्रवादीचे दोन आमदार हे तुरुंगात आहेत, तर शिवसेनेच्या एका आमदाराचं नुकतंच निधन झालं आहे.

माजी गृहमंत्री असलेले अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे दोघेही विधानसभेचे सदस्य आहेत. दोघेही सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करण्याच्या त्यांच्या अधिकारासाठी राष्ट्रवादीला कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर पवार म्हणाले की त्यांचा पक्ष वकीलांचा सल्ला घेतो आहे आणि त्यांच्यामार्फत कोर्टाकडून देशमुख आणि मलिक यांच्या मतदानाची परवानगी आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

अशीच स्थिती गेल्या विधानसभेत उद्भवली होती. तेव्हा छगन भुजबळ हे 'ईडी'च्या ताब्यात होते आणि आमदार रमेश कदम हे सुद्धा एक आरोपाखाली अटकेत होते. पण विधानसभेचे आमदार असल्यानं त्यांना मतदान करण्याची परवानगी तेव्हा न्यायालयानं दिली होती. त्याच अनुभवावर आता राष्ट्रवादी प्रत्येक मत महत्वाचं असलेल्या या निवडणुकीत त्यांच्या आमदारांसाठी न्यायालयात जाते आहे. पण देशमुख-मलिकांना मतदान करता येणार का हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

त्याचसोबत शिवसेनेचे अंधेरीचे आमदार रमेश लटके यांचं नुकतंच गेल्या महिन्यात निधन झालं. लटके दुबईमध्ये असतांना त्यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. इथं अद्याप पोटनिवडणुकही झाली नाही आहे. त्यामुळे शिवसेनेचा एक आकडा कमी झाला आहे.

"जे अद्याप आरोपी आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा शाबित झाला नाही त्यांच्या अधिकारासाठी न्यायालयात दाद मागता येईल आणि न्यायालय ठरवेल. कोणा सदस्याचा मृत्यू झाल्यामुळे जागा कमी झाली आहे, तर जेवढी सभागृहाची आता निवडणूक जाहीर होतांनाची संख्या आहे तीच गृहित धरली जाते. त्यानुसारच राज्यसभेच्या जागेसाठी आवश्यक मतांचं प्रमाण ठरतं," असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले.

घोडेबाजार होण्याची शक्यता?

राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षांना मतं दाखवावी लागतात. त्यामुळे सर्व आमदारांना 'व्हिप' (whip) लागू केला जातो. याचा अर्थ सर्व आमदारांना पक्षाचा आदेश पाळणं अनिवार्य असतं. अन्यथा त्या सदस्यावर पक्षाकडून कारवाई केली जाऊ शकते.

शिवसेना, भाजप, विधानसभा निवडणूक

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस

परंतु अपक्ष आमदारांना हा 'व्हिप' लागू होत नाही. त्यामुळे अपक्ष आणि छोटे पक्ष यांचं महत्व या निवडणुकीत अधिक वाढलं आहे. ही मतं खेचण्यासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान याबाबत विश्लेषण करताना सांगतात, "शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाकडून सहावा उमेदवार दिल्यामुळे आता मतांसाठी 'कांटे की टक्कर' आहे. त्यामुळे अपक्ष आणि इतर लहान पक्षांची मतं खेचण्यासाठी मोठा घोडेबाजार होऊ शकतो. 2010 साली विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे 3 उमेदवार निवडून येणार होते. पण इतर पक्षांची मतं फोडून कॉंग्रेसने चौथा उमेदवार निवडून आणला होता. तेव्हाही घोडेबाजार झाला होता. तसंच काहीसं चित्र या निवडणूकीत बघायला मिळू शकतं. "

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)