भंवरलाल जैन: दुसऱ्या धर्माचं समजून वृद्धाची मारहाण करून हत्या

मध्य प्रदेश व्हायरल व्हीडिओ

फोटो स्रोत, KAMLESH SARADA

    • Author, सलमान रावी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मानसिकरित्या संवेदनशील असलेल्या व्यक्तीला मारहाण करून जीवे मारून टाकण्याची घटना मध्यप्रदेशात घडली आहे. पीडित व्यक्तीला परधर्मीय असल्याच्या संशयातून मारहाण करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेसंदर्भातला व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

त्यानंतर या वृद्धाचा मृतदेह सापडल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

व्हीडिओत ज्या व्यक्तीला मारहाण झाली आहे, त्यांचं नाव भंवरलाल जैन आहे. ते रतलाम येथील सरसी स्टेशनअंतर्गत येणाऱ्या जावरा गावचे रहिवासी आहेत.

तर, "मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव दिनेश आहे, तो मनासा येथील रहिवासी आहे आणि भाजपच्या माजी नगरसेविकेचे तो पती आहेत," असं पोलिसांचं म्हणणं आहे.

याप्रकरणी आरोपी दिनेश कुशवाहा यांना अटक करण्यात आल्याचं नीमचचे पोलीस अधीक्षक सूरज कुमार वर्मा यांनी बीबीसीला सांगितलं.

भंवरलाल जैन यांचा मृतदेह मनसास्थित रामपुरा रोडच्या जवळ 19 मे रोजी सापडला होता.

सूरज वर्मा सांगतात, "आधी तर अज्ञात व्यक्ती समजून मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं. पण नंतर व्हायरल व्हीडिओ पाहून त्यांचे नातेवाईक नीमचला आले आणि त्यांची ओळख पटवली."

भंवरलाल जैन लहानपणापासून मानसिकरित्या आजारी असल्याचं त्यांचे भाचे विकास वहोरा सांगतात.

"कुटुंबीयांसोबत ते राजस्थानमधील चित्तौडगढ फिरायला गेले होते. तिथंच त्यांची आणि कुटुंबाची ताटातूट झाली. आम्ही त्यांना खूप शोधलं. पण ते सापडले नाही. मग आम्ही पोलिसांमध्ये ते हरवल्याची तक्रार दाखल केली," विकास पुढे सांगतात.

भंवरलाल जैन यांचे भाचे विकास वहोरा

फोटो स्रोत, KAMLESH SARADA

फोटो कॅप्शन, भंवरलाल जैन यांचे भाचे विकास वहोरा

एसपी सूरज कुमार वर्मा सांगतात की. भंवरलाल हरवल्याची तक्रार 16 मे रोजी दाखल करण्यात आली, तर मृतदेह 19 मे रोजी सापडला.

ते पुढे सांगतात, "व्हायरल व्हीडिओ नेमका कधीचा आहे, याचा तपास सुरू आहे. भंवरलाल मानसिकरित्या आजारी होते हे खरं आहे. सध्या तरी व्हीडिओत जे दिसत हे त्याच्या आधारे हत्येचा गुन्हा दाखल करण्याता आला आहे. वृद्धाला मारहाण करणारी व्यक्ती ओळखण्यात आली आहे, पण सध्या ती फरार आहे."

बुधवारी हा व्हीडिओ सोशल मीडियावर समोर आला आणि मृतदेह गुरुवारी मिळाला, असं स्थानक पत्रकार कमलेश सारडा सांगतात.

व्हायरल व्हीडिओ

लाल रंगाचं शर्ट घातलेली व्यक्ती भंवरलाल यांना चापट मारत नाव विचारत असल्याचं व्हीडिओत दिसत आहे. तसंच ही व्यक्ती वारंवार आधार कार्ड मागत असल्याचंही दिसत आहे.

"मोहम्मद नाव आहे का? खरं नाव सांग. आधार कार्ड दाखव," असं मारहाण करणारी व्यक्ती विचारत असल्याचं व्हीडिओत दिसत आहे. त्यानंतर तो भंवरलाल यांना एकानंतर एक कानाखाली लगावतो आणि आधार कार्डची विचारणा करतो.

भंवरलाल हे दुसऱ्या धर्माचे आहेत, असा संशय त्या व्यक्तीला असल्याचं दिसत आहे. व्हीडिओत दिसत आहे की भंवरलाल व्यवस्थित बोलू शकत नाहीयेत. "पैसे घ्या," इतकंच काय ते म्हणत असल्याचं ऐकू येतं.

नीमचचे पोलीस अधिकारी घटनास्थळाची पाहणी करताना.

फोटो स्रोत, KAMLESH SARADA

फोटो कॅप्शन, नीमचचे पोलीस अधिकारी घटनास्थळाची पाहणी करताना.

एकीकडे हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता आणि दुसरीकडे पोलीस मात्र मृताचा फोटो बेवारस म्हणून जारी करत होती, यामुळे नातेवाईक हैराण झाले आहेत.

"भंवरलाल यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाला," असं भंवरलाल यांचे भाचे अजीत चत्तर यांचं म्हणणं आहे.

"पण, अद्याप पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला नसल्यामुळे कोणत्याही निष्कर्षावर येणं मुश्किल आहे," असं पोलीस अधीक्षक सूरज वर्मा सांगतात.

"भंवरलाल मानसिकरित्या आजारी होते. शिवाय ऊनही प्रचंड होतं. त्यांनी काही खाल्लं होतं की नाही तेसुद्धा माहिती नाही. त्यानंतर हा व्हायरल व्हीडिओ. आता लगेच कोणत्याही निष्कर्षावर येणं मुश्किल आहे," वर्मा सांगतात.

नीमच पोलिसांनी मृतदेहाचा जो फोटो जारी केला होता, त्यावरूनच मग या घटनेची माहिती मिळाली आणि संपूर्ण परिवार मृतदेह नीमचहून रतलामला घेऊन आला, असं भंवरलाल यांचे नातेवाईक विकास सांगतात.

नीमचचे पोलीस अधिकारी

फोटो स्रोत, KAMLESH SARADA

ते सांगतात, "स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू असतानाच मारहाणीचा व्हीडिओ आमच्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर आम्ही नीमचला आलो. स्थानिक पोलिसांना आम्ही हा व्हीडिओ दाखवला. पण त्यांनी काहीच केलं नाही. त्यानंतर गावाहून अधिक लोक आले आणि पोलिसांवर दबाव आला. त्यानंतर मग त्यांनी हत्येचा गुन्हा दाखल केला."

व्हीडिओत जी व्यक्ती मारहाण करत होती, तिला त्वरित अटक करावी आणि हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी भवरलाल यांच्या नातेवाईकांची मागणी आहे. तसंच व्हीडिओत मारहाणी करणारी व्यक्तीसोबत अन्य कुणी यात सहभागी होत का, याचीही पोलिसांनी चौकशी करावी, अशीही या नातेवाईकांची मागणी आहे.

मध्य प्रदेश काँग्रेस समितीचे नेता जीतू पटवारी यांनीही या घटनेवर ट्विट केलं आहे.

"मनासा (नीमच). मारहाणीनंतर भंवरलाल जैन यांचा मृतदेह सापडला. मारहाण करणारा भाजपच्या माजी नगरसेविकाचा पती आहे. नरेंद्र मोदी, शिवराजसिंह चौहान आधी दलित, मग मुस्लीम-आदिवासी आणि आता जैन. विद्वेषाची ही आग भाजपनं लावली आहे. गृहमंत्री काही बोलतील का? असा सवाल त्यांनी केला आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)