राज ठाकरेंना माफी मागितली तरी अयोध्येत येऊ देणार नाही- ब्रिजभूषण सिंह #5मोठ्याबातम्या

राज ठाकरे

फोटो स्रोत, SHARAD BADHE/BBC

आज सकाळी विविध वृत्तपत्र आणि वेबसाईवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा हा आढावा

1. माफी मागितली तरी राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही- बृजभूषण सिंह

आधी राज ठाकरेंकडून उत्तर भारतीयांच्या माफीची मागणी केलेल्या बृजभूषण सिंह यांनी आता राज ठाकरेंनी माफी जरी मागितली तरी ते 5 तारखेला अयोध्येत येऊ शकत नाही, असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स ने ही बातमी दिली आहे.

"माझं वैर महाराष्ट्राशी नाहीये, कित्येक महाराष्ट्रातील बांधव अयोध्येत येतात. प्रभू रामाचं दर्शन घेतात. आमची हरकत असण्याचं काही कारण नाहीये. माझा फक्त एका व्यक्तीला विरोध आहे, त्याचं नाव आहे राज ठाकरे.

शेवटी मुक्तीचा उपाय आहे माफी. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, पण माफी जरी मागितली तरी ते 5 तारखेला अयोध्येत येऊ शकत नाही कारण ५ तारखेला अयोध्या फुल पॅक आहे", असं बृजभूषण सिंह म्हणाले.

2. संभाजीराजेंना प्रवेश नाकारल्याप्रकरणी आज 'तुळजापूर बंद'ची हाक

उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी भाजपचे खासदार संभाजीराजे यांना कुलस्वामामिनी तुळजाभवानी मंदिरात असताना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (9 मे) घडला.

छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडवल्याने तुळजापूरकर संतप्त आहेत. अशातच आता या प्रकाराविरोधात गुरुवारी (12 मे) तुळजापूरात बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाकडून ही बंदची हाक देण्यात आली आहे.

संभाजीराजे

फोटो स्रोत, @Yuvrajsambhaji

एबीपी माझा ने दिलेल्या बातमीनुसार सकल मराठा समाज आणि तुळजापूरकरांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी जिल्हाधिकारी, मंदिर तहसीलदार आणि व्यवस्थापक यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

तुळजाभवानी मंदिर आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या घराण्याचं विशेष नातं राहिलं आहे. मात्र पुरातत्व विभागाच्या एका निर्णयामुळे त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून थांबण्यात आल्याचं बोललं जात आहे.

3.भारतातील 50 टक्के जनता सरकारी रुग्णालयात जात नाही

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार 50 टक्के जनता सरकारी रुग्णालयाचा वापर करत नाही. निष्काळजीपणा हे यामागचं सर्वांत महत्त्वाचं कारण असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.

2019-21 या काळात केलेल्या या सर्वेक्षणात 49.9% टक्के लोक सरकारी रुग्णालयात जात नाहीत. त्यात बिहार (80%), उत्तर प्रदेश (75%) यात आघाडीवर आहे. लडाख, लक्षद्वीप, अंदमान, निकोबार या भागात हे प्रमाण 5 टक्के आहे.

याच सर्वेक्षणात भारताचा जन्मदर गेल्या दोन वर्षांत कमी झाल्याचं समोर आलं आहे. देशभरात 2.4 टक्के तर महाराष्ट्रात हा दर दोन टक्क्यांनी कमी झाला आहे.

4. शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. रमेश लटके कुटुंबियांसोबत दुबईला फिरण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान ह्रदयविकाराचा धक्का आल्यामुळे रमेश लटके यांचं निधन झालं.

न्यूज 18 लोकमत ने ही बातमी दिली आहे.

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. आमदार रमेश लटके कुटुंबीयांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झालंय.

आमदार रमेश लटके यांच्या निधनाची माहिती मिळताच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली आहे.

5. मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच मंत्रालयातील 'बत्ती गुल'

राज्यात सध्या भारनियमन सुरू असताना बुधवारी (11 मे) मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच वीज गेली आणि बैठक आटोपती घ्यावी लागली. पाच मिनिटात वीजपुरवठा सुरू झाला तरी या प्रकरणाची चौकशी बेस्टने सुरू केली आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार बुधवारी दुपारी 4 वाजता ही बैठक सुरू झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित होते.

महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असतानाच नेमका वीजपुरवठा खंडित झाला आणि मुख्यमंत्र्यांचा संपर्क तुटला आणि बैठक आटोपती घेण्यात आली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)