अमिताभ बच्चनच्या 'या' सिनेमासाठी जेव्हा अफगाण बंडखोरांनी थांबवलं होतं युद्ध

खुदा गवाह

फोटो स्रोत, KHUDA GAWAH

    • Author, वंदना
    • Role, टीव्ही एडिटर, भारतीय भाषा

ही गोष्ट 90 च्या दशकातली आहे. अफगाणिस्तानमध्ये बंडखोरांनी डोकं वर काढलं होतं. बंडखोरांसोबत सशस्त्र संघर्ष सुरू होता.

याच काळात तत्कालीन अफगाण राष्ट्रपती नजीबुल्लाह यांच्या मुलीनं त्यांना विनंती केली की, बंडखोरांसोबतचं युद्ध एक दिवसासाठी बंद केलं जावं.

हिंदी फिल्म इंडस्ट्रीतला एवढा मोठा स्टार भारतात आला असताना युद्ध बंद व्हावं अशी या मुलीची इच्छा होती. कारण लढाई थांबली तर या स्टारला काबूलमध्ये फिरता येईल आणि लोक त्याला पाहू शकतील.

या कलाकाराचं नाव होतं अमिताभ बच्चन आणि तो चित्रपट होता खुदा गवाह. या सिनेमाच्या शूटसाठी अमिताभ अफगाणिस्तानात आले होते.

हा किस्सा मला अफगाणिस्तानच्या माजी राजदूतांनी मला ऐकवला होता. काही वर्षांपूर्वी मी त्यांना लडाखमध्ये भेटले होते. 8 मे 1992ला रिलीज झालेला खुदा गवाह हा चित्रपट काबूल आणि मजार शरीफमध्ये शूट झाला होता.

अफगाणिस्तानातला सर्वांत लोकप्रिय चित्रपट

30 वर्षांपूर्वी रिलीज झालेला खुदा गवाह हा त्यावेळेच्या सर्वांत लोकप्रिय हिंदी चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी आणि किस्सेही खूप रंजक आहेत.

या सिनेमाचे प्रोड्युसर मनोज देसाईंनी मागे एकदा बीबीसीशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, 'खुदा गवाह'च्या निर्मितीवेळी अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरू होतं.

"खुदा गवाहच्या युनिटच्या सुरक्षेसाठी पाच रणगाडे पुढे आणि पाच रणगाडे मागे असायचे. पण अफगाणिस्तानात अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता एवढी होती की, एवढ्या सुरक्षेची गरजही भासत नव्हती."

"एकदा शूटिंग सुरू असताना आम्हाला तत्कालिन विरोधी नेते बुरहानुद्दीन रब्बानी यांनी निरोप पाठवला होता. मी अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा फॅन आहे आणि फिल्म युनिटला बंडखोरांकडून कोणताही धोका नाहीये, असं त्यांनी सांगितलं होतं. अतिशय नाट्यपूर्ण पद्धतीनं ते अमिताभ बच्चन यांना गुलाबाचं फुल द्यायला आले होते."

खुदा गवाहचं पोस्टर

फोटो स्रोत, TWITTER@NFAIOFFICIAL

एक असा देश जिथे यादवी युद्ध सुरू होतं, तिथले सत्ताधारी, बंडखोर आणि विरोधक सगळेच केवळ एका भारतीय अभिनेत्यासाठी एकत्र आले होते.

काबुलमधला शूटिंगचा अनुभव

हा तो काळ होता जेव्हा अमिताभ बच्चन आणि भारताचे तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांची अतिशय घट्ट मैत्री होती.

मनोज देसाई यांनी सांगितलं होतं की, राजीव गांधी यांच्यामुळे अफगाणिस्तानमधल्या नजीबुल्लाह सरकारनं 'खुदा गवाह'च्या युनिटची खूप काळजी घेतली होती.

1991 साली राजीव गांधींची हत्या झाली होती आणि 1992 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला.

खुदा गवाहच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन

फोटो स्रोत, TWITTER/FAISAL_FAIZI8

लेखक रशीद किडवई यांनी आपल्या 'नेता अभिनेता- बॉलीवुड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स' या पुस्तकात लिहिलं आहे, "दिल्लीत खुदा गवाहची लॉन्च पार्टी होती. त्या पार्टीत अमिताभ बच्चन आपले मित्र राजीव गांधींच्या आठवणीने रडले होते. अफगाणिस्तानात खुदा गवाहचं शूटिंग कसं पूर्ण होईल याकडे राजीव गांधींनी कसं लक्ष दिलं होतं आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती नजीबुल्लाह यांच्याकडे वैयक्तिकरित्या सर्वांच्या सुरक्षेची हमी मागितली होती, याची आठवण अमिताभ बच्चन यांनी सांगितलं होतं."

अफगाणिस्तानमधल्या त्या दिवसांबद्दल स्वतः अमिताभ बच्चन यांनीही लिहिलं आहे.

"राष्ट्रपती नजीबुल्लाह हे स्वतः हिंदी चित्रपटांचे चाहते होते. त्यांना मला भेटायचं होतं. त्यांनी आमची अतिशय उत्तम बडदास्त ठेवली होती. आमची राहायची सोय हॉटेलमध्ये केली नव्हती. एका कुटुंबाने स्वतःचं घर आमच्यासाठी रिकामं केलं होतं आणि स्वतः एका छोट्या घरात राहायला गेले होते. आमच्या फिल्म युनिटला तिथल्या एका जमातीच्या नेत्यानं आमंत्रित केलं होतं. मी डॅनीसोबत चॉपरमधून गेलो होतो. मागेपुढे हेलिकॉप्टर होते. पर्वतरांगांचं विहंगम दृश्य दिसत होतं."

"आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा त्या जमातीच्या नेत्यानं आम्हाला उचलून आत नेलं. आपल्या पाहुण्यांचे पाय जमिनीला लागू नयेत ही त्यामागची भूमिका होती. काबूलमध्ये आम्हाला खूप भेटी मिळाल्या. राष्ट्रपती नजीब यांनी 'ऑर्डर ऑफ अफगाणिस्तान'नं आमचा सन्मान केला. राष्ट्रपतींच्या काकांनी आमच्यासाठी त्या रात्री भारतीय संगीतातले राग गायले."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

माझे अफगाणी मित्र सांगतात की, खुदा गवाहमध्ये अमिताभ बच्चन जेव्हा त्यांच्या भारदस्त आवाजात हा डायलॉग म्हणायचे तेव्हा टाळ्यांचा कडकडाट व्हायचा.

सर ज़मीने हिंदुस्तान, असलाम वालेकुम

मेरा नाम बादशाह ख़ान है.

इश्क मेरा मज़हब, मोहब्बत मेरा ईमान..

उसी मोहब्बत के लिए काबुल का ये पठान..

सर ज़मीने हिंदुस्तान से मोहब्बत की ख़ैर माँगने आया है

गेल्या तीस वर्षांत कसा बदलला अफगाणिस्तान?

'खुदा गवाह' प्रदर्शित झाल्यानंतर ते आतापर्यंतच्या 30 वर्षांत अफगाणिस्ताननं खूप चढउतार पाहिले आहेत.

इतक्या वर्षांनी हा देश पुन्हा तिथेच येऊन थांबला आहे, जिथे काही वर्षांपूर्वी होता. तालिबाननं महिलांना टीव्ही सीरिअलमध्ये काम करायला बंदी घातली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

भारतीय चित्रपट आणि मालिका अफगाणिस्तानमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. धर्मात्मा असो की खुदा गवाह...हिंदी चित्रपटसृष्टी काही प्रमाणात अफगाणिस्तानच्या बदलत्या परिस्थितीची साक्षीदार आहे.

'खुदा गवाह'च्या आधी 1975 साली फिरोझ खाननं आपल्या धर्मात्मा चित्रपटाचं शूटिंग अफगाणिस्तानमध्ये केलं होतं. डॅनी आणि हेमा मालिनी हेदेखील फिरोझ खानसोबत होते.

एका जुन्या मुलाखतीत फिरोझ खाननं बीबीसीला सांगितलं होतं, "मी अफगाणिस्तानात फिल्मच्या शूटिंगसाठी लोकेशन पाहायला गेलो होतो. तेव्हा झहीर शाह तिथले राजे होते. त्यांनी परवानगी दिली होती. जेव्हा आम्ही तिथे शूटिंग करायला पोहोचलो, तेव्हा तिथे सत्ताबदल झाला होता. पण तरीही अफगाणिस्तानातल्या नवीन सरकारने आम्हाला सन्मानानं वागवलं आणि कोणताही त्रास होऊ दिला नाही."

धर्मात्मा

फोटो स्रोत, DHARMATMA

'धर्मात्मा' शूटिंगसाठी फिरोझ खान कुंदुज आणि बामियान इथंही शूट केलं होतं. 'क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो...' या गाण्यात अफगाणिस्तानातली अतिशय सुंदर ठिकाणं पाहायला मिळतात. नंतर तालिबानच्या राजवटीत यांपैकी अनेक ठिकाणं नष्ट झाली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका जुन्या ब्लॅक अँड व्हाइट व्हीडिओमध्ये फिरोझ खान आणि हेमा मालिनी यांचं अफगाणिस्तानमध्ये कसं स्वागत झालं हे दिसतं.

जंजीर चित्रपटात शेर खानची भूमिका अभिनेते प्राण यांनी साकारली होती. तेसुद्धा अफगाणिस्तानमध्ये खूप लोकप्रिय होते. या चित्रपटांच्याही आधी 1965 साली भारत आणि काबूलचे भावबंध जोडण्याचं काम काबुलीवाला या चित्रपटानं केलं होतं.

90च्या दशकात तालिबान सत्तेवर आल्यानंतर एक काळ असा आला की, चित्रपटच काय पण फोटोग्राफीवरही बंदी घालण्यात आली.

अनेक वर्षांनंतर दिग्दर्शक कबीर खान यांनी अफगाणिस्तानमध्ये 'काबुल एक्सप्रेस' चित्रपटाचं शूटिंग केलं होतं. हा चित्रपट 2006 साली प्रदर्शित झाला होता. काबुलीवाला आणि काबूल एक्सप्रेस दरम्यान अफगाणिस्तानात अनेक गोष्टी बदलल्या.

जेव्हा कबीर खान चित्रपट शूट करत होते, तेव्हा तालिबान सत्तेत नव्हतं. पण त्यांची दहशत होती. नंतर परिस्थिती हळूहळू रुळावर यायला लागली आणि अफगाणिस्तानात त्यांचे चित्रपटी बनू लागले. महिलाही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरल्या. पण त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागली.

सबा सहर या अफगाणिस्तानमधल्या पहिल्या महिला दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्या स्वतः अभिनेत्रीसोबतच पोलिस अधिकारीही होत्या.

2020 मध्ये तालिबाननं त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

त्यादिवशी सबा आपल्या मुलीला घेऊन कामावर गेली होती आणि कदाचित त्यामुळे त्यांना वाटलं की, आपल्यावर हल्ला होणार नाही. हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या.

गेल्यावर्षी तालिबान सत्तेत परत आल्यावर पुन्हा एकदा तिथल्या फिल्म इंडस्ट्री आणि कलाकारांवर जणूकाही ग्रहणच लागलं.

तालिबान सत्तेत परतल्यानंतर...

2003 मध्ये चित्रपट बनवणाऱ्या रोया सदत यादेखील अफगाणिस्तानातल्या मोजक्या महिला चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहेत.

रोया अशा अफगाणी महिलांवर चित्रपट बनवत होत्या, ज्यांनी तालिबानसोबत वार्ताहर म्हणून काम केलं होतं. मात्र 2021 मध्ये तालिबान सत्तेत परतल्यानंतर रोया यांना आपला चित्रपट थांबवावा लागला. त्या आता आपल्या देशात परतूही शकत नाहीयेत.

त्या सांगतात, "आम्ही आता युद्धांना कंटाळलो आहोत. कलाकार म्हणून आम्ही संघर्ष करतोय. आमच्या कलेच्या माध्यमातून, कागदावर लिहिलेल्या शब्दांच्या माध्यमातून आमचा हा लढा सुरू आहे.

गेल्या वर्षी चित्रपट निर्माती असलेल्या सहरा करीमी यांची मदतीची मागणी करणारी एक पोस्ट व्हायरल झाली होती. त्या अफगाण फिल्म असोसिएशनच्या पहिल्या महिला चेअरपर्सन आहेत किंबहुना होत्या असंच म्हणावं लागेल. कारण अफगाण फिल्म असोसिएशनचं सध्या काहीही अस्तित्व नाही.

तालिबान

फोटो स्रोत, EPA

या सगळ्या वातावरणात धर्मात्मा किंवा खुदा गवाहसारखे अफगाणिस्तानमध्ये शूट केलेले हिंदी चित्रपट स्वप्नासारखे वाटतात.

खुदा गवाह चित्रपटाबद्दलचा एक विचित्र योगायोग आहे. या चित्रपटात ज्या ठिकाणी हबीबउल्लाह नावाच्या व्यक्तिरेखेला फासावर चढवण्याचं दृश्य चित्रीत करण्यात आलं होतं, त्याच ठिकाणी बरोबर चार वर्षांनंतर राष्ट्रपती नजीबुल्लाह यांना फाशी दिली गेली.

खुदा गवाह चित्रपट प्रदर्शित होऊन तीस वर्षं उलटली आहेत. अमिताभ बच्चन यांचे फॅन्स आजही अफगाणिस्तानात आहेत. एखाद्या वारशाप्रमाणे अफगाण घरांमध्ये हा चित्रपट अनेकांच्या आठवणींचा भाग आहेत. पण आता हे सगळं मागे पडताना दिसतंय...इथलं आयुष्य वेगळ्याच अडचणी आणि संकटांना सामोरं जात आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)