दिपाली सय्यद : ‘अमृता फडणवीसांना साधी सरळ भाषा कळतच नाही’

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या चर्चेत आहेत. राणा दाम्पत्यास अटक झाल्यानंतर किरीट सोमय्या त्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्या गाडीत जर मोदी असते तरी ती गाडी आम्ही फोडली असती, असं वक्तव्य दिपाली सय्यद यांनी केलं होतं.

त्याचबरोबर, अमृता फडणवीस, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी अनेकदा असंसदीय भाषेत टीका केली आहे. त्या अशी भाषा का वापरतात? भोंग्यांच्या राजकारणाविषयी त्यांना काय वाटतं?

या सर्व मुद्यांवर त्यांनी बीबीसी मराठीशी संवाद साधला.

प्रश्न - तुम्ही किरीट सोमय्यांवर हल्ला झाल्यानंतर म्हणालात की, त्या गाडीत जर मोदी असले असते तरी गाडी फोडली असती. हे हल्याचं समर्थन नाही का? आणि देशाच्या पंतप्रधानांबाबत असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे?

दिपाली सय्यद - या सगळ्याची सुरुवात झाली होती ती तशाच पद्धतीने झाली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अरे तुरे.. तू कोण? तू काय? अशा भाषेत त्यांच्याबद्दल बोललं जात होतं. देशाचे पंतप्रधान हे महत्त्वाचे आहेत. मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का नाहीत. ते सुद्धा घटनात्मक पदावर आहेत. त्यांचा सुद्धा आदर ठेवला पाहिजे. मग जर तरची भाषा केली तर काय चुकलं? मी काही तिथे हिंसा करायला गेले नव्हते. पण 'बाळासाहेबांची शिकवण होती जो नडला त्याला फोडला...' आणि तिथे तो नडत होता. त्यामुळे मला नाही वाटत की त्यात काही चुकीचं केलं.

प्रश्न - राणा दाम्पत्याला आता जामीन मिळाला आहे. किरीट सोमय्या पुन्हा त्यांना भेटायला जाणार आहेत. त्यांनी ट्विट करून पुन्हा शिवसैनिकांना आव्हान दिलय. पण तुम्हीही त्यांचा' बाप' काढून त्यांना प्रत्युत्तर दिलय? हे योग्य आहे?

दिपाली सय्यद - हो... मी बाप काढला. ही आपली भाषा आहे. मराठी भाषा आहे. जी आपल्याला हवी तशी वापरू शकतो. तुम्ही या किंवा तुमचा बाप येऊ दे आम्ही नाही घाबरत.

प्रश्न -पण किरीट सोमय्यांनी राणा दाम्पत्यास भेटायला जाण्यास शिवसेनेला काय अडचण होती?

दिपाली सय्यद - त्या राणा दाम्पत्यांनी म्हटलं असतं ना आम्ही तुमच्या घरी घेऊन पूजापाठ करतो तर कदाचित उध्दव साहेबांनी परवानगीही दिली असती. पण त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली त्याचा शेवट आम्हाला करणं भाग होतं.

प्रश्न - राजकारणाची पातळी खूप घसरत चालली आहे. टीका करतानाही अनेकाची भाषा आणि पातळी घसरते. तुम्ही अमृता फडणवीसांवर टीका करताना अनेकदा असंसदीय भाषा वापरता. त्याचं काय कारण आहे?

दिपाली सय्यद - याचं कारण अमृता फडणवीसांना साधी सरळ भाषा कळतच नाही. आता तर फडणवीस साहेब म्हणाले त्या माझ ऐकतच नाहीत. आता त्या त्यांचं ऐकत नाहीत तर आमचं साध्या भाषेत कसं ऐकणार? म्हणून त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यावं लागतं.

प्रश्न - अनेकदा दिपाली सय्यद या नावावरून तुम्हाला ट्रोल केलं जातं. सध्या राज्यात भोंग्यांचं राजकारण सुरू आहे. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? तुमच्या घरी याबाबत काही चर्चा होते का?

दिपाली सय्यद - आता माझ्या लग्नाला 25 वर्षं झाली. तरीही हे ट्रोलर्स मला ट्रोल करतात. मी त्यांच्याकडे लक्ष नाही देत. आम्ही ईद आणि दिवाळी दोन्ही छान साजरी करतो. माझे पती माझ्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. मी माझं हिंदुत्व जपलेलं आहे.

प्रश्न - मशीदीवरचे भोंगे काढले पाहीजेत याबाबत तुमचं काय मत आहे? कारण बाळासाहेब ठाकरेंनी ही भूमिका मांडली होती. ज्याचे व्हीडीओ मनसेकडून व्हायरल केले जात आहेत.

दिपाली सय्यद - अनधिकृत भोंगे हे काढले पाहीजेत असं माझं मत आहे. आवाजाचा त्रास प्रत्येकाला होतो. त्यासाठी कायदा सुव्यवस्था आहे. पण भोंगे फक्त मशीदींवर नाही आहेत. आपण नवरात्री करतो, गणेशोत्सव करतो हे भोंगे सगळीकडे लागले जातात. पण हे काढण्यासाठी सांगण्याची एक पध्दत असते. उगाच मोठमोठ्या सभा घ्यायच्या आणि तेढ निर्माण करणारी वक्तव्य करायची हे चुकीचे आहे असं मला वाटतं.

प्रश्न - तुम्ही आता पक्षासाठी सतत बोलत असता. तुम्ही शिवसेनेत स्वत:ला कुठे बघता?

दिपाली सय्यद - मी 2019 ला शिवसेनेकडून आमदारकी लढले होते. तेव्हापासून पक्षासाठी काम करतेय. खूप छान वाटतय. मी 2014 ला आपकडून निवडणूक लढले असले तरी लहानपणापासून माझ्या रक्तात शिवसेना आहे. त्यामुळे काम करत राहीन. माझं शिवसेनेत वर्चस्व आहे.

प्रश्न - अजूनही अभिनयाच्या ऑफर्स येतात की आता पूर्णवेळ राजकारण करणार?

दिपाली सय्यद - अभिनयाच्या ऑफर्स कुठेही थांबलेल्या नाहीत. आता दोन सिनेमे ऑन बोर्ड आहेत. एक रूद्रा आणि दुसरा 'शेक पन्हाळा'... त्याचं काही कामं पूर्ण झालं आहे. त्यामुळे अभिनय, नृत्य कुठेही थांबलेलं नाही. राजकारणासोबत सर्व सुरू राहील.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)