स्पाईसजेटच्या विमानात भयंकर टर्ब्युलन्स, ‘विमानाच्या छतावर रक्ताचे डाग, अनेक प्रवासी जखमी’

फोटो स्रोत, Amit Baul
स्पाईस जेटच्या विमानात मोठ्या प्रमाणात टर्ब्युलन्स निर्माण झाल्यामुळे किमान 17 लोक जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली.
बोईंग 737 हे विमान 200 प्रवासी आणि क्रूसह मुंबईहून दुर्गापूरला जात होतं. त्यावेळी विमानात अमित बॉल सुद्धा प्रवास करत होते. त्या दिवशीचा घटनाक्रम ते सविस्तरपणे सांगतात.
तो रविवारचा दिवस होता. संध्याकाळी पाच वाजून तेरा मिनिटांनी आमचं विमान मुंबईहून दुर्गापूरच्या दिशेने झेपावलं. तो दोन तासाचा प्रवास असतो आणि मी बिझनेसमन म्हणून हा प्रवास अनेकदा केला आहे.
मात्र त्या दिवशी विमानात काहीही नेहमीसारखं झालं नाही. विमान पूर्ण भरलं होतं. नेहमीप्रमाणे खाणं पिणं चाललं होतं. काही लोक झोपले होते आणि काही लोक मोबाईलमध्ये माना खुपसून बसले होते. मी गेल्या चार पाच महिन्यात सहा वेळा या विमानातून प्रवास केला आहे. कारण स्पाईस जेटचं हे एकमेव थेट विमान आहे.
दुर्गापूर यायला अवघी 35 मिनिटं शिल्लक होती तेव्हा मला विमान हलल्यासारखं वाटलं. तांत्रिक भाषेत त्याला Turbulance असं म्हणतात. त्यातही खरंतर फार विशेष नाही. हे नेहमीच होत असतं. मी शेवटच्या रांगेत बसलो होतो आणि मी माझा सीट बेल्ट आणखी घटट् केला.
पण विमान खाली उतरता उतरता परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यानंतरचे 15-17 मिनिटं मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.
आम्ही वादळात सापडलो का माहिती नाही मात्र विमान खाली-वर आजुबाजूला जोरजोरात हलायला लागलं. ते विमान एखाद्या रबर बॉलसारखं हलायला लागलं.
मी 100 मजली इमारतीवरून कोसळतो की काय असं मला वाटलं. म्हणजे कोसळून पुन्हा उसळतो की काय असं वाटायला लागलं. मी सीट बेल्ट घट्ट करून खुर्चीच्या हँडलला घटट् पकडून होतो.
मी काही प्रवाशांना पाहिलं. ते कदाचित सीटबेल्ट घालायला विसरले असावेत. ते नुसते उसळत होते. त्यांचं डोकं वरती आपटत होतं. त्यांना प्रचंड दुखापत होत होती. माझ्या बाजुला बसलेले दोन लोक सुद्धा प्रचंड जखमी झाले कारण त्यांनी सीटबेल्ट घातला नव्हता.
माझ्या समोर एक बाई बसली होती. तिला 11 वर्षांची मुलगी होती. ती आणि तिची मुलगी इतक्यांदा उसळले की शेवटी ती बाई कोलमडून माझ्या पायाशी येऊन पडली होती. इतकी ती जखमी झाली. बराच वेळ ती खाली पडली होती. सीटच्या हँडलला पकडून ती स्वत:ला पकडून सावरण्याचा प्रयत्न करत होती.

फोटो स्रोत, Amit Baul
सगळे प्रवासी रडत-भेकत- ओरडत होते. काही लोकांनी देवाचा धावा करायला सुरुवात केली. मी खिडकीच्या बाहेर पाहिलं तेव्हा अंधार पडला होता. पायलट सीट बेल्ट घट्ट करा अशी घोषणा वारंवार करत होता.
सगळीकडे नुसता गोंधळ माजला. अन्नपदार्थ हवेत उडत होते. कप आणि कॅन इतस्त: पसरले होते. सीटच्या समोर असलेले फुड ट्रे बाहेर आले होते.
ऑक्सिजन पॅनल उघडले आणि मास्क बाहेर आले होते. खूप लोक जखमी झाले होते. छतावर रक्ताचे डाग लागले होते. सगळे प्रवासी एअर होस्टेसला जखमांना लावायला बर्फ मागत होते.
'मॅडम काहीतरी करा' एका प्रवाशाने एअर होस्टेसला आर्त हाक दिली. त्यांची सुद्धा धावपळ उडाली होती.
'फक्त प्रार्थना करा' दुसरा प्रवासी म्हणाला.
एका क्षणाला असं वाटलं की मी आता घरी पोहोचू शकणार नाही. जेव्हा सव्वा सात वाजता माझं विमान लँड झालं तेव्हा मला मृत्यूच्या दाढेतून बाहेर येणं याचा शब्दश: अर्थ कळला.
आम्ही पायलटचे मनापासून आभार मानले आणि बाहेर आलो तेव्हा बाहेर भयंकर उकाडा होता. मात्र अजूनही या नाट्याचा एक अध्याय बाकी होता.

फोटो स्रोत, Getty Images
जखमी प्रवाशांना न्यायला अँम्ब्युलन्स यायला एक तास लागला. डॉक्टर तर कुठेच दिसत नव्हते.
पॅरामेडिक मंडळी वेदनाशामक गोळ्या देत होती आणि बँडेज लावत होते. तिथे पुरेशा व्हीलचेअर्स नव्हत्या. अनेक प्रवाशांना अरायव्हल हॉलमध्ये बसवण्यात आलं. दुर्गापूर विमानतळावर वैद्यकीय सुविधा नव्हत्या हे स्पष्ट नव्हतं.
जेव्हा मी संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये माझ्या सुजलेल्या पायाचा एक्स रे काढायला गेलो तेव्हा अनेक प्रवासी तिथे एक्स रे काढत होते. माझ्या समोर बसलेल्या बाईच्या पोटाला आणि खांद्याला चांगलाच मार लागला होता.
नागरी उडड्यन मंत्रालयाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. प्रचंड प्रमाणात टर्ब्युलन्स असल्यामुळे ऑटो पायलट मोड बंद झाला होता आणि त्यामुळे पायलट मॅन्युअली विमान चालवत होता, असं त्यांचं म्हणणं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








