मनोज वाजपेयीला वाटतं बॉलिवुड साऊथपुढे 'हतबल' तर नवाज म्हणतो 'ही लाट ओसरेल'

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला साऊथ विरुद्ध बॉलिवुडचा वाद काही केल्या ओसरत नाहीये. त्यातच मनोज वाजपेयीनं म्हटलं आहे की, 'दक्षिण भारतातले सिनेमे पाहून बॉलिवुडमधील निर्मात्यांना काय करावे हेच कळत नाहीये.' गेल्या काही दिवसांपासून आपण हे पाहिलं आहे की साऊथचे चित्रपट बॉलिवुडला तगडं आव्हान देत आहेत.
साऊथच्या चित्रपटांनीबॉलिवूडला अक्षरश: घाम फोडलाय. या चित्रपटांनी शेकडो कोटींच्या घरात कमाई केली. यात पुष्पा, आरआरआर आणि नुकताच रिलीज झालेला केजीएफ-2 हे चित्रपट आहेत.
मात्र सध्याची बॉलिवूड चित्रपटांची कमाई बघता बॉलिवूडचे सिनेमे धडाधड आपटत आहेत. त्यामुळे एकीकडे साऊथच्या कलाकारांचे तोंडभरून कौतुक सुरू आहे तर दुसरीकडे साऊथच्या चित्रपटांची लाट आली असून ती लवकरच ओसरेल असं ही काही कलाकार म्हणत आहेत.
दाक्षिणात्य चित्रपट हिंदी पट्ट्यातही बॉक्स ऑफिसवर सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्याचवेळी बॉलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवतायत यावर हिंदी चित्रपट अभिनेते मनोज वाजपेयी म्हणाले की, "दाक्षिणात्य चित्रपट उद्योगातून अनेक ब्लॉकबस्टर्स घडले, घडत आहेत. मी आणि माझ्यासारख्या इतरांना एका मिनिटासाठी विसरून जा. मुंबई फिल्म इंडस्ट्रीतील मुख्य प्रवाहातील चित्रपट निर्माते 'दाक्षिणात्य चित्रपट' आणि त्याची प्रसिद्धी पाहून थक्क झाले आहेत. त्यांना काय करावे ते समजत नाहीये."

फोटो स्रोत, TWITTER/BINGED
दिल्ली टाइम्सशी बोलताना ते पुढे म्हणाले की, "KGF 2 आणि RRR सारखे चित्रपट हिंदीत डब करूनही 300 कोटींहून अधिक गल्ला जमवतात. पण दाक्षिणात्य भाषेत डब केलेला सूर्यवंशी चित्रपट 200 कोटींची कमाई करण्यात अपयशी ठरतो."
दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशातून बॉलिवुड निर्मात्यांनी धडा घ्यायला हवा असा मोलाचा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला.
चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी ही ट्विट केलं होतं की, उत्तरेचे लोक दक्षिणेचा हेवा करतात.
तेच दुसरीकडे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मात्र साऊथच्या चित्रपटांची लाट आली असून ती लवकरच ओसरेल असं म्हणतोय.

फोटो स्रोत, Facebook/Yash
'इंडिया इकॉनॉमिक कॉनक्लेव्ह' या कार्यक्रमात साऊथच्या सिनेमांमुळे हिंदी इंडस्ट्रीवर परिणाम होतोय का? हा प्रश्न नवाजुद्दीन सिद्दिकीला विचारला असता तो म्हणतो, "मला वाटतं ही एक फेज आहे. आज सर्वत्र साऊथ चित्रपटांचा डंका वाजतोय. पण एखादा बॉलिवूड सिनेमा सुपरडुपर हिट झाल्यावर अचानक सगळं बदलेलं. मग लोक बॉलिवुडचा उदोउदो करायला लागतील."
तो पुढे म्हणतो की, "माझ्या मते, बॉलिवूडनं फक्त एकच मोठी चूक केली आणि या चुकीची शिक्षा बॉलिवुड भोगतंय. बॉलिवुड साऊथचे रिमेक बनवत राहिलं. ओरिजनल काही बनवलंच नाही. सगळं काही रिमेकच्या भरवशावर सोडून आपण मोकळे झालोत. ही मोठी चूक होती. यातून बॉलिवुडने काहीतरी शिकावं. ओरिजनल सिनेमे बनायला हवेत. हेच बॉलिवूडच्या भविष्यासाठी योग्य ठरेल."
राष्ट्रभाषेवरून रंगला होता वाद
भारतात हिंदी ही भाषा बहुतांशी राज्यातील लोकांना समजते म्हणून हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं काही लोकांचं म्हणणं असतं. मात्र दक्षिणेकडील राज्य हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यास विरोध करतात. आता हा भाषिक वाद बराच जुना असला तरी यात बॉलिवुड आणि टॉलिवुड असा ही वाद रंगला.

फोटो स्रोत, Getty Images
हे ट्विटर युद्ध रंगल होतं अभिनेता किच्चा सुदीप आणि अजय देवगण या दोघांमध्ये.
एका चित्रपटाच्या प्रोमोशन दरम्यान 'हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही. बॉलीवूड मधील कित्येक चित्रपट तेलगू आणि तामिळ चित्रपटामधून प्रेरित होऊन केले जातात' असं विधान साऊथचा हिरो किच्चा सुदीप याने केलं होतं.
यावर अजय देवगण किच्चाला म्हणाला, "माझ्या भावा, तुमच्या मते हिंदी ही राष्ट्रभाषा नसेल तर मग तुम्ही तुमचे चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता? हिंदी ही आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील. जन गण मन."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








