महाविकास आघाडीतल्या 18 मंत्र्यांची कोरोना काळातील बिलं सरकारी तिजोरीतून #5मोठ्याबातम्या

विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1. महाविकास आघाडीतल्या 18 मंत्र्यांची कोरोना काळातील बिलं सरकारी तिजोरीतून...

महाविकास आघाडीतील 18 मंत्र्यांनी कोरोना काळात खासगी रुग्णालयात उपचार घेऊन लाखोंची बिलं सरकारी तिजोरीतून भरली आहेत.

जनता कोरोना संकटात असताना, सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यासाठी वणवण फिरत असताना या 18 मंत्र्यांनी मात्र, 2 वर्षांत खासगी रुग्णालयातील उपचारांची 1 कोटी 39 लाख 26720 रुपयांची बिले सरकारी तिजोरीतून दिली आहेत. दिव्य मराठी या वर्तमानपत्रानं ही बातमी दिली आहे.

खासगीत उपचार घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये राजेश टोपे, डॉ. नितीन राऊत, हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, सुनील केदार, जयंत पाटील, सुभाष देसाई, अनिल परब, अशोक चव्हाण, संजय बनसोडे, विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनिल केदार, दत्तात्रेय भरणे, प्राजक्त तनपुरे, नवाब मलिक हे मंत्री आहेत.

विशेष म्हणजे आरोग्याची धुरा वाहणारे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच या दोन वर्षांत सर्वाधिक म्हणजे तब्बल 34 लाख 40 हजार 930 रुपयांची खासगी रुग्णालयाच्या बिलांची प्रतिपूर्ती केली आहे.

मंत्र्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची तजवीज नियमानुसारच असली तरी सरकारी आरोग्य व्यवस्थेवर मंत्र्यांचाच भरोसा नाही का, हा प्रश्न पुढे येत आहे.

2. पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती

महाराष्ट्र पोलिस दलात बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले होते. त्याला 12 तास उलटत नाहीत तोच 5 अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या या बदल्यांवरून महाविकास आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

लोकसत्ताने दिलेया बातमीनुसार, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच उपायुक्त दर्जाच्या 39 जणांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी सायंकाळी जारी करण्यात आले. यातील पाच उपायुक्तांना बढती देऊन त्यांची अप्पर पोलीस आयुक्त म्हणून नव्याने करण्यात आलेल्या नेमणुकीस गृह खात्याने एका आदेशान्वये स्थगिती दिली.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर या बदल्यांना स्थगिती देण्यात आल्याच्या तसेच या बदल्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विश्वासात घेतले नसल्याची तक्रार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची चर्चा आहे.

ही स्थगिती कशासाठी देण्यात आली याचा खुलासा करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

3. आता लोडशेडिंगचं वेळापत्रक येणार

कोळसा टंचाई आणि त्यामुळं उभं राहिलेल्या वीज संकटाचा सामना सध्या महाराष्ट्र करतोय. राज्यातील अनेक भागात सध्या भारनियमनाला सुरुवात झालीय.

यावर तोडगा काढण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर नितीन राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी नागरिकांनी वीज जपून वापरण्याचं आवाहन त्यांनी केलंय.

ते म्हणाले, "राज्यात भारनियमन करण्यात आलं आहे. ते भारनियमन कधीपर्यंत चालेल सांगता येत नाही. कारण खुल्या बाजारात वीज उपलब्ध नाही. अनेक वीज कंपन्या बंद आहेत. अशावेळी हा ताण राहणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना विनंती आहे की वीजेच्या वापरात काटकसर करावी.

"भारनियमनाचं शेड्यूल वृत्तपत्रात देऊ, वॉट्सअॅपला पाठवू. तेवढा वेळ तुम्ही थोडसं सहन करुन आम्हाला सहकार्य करावं. आम्हाला 1500 मेगावॅट वीज उपलब्ध झाली की लगेच भारनियमन बंद करु. पण तशी स्थिती आज तरी दिसत नाही."

TV9 ने ही बातमी दिलीय.

4.'देशातील मुस्लिम रस्त्यावर आले तर..'

दिल्लीतील हिंसाचारानंतर करण्यात आलेल्या बुलडोझर कारवाईबाबत मौलाना तौकीर रझा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तौकीर रझा म्हणाले की, "देशात जी परिस्थिती आहे, ती चांगली नाही. आमच्या अजानच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण केले जात आहे. ते म्हणाले की, ज्या दिवशी देशातील मुस्लिम रस्त्यावर येतील, तेव्हा त्यांना सांभाळणे फार कठीण होईल."

मौलाना तौकीर रझा यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यापूर्वी निवडणुकीच्या काळात बाटला हाऊस चकमकीवर बोलताना तौकीर रझा यांनी वादग्रस्त विधान करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांनी या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना शहीद असे म्हटले होते.

अमरउजाला या वृत्तपत्राने ही बातमी दिलीय.

5.पेट्रोल डिझेलचं नाही तर दैनंदिन वस्तूंच्या किंमतीत वाढ

फक्त इंधनच नव्हे तर दूध, साबण आणि पॅकबंद खाद्यपदार्थ यांसारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंपासून ते गृहोपयोगी वस्तू, कार आणि निवासी घरे यासारख्या ग्राहकांच्या बहुतेक वस्तूंच्या किंमती येत्या आठवड्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पॅकेज्ड दुधाच्या बाजारपेठेतील सर्वात मोठी कंपनी गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन किंवा अमूल लवकरच किमतीत वाढ करेल अशी अपेक्षा आहे. निविष्ठा खर्चात लक्षणीय वाढ झाल्यामुळे किंमती वाढल्या आहेत.

तेच दुसरीकडे हिंदुस्तान युनिलिव्हर, देशातील सर्वात मोठी फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स कंपनी एप्रिलमध्ये त्वचेची काळजी आणि डिटर्जंटच्या किमती पुन्हा वाढवणार असल्याची बातमी आहे. ABP माझाने ही बातमी दिली आहे.

मारुती सुझुकी या आघाडीच्या वाहन निर्माता कंपनीने या आठवड्यात जवळपास सर्वच यूटीएस मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. क्रेडाईच्या माहितीनुसार, कच्चा माल आणि लॉजिस्टिक्सच्या वाढत्या किंमतीमुळे घरांच्या किमतींमध्ये एकूण 10-15 टक्क्यांनी वाढ होणार आहे.

सगळ्याच क्षेत्राला महागाईचा फटका बसत असल्याने आता याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार असून याचा थेट फटका आर्थिक आयुष्याला बसणार असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)