'खान हवा की बाण हवा?' राज ठाकरेंचं बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल?

राज ठाकरे

फोटो स्रोत, facebook

    • Author, हर्षल आकुडे,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि त्यांची वक्तव्ये चर्चेत आहेत.

सर्वप्रथम गुढी पाडव्याच्या दिवशी (2 एप्रिल) राज ठाकरेंनी मुंबईच्या शिवाजी पार्कवर एक सभा घेतली. या सभेत त्यांनी कडव्या हिंदुत्ववादाची कास धरल्याचं दिसून आलं.

"मशिदीवर लावलेले भोंगे उतरवले नाहीत, तर अजानच्या वेळी दुप्पट आवाजात मशिदींसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावू," असा इशारा राज ठाकरेंनी यावेळच्या भाषणात दिला.

राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुरतं ढवळून निघालं. यानंतर राज ठाकरेंनी 12 एप्रिल रोजी ठाण्यात एक सभा घेतली. इथंही त्यांनी आपल्या वक्तव्यांचा पुनरुच्चार केला.

ठाण्यातल्या सभेनंतर 16 एप्रिलला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी राज ठाकरेंनी पुण्यात महाआरती केली. या कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी 2 मोठ्या घोषणा केल्या.

1 मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये सभा घेणार, तर 5 जून रोजी अयोध्येला जाणार, अशा त्या घोषणा होत्या.

राज यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या दृष्टीकोनातून या दोन्ही घोषणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः औरंगाबादेत सभा घेण्याच्या निर्णयामागे एक ऐतिहासिक महत्त्वाकांक्षा जोडलेली आहे, असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

या निमित्ताने राज यांचं हिंदुत्ववादाचं राजकारण त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांच्याच मार्गाने सुरू असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित होतं.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या या निर्णयाचं नेमकं कारण काय, राज ठाकरे यांची वाटचाल बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गाने सुरू आहे का, त्याचे नेमके परिणाम काय असू शकतात, हे प्रश्न उपस्थित होत आहेत.

औरंगाबादचा 'संभाजीनगर' म्हणून उल्लेख

औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं, अशी भूमिका शिवसेनेकडून नेहमी मांडली जाते. हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनीच पुढे आणला होता.

मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या एका सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी ही मागणी केली होती. याच मैदानावर सभा घेणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केली. विशेष म्हणजे, हे जाहीर करत असताना औरंगाबादचा उल्लेख त्यांनी 'संभाजीनगर' असा केला.

यामुळे, राज ठाकरे आपल्या 1 मे रोजीच्या भाषणात मशिदींच्या भोंग्यांसोबतच 'संभाजीनगर' नामांतराचा मुद्दा हाती घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ऐतिहासिक मैदानाची निवड

राज ठाकरे यांनी आपल्या सभेसाठी निवडलेल्या मैदानाचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक विशेष नातं होतं. हे वैशिष्ट्य माहित असल्यानेच राज ठाकरेंनी हे मैदान निवडलं आहे, असं ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांना वाटतं.

ते सांगतात, "राज ठाकरे यांची सभा होणार आहे ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचं मैदान बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक आहे.

राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

औरंगाबाद शहरात महापालिकेची निवडणूक पहिल्यांदा लागली त्यावेळी 1988 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी याच मैदानावर भाषण केलं होतं. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक सभा या मैदानावर झाल्या. आजही शिवसेनेकडून उद्धव ठाकरे याच मैदानावर आपल्या सभा आयोजित करत असतात. यामुळे त्यांच्या दृष्टीने मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे, असं माने सांगतात.

राज ठाकरे यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत आपल्या औरंगाबादच्या सभेची घोषणी केली असली तरी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाचं बुकिंग त्यांनी त्यापूर्वीच करून ठेवलं होतं. एक-दोन नव्हे तर चार दिवसांची बुकींग त्यांनी करून ठेवलेली आहे. यावरून राज ठाकरे यांच्यासाठी ही सभा किती महत्त्वाची आहे, हे समजतं, अशी माहिती माने यांनी दिली.

शिवसेनेचा बालेकिल्ला लक्ष्य

गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबादला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं. औरंगाबाद महापालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेचीच सत्ता आहे. इथे विरोधीत असदुद्दीन ओवैसी यांचा MIM पक्ष आहे.

चंद्रकांत खैरे यांच्या स्वरुपात गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेचाच खासदार औरंगाबादमध्ये होता. पण 2019 मध्ये चंद्रकांत खैरे यांना MIM पक्षाचे इम्तियाज जलील यांनी पराभूत केलं.

राज ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 9 पैकी 9 मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीने विजय मिळवला. यामध्ये 6 ठिकाणी शिवसेना तर 3 ठिकाणाी भाजपला विजय मिळाला. पुढे निवडणुकीनंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली.

"ऐंशीच्या दशकात बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुंबईबाहेर पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. मुंबईच्या बाहेरची शिवसेनेची पहिली शाखा ही औरंगाबादमध्ये सुरू झाली. इथे प्रतिसाद मिळाल्यानंतरच ती मराठवाड्यात ग्रामीण भागात पसरली," असं ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी सांगितलं.

'खान हवा की बाण हवा?'

येथील शिवसेनेच्या वर्चस्वाबाबत बोलताना प्रमोद माने सांगतात, "औरंगाबादमधील प्रत्येक निवडणुकीत पूर्वी 'खान हवा की बाण हवा', हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य असायचं. याच राजकारणावर त्यांनी वर्षानुवर्षे औरंगाबादसह मराठवाड्याच्या काही भागात वर्चस्व राखलं."

"पण आता महाविकास आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे त्यांना हे वाक्य वापरता येणार नाही. आमचं हिंदुत्व खरं हिंदुत्व आहे, असं भलेही उद्धव ठाकरे म्हणत असले तरी त्यांच्यावर अनेक मर्यादा आहेत, हे वास्तव आहे."

हिंदुत्व

फोटो स्रोत, Getty Images

ते पुढे सांगतात, "औरंगाबाद-मराठवाड्याच्या राजकारणाचा इतिहास पाहता त्याला निजामशाही, रझाकार, हिंदू-मुस्लीम दंगली यांचा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे प्रखर मुस्लीम विरोध याच मुद्द्यावर शिवसेनेचं येथील राजकारण सुरू झालं होतं. कित्येक भाषणांमध्ये त्यांनी अपशब्दही वापरलेले पाहायला मिळतील."

"ज्वलंत हिंदुत्वाच्या पुरस्कारामुळेच शिवसेना मराठवाड्यात वाढली. 2019 पर्यंत याच मुद्द्यावर त्यांचं राजकारण चालत असे. पण महाविकास आघाडीत गेल्याने काही प्रमाणात हिंदू मतदार शिवसेनेकडून दुरावण्याची शक्यता आहे. याच व्होट बँकेवर राज यांनी लक्ष केंद्रीत केलेलं असू शकतं," असं माने यांना वाटतं.

'बाळासाहेबांच्या नकलेचा फसलेला प्रयोग'

"हिंदुत्ववादाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाऊलांवर पाऊल ठेवलेलं दिसून येत आहे. पण हा म्हणजे बाळासाहेबांच्या नकलेचा फसलेला प्रयोग आहे," असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका सुजाता आनंदन यांनी व्यक्त केलं.

त्या सांगतात, "सुरुवातीपासूनच राज ठाकरे यांची बोलण्याची पद्धत, कपडे, चष्मा आदी शैली ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच होती. पक्ष स्थापनेनंतरही त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्टाईलने राजकारण सुरू केलं. पण त्यात त्यांना किती यश मिळालं, हे आपल्या सर्वांसमोर आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे हे पूर्णपणे ओरिजिनल आहेत. ते सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान आहेत."

सुजाता आनंदन यांच्या मते, "एखाद्या नेत्याची नक्कल किंवा अनुकरण करणं सोपं आहे. पण त्याचा लोकांवर किती प्रभाव पडतो, हा मुख्य प्रश्न आहे. एकेकाळी बाळासाहेबांनी सांगितलं तर काँग्रेसलाही मतदान करू, असा पाठिंबा त्यांना लोकांकडून मिळायचा. तसा करिश्मा राज ठाकरे यांच्याकडून अद्याप तरी दिसलेला नाही. त्यामुळे हा बाळासाहेबांच्या नकलेचा फसलेला प्रयोग आहे. "

राज ठाकरे

फोटो स्रोत, facebook

संजीय उन्हाळे याविषयी म्हणतात,"बाळासाहेब ठाकरेंच्या दिमतीला दुसऱ्या फळीतील नेत्यांची मोठी यादी होती. यामध्ये छगन भुजबळ, मनोहर जोशी, नारायण राणे, मधुकर सरपोतदार यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश होत असे. त्यांच्यामार्फत ते आपल्या पक्षाचा कार्यक्रम पार पाडून घेत असत. त्यांच्याच बळावर औरंगाबादेतील त्यांच्या सभा यशस्वी होत. पण मनसेकडे एकमेव राज ठाकरे वगळता अन्य मोठा नेता दिसत नाही. शिवाय, औरंगाबादमध्ये स्थानिक पातळीवर मोठं नेतृत्व मनसेकडे नाही. त्यामुळे लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं मोठं आव्हान राज यांच्यासमोर असणार आहे."

ते पुढे सांगतात, "1980-90 च्या दशकात बाळासाहेब ठाकरे यांनी ज्वलंत हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला होता. काँग्रेसकडून होणांरं मुस्लिमांचं लांगुलचालन, नंतर विद्यापीठ नामांतर आदी प्रश्न त्यांनी मांडण्यास सुरुवात केली होती. या काळातील वातावरण तसंच सामाजिक-राजकीय परिस्थिती परिस्थितीची जोड बाळासाहेब ठाकरेंना मिळाल्याने त्यांना त्यामध्ये यशही आलं. पण सध्या ती परिस्थिती नाही. मुस्लीम असो वा हिंदू, बेरोजगारी हा प्रमुख मुद्दा आता बनला आहे. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण कितीही झालं, तरी समाजाच्या समस्या वेगळ्या आहेत."

त्यांच्या मते, "राज ठाकरे बाळासाहेबांचं अनुकरण कितीही करू शकत असले तरी त्यांना परिस्थितीची साथ मिळणार नाही. सध्या औरंगाबादेत शिवसेनेचे अब्दुल सत्तार हिंदू मतांवर निवडून येऊ शकतात. त्याचप्रमाणे शिवसेनेचेच प्रदीप जैस्वाल मुस्लीम मतांच्या बळावर निवडून येतात. सध्या परिस्थिती बदलली आहे. अशा स्थितीत राज ठाकरे यांच्या हाती फारसं काही लागण्याची शक्यता नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)