मेनस्ट्रुअल कप काय असतो? तो कसा वापरायचा?

मेनस्ट्रुअल कप, सॅनिटरी पॅड, मासिक पाळी, आरोग्य, महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेनस्ट्रुअल कप
    • Author, जूलिया ग्रान्ची
    • Role, बीबीसी न्यूज ब्राझील, साओ पाउलो

स्त्रियांच्या मासिक पाळीसाठी वापरल्या जाणार्‍या मेनस्ट्रुअल कपचा प्रोटोटाइप 1930 मध्ये पहिल्यांदाच समोर आला. अमेरिकन अभिनेत्री लिओना चॅमर्सने 1937 मध्ये त्याचं पेटंट मिळावं म्हणून पहिला अर्ज केला होता.

गेल्या काही वर्षात मेनस्ट्रुअल कपच्या या प्रोटोटाईपचे बरेच अत्याधुनिक प्रकार बाजारात आले.

सिलिकॉन, रबर किंवा लेटेक्सपासून बनलेले हे लहान कप आता हळूहळू सॅनिटरी पॅडची जागा घेत असल्याचं दिसतंय. याचं एक कारण म्हणजे सॅनिटरी पॅड फक्त एकदाच वापरता येतं, मात्र मेनस्ट्रुअल कप टिकाऊ आणि वारंवार वापरता येतो.

हा कप लवचिक उत्पादनांनी बनलेला आहे, त्यामुळे महिलांना गुप्तांगांमध्ये कोणताही त्रास होत नाही.

दक्षिण अमेरिकी देश असलेल्या ब्राझील मधील साओ पाउलो येथील एका हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ अलेक्झांड्रे पुपो याविषयी अधिक माहिती देतात.

त्यांच्या म्हणण्यानुसार, "या कपचा वापर करणार्‍या स्त्रिया सांगतात की, बिकिनी किंवा लेगिंग्ससारख्या कपड्यांमध्ये हा कप झाकला जातो हा एक फायदा आहे. तसेच या कपमुळे टॅम्पॉनसारखी अस्वस्थता देखील निर्माण होत नाही."

हे कप वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. त्याची लांबी 4 ते 6 सें.मी. असते. तेच याचा वरच्या भागाचा व्यास 3 ते 5 सेमी दरम्यान असतो. ज्या महिलांना पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होतो त्यांना मोठ्या आकाराचे कप आवश्यक असतात.

जर डॉक्टरांनी दिलेले निर्देश मानले तर हे उत्पादन स्वच्छ आणि सुरक्षित वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि 10 वर्षांपर्यंत टिकू शकते.

या लेखात आम्ही मेन्स्ट्रुअल कपशी संबंधित पाच मोठ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केलाय.

1. मेन्स्ट्रुअल कप योनीमध्ये कशारितीने सरकवला पाहिजे?

महिलांच्या जननेंद्रियामध्ये हा कप सरकवण्यापूर्वी तो कप दोन किंवा तीन भागांमध्ये दुमडावा जेणेकरून तो योनीमध्ये नीट बसेल. या कपला अनेक प्रकारे दुमडले जाऊ शकते.

दक्षिण ब्राझीलमधील पोर्टो अलेग्रे येथील एका हॉस्पिटशी संलग्न स्त्रीरोगतज्ज्ञ गॅब्रिएला गॅलिना बीबीसीला सांगतात, "हा कप बसवताना स्त्रीया शौचालयात किंवा पलंगावर पाय पसरून आणि गुडघे वाकवून बसू शकतात. जर त्यांचे गुप्तांग खूप कोरडे असेल, तर हा कप बसवताना त्रास होऊ शकतो. विशेषत: कप पहिल्यांदा वापरताना तर लुब्रिकंट वापरलं पाहिजे."

गॅलिना सांगतात, "त्यानंतर तो कप हळूहळू आत सरकवायचा. जसं जसं तो कप आत जातो, रक्तस्त्राव होणाऱ्या भागात तो सोडला की कप उघडतो. आतमध्ये गेल्यावर तो नीट बसला नसेल तर त्याला थोड फिरवलं पाहिजे."

मेनस्ट्रुअल कप, सॅनिटरी पॅड, मासिक पाळी, आरोग्य, महिला
फोटो कॅप्शन, मेनस्ट्रुअल कप

बोटांच्या मदतीने तो टॅम्पोन असल्यासारखा तो जननेंद्रियाच्या आत ढकलायचा. हा कप टॅम्पोनपेक्षा वेगळा आहे, कारण हा कप रक्त शोषत नाही तर ते गोळा करतो.

अलेक्झांड्रे पुपो सांगतात, "एकदा हा कप आत बसवल्यानंतर, जननेंद्रियाच्या भिंतींना चिकटतो. तो उघडा रहावा यासाठी त्याच्या काठावर असलेला लवचिक बँड थोडा घट्ट होतो. तो विस्तारतो आणि थोडासा आतमध्ये अंतर्गोल होतो आणि भिंतींना चिकटतो. आणि तिथे तो स्थिर होऊन जातो."

मेन्स्ट्रुअल कप एकाच वेळी जास्तीत जास्त 12 तासांसाठी वापरता येतो. पण ज्या महिलांचा रक्तस्राव जास्त असतो त्यांना 4 ते 6 तासांनंतर तो कप बदलण्याचा सल्ला दिला जातो.

या कपचा आकार लहान असल्याने तो लगेच हाताला लागतो मात्र यामुळे देखील समस्या उद्भवू शकतात.

पुपो सल्ला देताना सांगतात की, हा कप रॉडने काढण्यासाठी खूप ताकद खर्ची पडते. म्हणूनच आतला व्हॅक्यूम कमी करण्यासाठी बोट वापरावं अशी शिफारस त्या करतात.

शॉवरखाली किंवा मग शौचालयात बसून हा कप काढणं अगदी सुरक्षित आहे.

गॅलिना यांच्या म्हणण्यानुसार, "पहिल्यांदाच जर हा कप वापरत असाल तर थोडं अस्वस्थ वाटणं साहजिक आहे. या कपची सवय होण्यासाठी एखादया स्त्रीने दोन तीनदा हा कप वापरला पाहिजे. जेव्हा पाळी सुरू नसते तेव्हा हा कप वापरून बघण्याची शिफारस केली जाते."

2. मेनस्ट्रुअल कप स्वच्छ कसा करणार?

मेनस्ट्रुअल कपचा पहिल्यांदाच वापर करण्यापूर्वी तो स्टोव्हवर किंवा मायक्रोवेव्हमधल्या गरम पाण्यात 5 मिनिटे उकळवा जेणेकरून तो वापरासाठी सुरक्षित होईल. बरेच ब्रँड यासाठी एक विशेष प्रकारचे कंटेनर देखील देतात.

मेनस्ट्रुअल कप, सॅनिटरी पॅड, मासिक पाळी, आरोग्य, महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेनस्ट्रुअल कप

मासिक पाळीच्या दरम्यान हा कप वारंवार वापरला जातो, तेव्हा तो पाणी आणि साबणाने पूर्णपणे स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. जेव्हा मासिक पाळी संपेल तेव्हा तो त्याच प्रकारे उकळत्या पाण्यात स्वच्छ करावा.

त्यानंतर वापरात नसताना कापडी पिशवीत बांधून ठेवावा. नंतर मासिक पाळी सुरू झाल्यावर तो वापरण्यापूर्वी पुन्हा उकळत्या पाण्यात स्वच्छ करावा.

3. या कपचा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो का?

मेनस्ट्रुअल कप योग्य प्रकारे स्वच्छ केल्यानंतर वापरण्यास अतिशय सुरक्षित असतात. पण जर तो नीट स्वच्छ केला नाही तर संसर्गाचा धोका वाढू शकतो.

गॅलिना सांगतात की, जर जननेंद्रियांचा आणि सूक्ष्मजीवांचा संपर्क आला तर ते आरोग्याला हानिकारक ठरू शकते. यामुळे कॅंडिडिआसिस आणि वेजिनोसिस समस्या उद्भवू शकते.

मेनस्ट्रुअल कप, सॅनिटरी पॅड, मासिक पाळी, आरोग्य, महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेनस्ट्रुअल कप

ज्या स्त्रियांना कंडोमची ऍलर्जी आहे अशा स्त्रियांनी लेटेक्स-फ्री कप वापरावेत, अशी शिफारस स्त्रीरोगतज्ज्ञ अलेक्झांड्रे पुपो करतात.

4. मेनस्ट्रुअल कप लावल्यास काय करावं आणि काय करू नये?

साधारणपणे, मेनस्ट्रुअल कप बसवल्यावर लघवीला त्रास होत नाही. मात्र दबाव जाणवला तर याचा अर्थ असा की, हा कप जननेंद्रियाच्या अजून थोडं आतमध्ये सरकवला पाहिजे .

मूल होऊ नये म्हणून जर एखाद्या महिलेने गर्भाशयात IUD लावली असेल तर त्यांनाही कपचा वापर करताना अडचण येत नाही. कारण दोन्ही गोष्टींची जागा वेगळी आहे. एक गर्भाशयाच्या आत आहे, दुसरा जननेंद्रियाच्या आत आहे.

मेनस्ट्रुअल कप, सॅनिटरी पॅड, मासिक पाळी, आरोग्य, महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मेनस्ट्रुअल कप

मात्र, सेक्स करताना हा कप जननेंद्रियातून काढावा लागतो. ज्या स्त्रियांनी यापूर्वी कधीही सेक्स केला नाही त्यांच्यासाठी अजून थोडा मऊ प्रकारातला कप उपलब्ध आहे.

तज्ज्ञांच्या मते, अजूनही स्त्रियांना मेनस्ट्रुअल कपबद्दल फारशी माहिती नाही, कारण याबद्दल फारसं बोललं जात नाही.

5. मेनस्ट्रुअल कप वापरण्याचे फायदे आणि तोटे

डॉक्टरांच्या मते, मेनस्ट्रुअल कपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती टिकाऊ वस्तू आहे.

असं मानलं जातं की, एका महिलेला तिच्या संपूर्ण आयुष्यात सरासरी 450 वेळा मासिक पाळी येते. याचा अर्थ एका महिलेला तिच्या आयुष्यात सुमारे 7,200 सॅनिटरी पॅड वापरावे लागतील. पण मेनस्ट्रुअल कपचं वैशिष्ट्य असं आहे की हा एक कप 3 ते 10 वर्षे टिकतो.

याचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यातून निर्माण होणारा व्हॅक्यूम मासिक पाळीच्या रक्ताला हवेच्या संपर्कात येऊ देत नाही, त्यामुळे या काळात अंतर्वस्त्राला वास येत नाही.

स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते, याचा तोटा म्हणजे सर्वच महिलांना हा कप नीट वापरता येईल असं नाही. त्यामुळे त्यांना काही अडचणींना सामोरं जावं लागण्याची शक्यता असते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)