मुंबईत 'या' दोन पोस्टरमुळे वातावरण तापलं

मुंबईत शिवसेना आणि मनसेत पुन्हा पोस्टर वॉर सुरू झालंय.
राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याचा विरोध केल्यानंतर, शिवसेनेने राज यांच्याविरोधात दादर भागात पोस्टर लावलं.
त्याला प्रत्युत्तर म्हणून, शुक्रवारी (15 एप्रिल) मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं पोस्टर लावण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना-मनसेतील पोस्टर वॉर काही नवीन नाही. पण, आता नेमक्या कोणत्या पोस्टरवरून मुंबईत राडा सुरू झालाय?
मनसेने लावलेलं पोस्टर काय आहे?
शुक्रवारी सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं पोस्टर लावण्याचा प्रयत्न केला.
मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडत जप्त केलेलं पोस्टर फाडून टाकलं. पण, या पोस्टरमध्ये आहे तरी काय?
या पोस्टरमध्ये काल, आज आणि उद्या असे तीन भाग करण्यात आलेत. काल या भागात उद्धव ठाकरे यांचा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो दाखवण्यात आलाय. तर, आज या शीर्षकाखाली उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा फोटो दाखवण्यात आलाय.
तर, उद्या या भागात फक्त एक प्रश्नचिन्ह दाखवण्यात आलंय. उद्धव ठाकरेंची पुढची भूमिका काय असेल? याबाबत मनसेने प्रश्न उपस्थित केलाय.
या पोस्टरबाबत मनसेचे शाखाअध्यक्ष संतोष माळी म्हणाले, "शिवसेनेची बदलती भूमिका आम्ही या पोस्टरमधून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हिंदुत्व सोडून त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती कशी केली का आमचा प्रश्न होता."
काल, आज, उद्या ? काय आहे पोस्टर वॉर?
शिवसेना-मनसेत हे पोस्टर वॉर सुरू झालं राज ठाकरेंच्या गुढी पाडव्याच्या भाषणानंतर. राज ठाकरे यांनी या सभेत मशिदीवरील भोंग्यांचा मुद्या उचलून धरला. मशिदीसमोर मोठ्याने हनुमान चालीसा लावा असे आदेश दिले. राज यांनी मराठी अस्मिता सोडून हिंदुत्वाची कास धरली, अशी टीका त्यांच्यावर झालीय
त्यानतंर, शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी राज ठाकरे भाजपची भाषा बोलत असल्याची टीका केली होती.

फोटो स्रोत, BBC
गुरूवारी सकाळी दादर भागात शिवसेना भवनासमोर शिवसेनेने पोस्टरबाजी केली. या पोस्टरवर काल, आज आणि उद्या या शीर्षकाखाली राज ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले होते.
पहिल्या फोटोत डोक्यावर मुस्लिम समाजाची टोपी घातलेला राज यांचा फोटो होता. तर, आज या भगव्या रंगातील शीर्षकाखाली हनुमान असं लिहिण्यात आलं होतं. राज यांनी धरलेली हिंदुत्वाची कास यावर शिवसेनेने टीका केली. आणि उद्या या भागात फक्त एक प्रश्नचिन्ह दाखवण्यात आलं होतं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर नेहमी भूमिका बदलल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे या पोस्टरच्या माध्यमातून शिवसेनेने आता राज पुढे काय करतील? असा सवाल उपस्थित केला. शिवसेना नेत्यांकडून या पोस्टरबाबत प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती.
मुंबई पोलिसांनी शिवसेनेकडून लावण्यात आलेले हे पोस्टर्स काही वेळातच काढून टाकले होते.
शिवसेना मनसे पोस्टर वॉर?
शिवसेना मनसेतील पोस्टर वॉर मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. मराठी अस्मितेच्या मुद्यावर हे दोन्ही पक्ष अनेकवेळा आमने-सामने आलेले पहायला मिळाले आहेत. येणाऱ्या काही महिन्यात मुंबईत महापालिका निवडणूक आहे.
गेल्या निवडणुकीत मनसेला मुंबईत फारसं यश मिळालेलं नव्हतं.
काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावर दोन्ही पक्षात ट्विटरवॉर रंगलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)




