धर्मवीर ट्रेलर: आनंद दिघेंच्या हंटरचा 'प्रसाद' आणि निवाड्याची अशीही पद्धत

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

(ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर हा चित्रपट येत आहे.)

मध्यरात्रीपर्यंत लोकांची रीघ लागलेली...ठाण्याच्या टेंभी नाक्याचा गजबजलेला परिसर..घराबाहेर चपलांचा खच पडलेला...आणि न्यायाच्या प्रतिक्षेत उभे लोक..

'आनंद आश्रमा'बाहेर हे चित्र रोजचचं होतं. आनंद आश्रम, दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचं ठाण्याचं निवासस्थान. याच घरातून ते जनता दरबार चालवत. स्थानिकांच्या तक्रारींचा तात्काळ निवाडा या जनता दरबाराची खासियत होती.

हा जनता दरबार चर्चेत असायचा एका दुसऱ्या कारणासाठी. 'हंटर'च्या प्रसादासाठी. टवाळखोर, महिला-मुलींची छेड काढणारे, हुल्लडबाज आणि भ्रष्टाचाऱ्यांना प्रसंगी चाबकाचे फटके देण्यास आनंद दिघे मागेपुढे पहात नव्हते.

हंटरचा वापर आणि लोकांना न्याय देण्यासाठी समांतर कोर्ट चालवण्यावरून आनंद दिघेंवर टीकाही झाली होती.

आनंद दिघे आणि हंटर

आनंद दिघे यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या प्रत्येकाला या हंटरची माहिती होती. हा हंटर सामान्यांना दिसेल अशा ठिकाणी ठेवण्यात येत नव्हता. काही निवडक लोक जाऊ शकतील अशा खोलीत हा हंटर ठेवलेला असायचा.

घरातील आतल्या खोलीतील भिंतीवर, हा हंटर खुंटीवर टांगून ठेवलेला असायचा.

ठाण्यातील दै. 'जनादेश' संपादक कैलाश महापदी सांगतात, "आनंद दिघे नाथ पंथीय होते. त्यामुळे त्यांच्याकडे पहिल्यापासूनच चाबूक होता," ते त्याचा पूजेसाठी वापर करायचे. हा हंटर कोणाला मारण्यासाठी नव्हता.

1990 च्या दशकात मुंबई, ठाण्यासारख्या शहरात गुंडगिरी, महिलांची छेडछाड यांसारखी प्रकरणं वाढू लागली. हुल्लडबाजांची शहरात दहशत पसरली होती. आनंद दिघेंना महिलांसोबत असभ्यवर्तन आणि संघटनेची प्रतारणा कधीच सहन होत नसे, राजकीय विश्लेषक सांगतात.

हंटरचा प्रसाद कोणाला मिळायचा? कैलाश महापदी पुढे म्हणाले, "महिलांची छेड काढणाऱ्या हुल्लडबाजांना पकडून लोक आनंद दिघेंकडे घेऊन जात. या टपोरी मुलांना मग हंटरचा प्रसाद मिळायचा."

आनंद दिघेंच्या घरी दिवसभर लोकांची वर्दळ असायची. या निर्णयाला लोक निवाडा म्हणत. आनंद दिघे ठाण्यात शिवसेनेचं निर्विवाद नेतृत्व होतं. ठाण्यात त्यांचा मोठा दरारा होता. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "आनंद दिघे यांच्या हंटरचे फटके भ्रष्टाचारी, आणि अत्यंत मोठी चूक केलेल्यांना बसायचे."

लोकांचे पैसे लुबाडणाऱ्यांची त्यांना चीड होती. शिवसेना सत्ते असतानाही आनंद दिघे यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावर प्रश्न उपस्थित केले होते. केदार दिघे पुढे सांगतात, "प्रशासनावर त्यांची पकड होती. लोकांना भीती होती. पदावर बसून पैसे खाल्ले तर, त्याचा न्यायनिवाडा आनंद मठात होत असे." नगरसेवक असो किंवा वरिष्ठ पदावरील व्यक्ती, वेळ प्रसंगी त्यांनी चाबकाचे फटके देखील दिले आहेत.

'ठाण्याचे बाळ ठाकरे' म्हणून आनंद दिघे ओळखते जात.

कैलाश महापदी यांनी आनंद दिघेंचा जनता दरबार अनेकवेळा पाहिलाय. "आनंद दिघे जनता दरबारात कधीच हंटर घेऊन बसायचे नाहीत," आनंद आश्रमातील बाहेरच्या व्हरांड्यात लोक रांगा लावायचे आणि आतील खोलीत आनंद दिघे लोकांच्या समस्या ऐकून निर्णय घ्यायचे. या खोलीतच एका भिंतीवर हा हंटर टांगलेला असे.

राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर सांगतात, "आनंद दिघेंनी उठसूठ कोणावरच हंटर उगारला नाही. त्यांचा क्रोध अनावर झाला तेव्हाच ते हंटर काढायचे." शिवसैनिकांसाठी हा हंटर दहशतीचा विषय होता. आनंद दिघे यांना भेटण्यासाठी येणारे शिवसैनिक या हंटरकडे भीतीयुक्त नजरने पहायचे.

ते पुढे म्हणाले, "आनंद दिघे यांच्या कार्यालयात मी अनेकवेळा शिवसैनिकांना हंटरला नमस्कार करताना पाहिलं आहे." याचं कारण, आनंद दिघे आणि हंटरबाबत भीतीयुक्त आदर. संघटना आणि महिला यांच्याबाबतीत असभ्य वर्तन करणाऱ्यांना या हंटरचा प्रसाद मिळायचा.

या घटनेनंतर आनंद दिघेंनी हंटर वापरला नाही...

दरम्यानच, एक घटना अशी घडली की, आनंद दिघेंनी हंटरचा वापर पूर्णत: बंद केला. ही घटना कोणती होती? नेमकं काय झालं होतं?

जनादेश वृत्तपत्राचे संपादक कैलाश महापदी म्हणाले, "ठाण्यातील तीन नगरसेवकांना आनंद दिघेंनी हंटरने मारलं होतं." नगरसेवकांना खांबाला बांधून फटके दिल्याची बातमी उघडकीस आली. आणि त्यानंतर "आनंद दिघेंनी हंटर मरेपर्यंत कधीच वापरला नाही."

आनंद दिघेंची ही कार्यशैली नेहमीच वादात राहिली होती. त्यामुळे काही काळानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली.

राजेश कोचरेकर म्हणाले, "काळ बदलू लागला त्यानुसार, आनंद दिघेंनी हंटरचा वापर कमी केला." पण, आजही आनंद दिघेंच्या आनंद आश्रमात हा हंटर ठेवण्यात आलाय.

जनता दरबारावर बाळासाहेबांची नाराजी

जनतेच्या प्रश्नांचा तात्काळ निवाडा होत असल्यामुळे आनंद दिघेंचा जनता दरबार लोकांमध्ये चांगलाच प्रसिद्ध होता.

आनंद आश्रमात समस्याग्रस्त लोक सकाळी 6 वाजल्यापासून जमलेले असायचे. दिघे लोकांच्या तक्रारी ऐकून घ्यायचे. बघतो, नंतर करतो, अशी त्यांच्या कामाची पद्धत नव्हती. बीबीसीशी होलताना मुक्त पत्रकार रवींद्र पोखरकर म्हणाले होते, "तक्रार योग्य वाटल्यास ते संबंधितांना लगेच फोन लावायचे. प्रसंगी सांगूनही काम नाही होत म्हटल्यावर त्यांनी हातही उगारलेला आहे. यामुळे पोलीस आणि प्रशासन या सगळ्यांमध्ये त्यांचा धाक निर्माण झाला."

पण, जनता दरबाराच्या माध्यमातून समांतर न्यायालय सुरू झाल्यामुळे आनंद दिघेंवर मोठी टीका झाली. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही आनंद दिघेंचा हा जनता दरबार आणि निवाड्याचा प्रकार आवडला नव्हता.

लोकसत्ताचे वरिष्ठ राजकीय पत्रकार संतोष प्रधान म्हणाले, "बाळासाहेब ठाकरेंना आनंद दिघेंचा जनता दरबार फारसा रूचला नव्हता. त्यांनी एक-दोन वेळा याबाबत अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली होती."

केदार दिघे म्हणतात, "आनंद दिघे यांच्या दरबारातून कोणीच रिकाम्या हाताने कधी जात नसे. कौटुंबिक भांडणं असो किंवा नोकरीची समस्या. या जनता दरबारात प्रत्येकाला मदत मिळायची."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)