You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुणे : नास्तिक मेळावा रद्द का झाला?
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहामध्ये 10 एप्रिलला शहीद भगतसिंग विचारमंचच्या वतीने नास्तिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पण, पोलिसांनी मेळाव्याच्या दोन दिवस आधी परवानगी नाकारल्याने हा मेळावा आयोजकांना रद्द करावा लागला.
हा मेळावा रद्द झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस आणि सरकारवर टीका देखील करण्यात आली.
पुण्यातील शहीद भगतसिंग विचार मंच या ग्रुपच्या माध्यमातून 2014 सालापासून नास्तिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. जे लोक कुठल्याही धर्माला किंवा देवाला मानत नाहीत अशा लोकांचा हा मेळावा असतो. या मेळाव्यात वक्ते उपस्थितांना मार्गदर्शन करतात.
या मेळाव्यात आत्तापर्यंत अनेक विचारवंत, कलाकारांनी हजेरी लावली आहे. पहिल्या नास्तिक मेळाव्याचे अध्यक्ष दिवंगत ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू हे होते. यंदा या मेळाव्याचं सातवं वर्ष होतं. लेखिका मुग्धा कर्णिक या मेळाव्याच्या अध्यक्ष होत्या.
9 तारखेला विश्रामबाग पोलिसांकडून आयोजकांना पत्र लिहिण्यात आलं. त्यात 'कार्यक्रमाची रुपरेषा आणि नास्तिक मेळाव्यात सहभागी सदस्यांसमोर वक्ते कोणते विचार मांडणार आहेत. कोणत्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही.
'हा कार्यक्रम 10 एप्रिल ऐवजी 24 एप्रिल रोजी घ्यावा. तसेच कार्यक्रमाची रुपरेषा काय असणार आणि वक्ते कोणते विचार मांडणार याबाबत लिखीत माहिती द्यावी,' असं पोलिसांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.
पोलिसांनी जरी पत्रात कार्यक्रमाची रुपरेषा विचारली असली तरी रामनवमीच्या दिवशी हा कार्यक्रम असल्याने तसेच काही हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांकडे विरोध दर्शवल्याने मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे.
नितीन हांडे हे आयोजकांपैकी एक सदस्य आहेत. हांडे म्हणाले, ''दरवर्षी आम्ही नास्तिक मेळावा हा भगतसिंग यांच्या स्मृतिदिनाच्या जवळच्या रविवारी घेत असतो. कोरोनामुळे दोन वर्षं हा मेळावा होऊ शकला नाही. 2020 ला आम्ही मेळावा घेणार होतो. एस. एम. जोशी सभागृहाचं भाडं देखील भरलं होतं.
''पण, लॉकडाऊन लागल्याने तो झाला नाही. त्यामुळे एस. एम. जोशी सभागृहाकडे आमचे पैसे जमा होते. 27 मार्च आणि 3 एप्रिल या दोन्ही रविवारी सभागृह उपलब्ध नव्हते. त्यामुळे 10 तारखेचा रविवार मिळत होता.''
''10 एप्रिलला रामनवमी आहे हे आमच्या पाहण्यात आलं नाही. कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवून रामनवमीच्या दिवशी तुमचा कार्यक्रम आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांनी तुमच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी त्यांचं निवेदन तोंडी दिलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा मेळावा पुढे ढकलावा अशी त्यांनी आम्हाला विनंती केली.''
पोलिसांचं म्हणणं काय?
मेळाव्याची तारीख का बदलण्यास सांगण्यात आली, याबाबत बीबीसी मराठीने विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांना विचारलं. माने म्हणाले, ''आयोजकांनी आम्हाला कार्यक्रमाबाबत कुठलीच माहिती दिली नव्हती. केवळ नास्तिक मेळावा घेणार असल्याचं कळवलं होतं.''
ते पुढे म्हणाले, ''10 एप्रिलला रामनवमी होती. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने भाषणाचे डिटेल्स आणि कार्यक्रमाची रुपरेषा मागितली होती. त्यावेळी त्यांच्याकडे ती माहिती नव्हती. कार्यक्रमाची संपूर्ण माहिती द्यावी किंवा तारीख पुढे ढकला असं त्यांना सांगण्यात आलं. कायदा सुव्यवस्थाच्या अनुषंगाने त्यांना दुसऱ्या एखाद्या दिवशी हा कार्यक्रम घेण्याचे सांगण्यात आले होते.''
नास्तिक मेळावा नेमका असतो तरी काय?
गेल्या सात वर्षांपासून नास्तिक मेळावा पुण्यात घेण्यात येतोय. असा मेळावा घेण्याची गरज का निर्माण झाली याबाबत सांगताना हांडे म्हणाले, ''नास्तिक असणं हे अनैतिक आहे अशा दृष्टिकोनातून समाजात पाहिलं जातं. नास्तिक व्यक्ती विचाराअंती नास्तिक झालेला असतो. समाजात तसेच कुटुंबाकडून त्याच्याकडे नकारात्मक भावनेनं पाहिलं जातं. त्यामुळे अशा लोकांना वर्षातून एकदा एकत्र आणण्याचा प्रयत्न असतो.
''या माध्यमातून आपल्यासारखी अनेक लोक आहेत आणि आपण काळाच्या पुढे आहोत याची जाणीव त्यांना करुन देण्यासाठी हा मेळावा घेतला जातो. आस्तिक लोकांना नास्तिक करण्याचा यामागे मुळीच हेतू नाहीये. फक्त नास्तिकांना एकत्र करणं हा या मेळाव्याचा हेतू आहे.''
''सहा मेळावे आयोजित केले तेव्हा केव्हाच परवानगी नाकारली गेली नव्हती, त्याबरोबरच कधीही वक्त्यांची भाषणे लिहून मागितली नव्हती,'' असं देखील हांडे म्हणाले.
'नास्तिक मेळाव्याची गरज काय?'
एकीकडे मेळाव्याच्या आयोजकांचं असं म्हणणं आहे, तर दुसरीकडे नास्तिक मेळाव्याची वेगळी गरज काय?, असा सवाल हिंदू महासंघ पक्षाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी बीबीसी मराठीबरोबर बोलताना उपस्थित केला आहे.
नास्तिक मेळाव्याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, "नास्तिक मेळाव्याची वेगळी गरज काय? भगतसिंग यांनी कधी असा मेळावा घेतला होता का? आस्तिक, नास्तिक हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. नास्तिकतेवर ज्यांनी लेखन केलं त्या चार्वकला देखील हिंदू धर्म मानतो.
"नास्तिकांचे मेळावे घेऊन हिंदू धर्माला का आवाहन करायचे? हाच कार्यक्रम ईद, मोहरम या दिवशी आयोजक घेऊन दाखतील का?"
दरम्यान, नास्तिक मेळावा रद्द झाल्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष मुग्धा कर्णिक आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम ऑनलाईन आयोजित केला. यात कर्णिक यांनी आपलं म्हणणं मांडलं. त्याचबरोबर फेसबुकवर देखील त्यांनी त्यांचं संपूर्ण भाषण पोस्ट केलं.
बीबीसी मराठीशी बोलताना मुग्धा कर्णिक म्हणाल्या, ''पोलीस परवानगी नाकारताना म्हणाले कार्यक्रमाची रुपरेषा द्या, आता नास्तिक मेळावा म्हटल्यावर वक्ते नास्तिक विचारच मांडणार ना. एकीकडे पोलिसांनी रुपरेषा द्या असं पत्र दिलं तर दुसरीकडे तोंडी सांगितलं की काही लोकांनी मेळाव्यावर आक्षेप घेतला आहे. पोलिसांवर ताण आहे, त्यामुळे तुम्ही पुढे ढकला.''
नास्तिक म्हणजे काय याबाबत सांगाताना कर्णिक म्हणाल्या, ''नास्तिक म्हणजे निरीश्वरवादी आणि विवेकवाद. आमचा कुठल्याही धर्माला विरोध नाही. धर्माच्या अविवेकीपणाला आमचा विरोध आहे.''
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)