संजय बियाणी: नांदेडमध्ये दिवसाढवळ्या व्यावसायिकाची हत्या, घरासमोरच झाला हल्ला

फोटो स्रोत, Facebook
नांदेड शहरात अज्ञात हल्लाखोरांनी केलेल्या गोळीबारात उद्योगपती संजय बियाणी यांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
मंगळवारी सकाळी अकरा वाजता बियाणी नांदेड शहरातील शारदानगर येथील घराबाहेर निघताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर आठ गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. दिवसाढवळ्या नांदेडमध्ये घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे.
बियाणी यांच्यावरील गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बियाणींच्या हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. तीन वर्षापूर्वी संजय बियाणी यांना कुख्यात गुंड रिंदाने खंडणीसाठी धमकी दिली होती, मात्र तेव्हा पुरवलेली सुरक्षा काही दिवसांपूर्वीच कमी करण्यात आली होती. तीन महिन्यांपूर्वीच संजय बियाणी यांच्यासह 15 जणांची सुरक्षा काढण्यात आली होती.
दोघाजणांवर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र संजय बियाणी यांनी उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला.
संजय बियाणी यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक गठीत करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितलं. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास दोन हल्लेखोरांनी त्याच्या गाडीचा पाठलाग केला. घराजवळ गाडी येताच दुचाकी समोर लावून त्यांनी संजय बियाणी यांच्यावर आठ गोळ्या झाडल्या. घरातून बाहेर आलेल्या एका कामगारावर पण आरोपींनी गोळी झाडली.
खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा गोळीबार कुणी केला याचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात तणावाचे वातावरण पसरलं आहे.

फोटो स्रोत, Nanded Police
गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली आहे. नांदेडमध्ये गावठी पिस्तुलांचा वापर वाढल्याचं चित्र आहे.
गोळीबाराच्या घटना सर्रास घडत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








