उद्धव ठाकरे भाजपला म्हणतात: 'मी तुमच्यासोबत येतो, मला तुरुंगात टाका'

फोटो स्रोत, Getty Images
उगीचच आमच्या कुटुंबाची बदनामी करू नका. तुम्हाला सत्ता पाहिजे असल्यास सांगा, मी तुमच्यासोबत येतो, मला तुरुंगात टाका, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष भाजपवर टीका केली आहे.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार टोले लगावल्याचं दिसून आलं.
यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाबाबतही उल्लेख केला. ते म्हणाले, "प्रथा परंपरा आपण पाळल्या पाहिजेत. राज्याची एक वेगळी संस्कृती आहे. राज्यपालांच्या भाषणाच्या सुरुवातीला गोंधळ झाला, तो व्हायला नको होतो. राज्यपालपद हे संवैधानिक, हे विरोधी पक्षालाही चांगलंच माहिती आहे. राज्यपालांच्या भाषणाच्या सुरुवातीला गोंधळ झाला, तो व्हायला नको होता. राज्यपाल राष्ट्रगीतालाही थांबू शकले नाहीत. देशात असा अपमान कोणी केला नव्हता. राज्यपालांचं अभिभाषण ऐकलं असतं तर त्यांचं म्हणणं आपल्याला कळलं असतं.
ते पुढे म्हणाले, "कोरोना काळात राज्याची यंत्रणा जेव्हा सतर्क होती त्याचा मला अभिमान आहे. फक्त पर्यावरण पर्यावरण म्हणून तुम्ही टीका करत आहात. पण स्कॉटलॅंडचा पुरस्कार देशात फक्त महाराष्ट्राला मिळाला. त्याचाही अभिमान आहे. काही लोक आरशात बघितलं तरी भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला म्हणायचं. कशात झाला भ्रष्टाचार? तर आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झाला भ्रष्टाचार. पण तो झाला हे बघण्यासाठी तोंड तरी आरशात बघावं लागेल."
शासन बेवड्यांचं आहे, असा आरोप झाला. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र तुम्ही म्हटलं. पण आपल्या इथे वाईन सरसकट किराणा दुकानात मिळत नाही. ज्यांच्याकडे तशी कपाटे आहे, तिथंच वाईन मिळते. शेजारच्या मध्य प्रदेशात जे काही सुरू आहे, ते पाहून त्याला मद्यप्रदेश तुम्ही म्हणणार का? देशात एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत मद्यविक्रीची दुकाने सर्वात कमी महाराष्ट्रात आहेत. रावणाची तोंड उडवली तरी पिक्चरमध्ये दिसत तसं नवीन तोंड येतं. मग नंतर कळतं रावणाचा जीव बेंबीत आहे. काहींना केंद्रात सरकार मिळालं तरी बेंबीत नाही तर मुंबईमध्ये असतो, असं ठाकरे म्हणाले.

फोटो स्रोत, facebook
म्युनिसिपालिटीची शाळा म्हणून हिणवलं जातं. पण मुंबई ही आठ भाषांमध्ये शिक्षण देणारी जगातली एकमेव महापालिका आहे. कोरोना बरा होतो, पण द्वेषाची कावीळ बरी कशी होणार? कोरोनात महापालिकेने चांगलं काम केलं. कोरोनात माननीय पंतप्रधानांनी सर्व राज्यांना चांगली मदत केली. आपल्यासमोर कोणी मरत असेल तर डेंटर काढत बसणार का? पालिकेने शॅार्ट नोटीस काढून डेंटर काढली. सर्वात कमी बजेट असलेल्यांना काम दिलं. धारावी वाचवली याचं कौतुक कोणालाच नाही? पालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. पण भ्रष्टाचार कुठे झाला? महापालिकेने इतकं उत्तम काम केलं. एपिडेमिक अॅक्टमध्ये अशा पद्धतीने टीका करता येत नाही. तरीही कोव्हीड काळात भ्रष्टाचार केला म्हणतात याचं दुख: आहे.
ओबामाने कधी ओसामाच्या नावाने मते मागितली का? दाऊदच्या घरात घुसून त्याला मारा, याला हिंमत म्हणतात. आम्ही देशद्रोह्यांच्या विरोधातच आहोत. नवाब मलिकांचा राजीनामा मागताना तुम्ही काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींसोबत सत्तेत होता, हे लक्षात ठेवा. मुदस्सर लांबे फडणवीसांना हार घालतानाचे फोटो आहेत. त्यामुळे नुसतं आरोप करून राज्य चालत नाही. सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावू बसले असते की नाही, असंही त्यांनी म्हटलं.
ठाकरे कुटुंबीयांवर होत असलेल्या आरोपांनाही त्यांनी आज प्रत्युत्तर दिलं. कुटुंबाची बदनामी करण्याऐवजी मैदानात येऊन लढा. पोरांचे चाळे पाहणारा हा धृतराष्ट्र नाही, तर हा महाराष्ट्र आहे. काही मतभेद असतील, तर सांगा. पण उगाच बदनामी करू नका. तुम्हाला सत्ता पाहिजे आहे तर मी तुमच्या सोबत येतो, मला तुरुंगात टाका, पण कुटुंबाची बदनामी करू नका, मी कृष्णाचा अवतार नाही, पण तुम्ही कंस नाहीत, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे.
यादरम्यान, बहिणाबाई चौधरी यांची कविता उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखवली. तसंच कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार काय करतंय? केंद्र सरकारने निःपक्ष भूमिका मांडली पाहीजे. पण ते कोणाची बाजू घेत आहेत हे दिसतंय, असं ते म्हणाले.
माझ्या सर्जरीच्या काळात सर्वांनी मला सांभाळून घेतलं, असं म्हणत सर्वांचे आभारही उद्धव ठाकरे यांनी मानले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणाने समाधान न झालेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग केला.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, "भावनात्मक अपील करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलाय. सरकार अहंकारामध्ये आहे. एसटी संपामुळे विद्यार्थ्यांनी त्रास होतोय. सरकारने अडमुठी भूमिका बदलली पाहिजे."विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते यांच्यासंदर्भात आलेल्या निकालाबद्दल ते म्हणाले, "दरेकरांना हायकोर्टात जाण्याची परवानगी कोर्टाने दिलीये. आम्ही मुकाबला करू. पण पुढील 15 दिवसात प्रत्येक सहकारी कारखान्यात मजूर, माथाडी वर्गातून कोण गेली याची माहिती काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करू. यांच्यावर कारवाई करावी लागेल. "

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








