उद्धव ठाकरे : अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा - शिवसेना आमदार

तानाजी सावंत

फोटो स्रोत, Facebook

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतल्या नाराजीच्या बातम्या सतत येत आहेत. त्या बहुतांशी 'महाविकास आघाडी'चं नेतृत्व असूनही सेनेच्या या सरकारमधल्या होणाऱ्या कुचंबणेबद्दल आहेत. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंतांच्या वक्तव्यानं तर पुन्हा एकदा या नाराजीला नवी फोडणी मिळालीय.

शिवसेना आमदार तानाजी सावंत म्हणाले, "अर्थसंकल्पात 65-60 टक्के बजेट राष्ट्रवादीला, 30 ते 35 काँग्रेसला, 16 टक्के शिवसेनेला त्यातही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आमचे असल्यानं पगार काढावे लागतात. त्यात 6 टक्के जातात. शिवसेनेला विकासकामांसाठी केवळ 10 टक्के बजेट मिळालं आहे."

सावंत पुढे म्हणाले, "राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य देखील हसन मुश्रिफांना भेटून कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. आम्हाला केवळ गोड बोललं जातं. आम्ही केवळ आदेशाची वाट बघतोय, जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करू. प्रचंड नाराजी आमची राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आहे."

"ही सत्ता तुम्ही स्वप्नात तर पहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली, तुम्ही त्यावरच अन्याय करता. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असे ठरलेलं असताना का असं होतं? आमच्या नादीला लागू नाका, तुम्ही शंभर मारले आणि आमचा एकच दणकट बसलं की आईचे दूध आठवेल. मागील अडीच वर्षात केवळ अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा," असंही तानाजी सावंत म्हणाले.

नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीतील निधीवाटपावर भाष्य केलं होतं. त्यावेळी बीबीसी मराठीनं त्या वक्तव्याच्या राजकीय अर्थांचा आढावा घेतला होता.

'ठाकरे सरकार' असूनही शिवसेनेची 'महाविकास आघाडी'त कुचंबणा?

त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत अर्थसंकल्पावर बोलतांना सगळा निधी अजित पवारांनी हुशारीनं राष्ट्रवादीकडे वळवला आहे हे विस्तारानं सांगून एक काडी टाकताच ते नाकारतांना अजित पवारांची पण धावपळ झाली.

पण फडणवीसांचं म्हणणं केवळ राजकीय लावालावी नव्हती असं म्हणता येईल जर आपण गेल्या काही दिवसांमध्ये आलेली सेनेच्या काही महत्वाच्या नेत्यांची वक्तव्यं पाहिली.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

सेनेच्या वीस-पंचवीस आमदारांचा एक गट नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांना नाराजी दूर करण्याची जबाबदारी दिली होती, असंही सेनेच्या गोटातून सांगितलं जात होतं. पण आता आलेली जाहीर वक्तव्य सेनेच्या गोटात चिंता वाढवणारी आहेत.

उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर सेनेचे सगळे खासदार भाजपाचा गड असलेल्या विदर्भात शिवसंपर्क मोहिमेसाठी गेले आहेत. पण त्यागोदर खासदार गजानन कीर्तीकर, श्रीरंग बारणे यांची वक्तव्यांतून सेनेची होत असलेली कुचंबणा स्पष्ट दिसते आहे.

त्याचवेळेस कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीनिमित्तानं राजेश क्षीरसागरांची नाराजी सेनेसोबत महाविकास आघाडीचीसाठीही धोक्याची ठरु शकते.

अगोदरच नवाब मलिकांच्या अटकेनंतर 'राष्ट्रवादी' त्यांच्या राजीनामा न घेण्यावर ठाम राहिल्यानं भाजपा शिवसेनेला सतत टार्गेट करत आहे.

'दाऊद' प्रकरणावरून भूमिका घेतांना आघाडीत सेनेची अवस्था बिकट आहे. 'हिंदुत्वा'च्या मुद्द्यावरुन सेनेला बऱ्याचदा सबुरीची भूमिका मित्रपक्षांकडे बघून घ्यावी लागते.

नुकताच एमआयएम-राष्ट्रवादी भेटीनं शिवसेनेला एवढा मनस्ताप झाला होता की 'मेलो तरी एमआयएम सोबत युती करणार नाही' असं उद्धव ठाकरेंना त्यांच्या भाषणात म्हणावं लागलं होतं. आता स्वत:च्याच नेत्यांनी एका प्रकारे आरसा दाखवल्यावर सेना आघाडीतलं स्वत:चं स्थान कसं अधिकाराचं करणार हे पाहायला हवं.

'आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, पण प्रत्यक्षात पवार सरकार'

शिवसेनेचे मुंबईतले खासदार गजानन कीर्तीकरांचं हे वाक्य आहे. 20 जानेवारीला ते कोकणात दापोलीजवळच्या एका गावात रस्त्याच्या भूमिपूजनाला आले होते. त्यावेळेस त्यांनी आपल्या भाषणात असं म्हटलं.

देवेंद्र फडणवीसांनी जे म्हटलं त्याच चालीवर कीर्तीकरांनी सध्या राज्य सरकारमध्ये निधी वाटपावरुन काय चाललं आहे हे सांगितलं, असं म्हटलं गेलं.

पवार ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

कीर्तीकर म्हणाले की, "ग्रामविकास खात्याच्या निधीमध्ये पळवापळवी या सरकारमध्ये होते आहे. मुंबईत हा प्रश्न येत नाही कारण तिथं नगरविकास खात्याकडनं आणि मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवतो. पण इकडं तसं होत नाही. निधी पळवला जातो. सांगतांना आम्ही सांगतो की हे ठाकरे सरकार आहे, पण प्रत्यक्षात लाभ मात्र पवार सरकार घेतं आहे." आता ग्रामविकास खातं हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे.

"अजितदादांना मानलंच पाहिजे. एकदम ठाम. सगळा पैसा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी," देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले होते. मुद्दा एकूण खर्चाला दिलेल्या निधीचा 57 टक्के भाग हा राष्ट्रवादीकडच्या खात्यांचा तर केवळ 16 टक्के भाग हा सेनेकडच्या खात्यांसाठी असल्याचा होता.

अजित पवारांनी हे फडणवीसांचं केवळ राजकीय विधान असून 'प्रत्येक निर्णयावर शेवटची सही ही राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची असते' अशी सारवासारव केली. मात्र कीर्तीकरांच्या कोकणातल्या वक्तव्यानं सेनेतला निधीबाबतचा असंतोष समोर आला आहे.

'मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचा राष्ट्रवादी गैरफायदा घेतंय'

हे वाक्य शिवसेनेच्या दुसऱ्या खासदारांचं आहे. श्रीरंग बारणे मावळ लोकसभा मतदारसंघातून सेनेचे खासदार आहेत. त्यांनी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल म्हटलं आहे. 'राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करतंय. निधीवाटपातही समानता नाही. राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतंय' असं श्रीरंग बारणे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

बारणेंच्या या वक्तव्याची मोठी चर्चा आहे. त्याचा संबंध केवळ 'महाविकास आघाडी' सरकारमध्ये असलेल्या धुसफुशीबद्दल नाही आहे तर बारणेंच्या मतदारसंघातल्या वादाशीही आहे.

बारणे दुसऱ्यांदा मावळमधून खासदार झाले तेव्हा राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे त्यांच्याविरुद्ध उभे होते. पवारांना हरवून बारणे खासदार झाले. आता 'महाविकास आघाडी' आहे तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी अशी चर्चा 'राष्ट्रवादी'च्या गोटातून सुरु झाल्या. बारणे त्याबद्दल नाराज आहेत आणि त्यांनी ही नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे.

"महाविकास आघाडी म्हणायची आणि मित्रपक्षाविषयी दुजाभाव करायचा हे थांबलं पाहिजे," असं बारणे यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्यावरूनच सेनेच्या अंतर्गत आघाडीवरून काय मत आहे हे पुढं येतं आहे.

कोल्हापूरमधली उघड नाराजी

कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघात सध्या पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पण त्या निमित्तानंही 'महाविकास आघाडी'त शिवसेनेची होत असलेली घुसमट पुन्हा समोर आली आहे. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हे या नाराजीचा चेहरा आहेत. निमित्त आहे ही जागा कॉंग्रेसला सोडल्याचं.

राजेश क्षीरसागर उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजेश क्षीरसागर

या मतदारसंघातून क्षीरसागर हे आमदार होते. पण गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी त्यांच्या पराभव केला. वर्षभरापूर्वी जाधव यांचं निधन झालं. त्यामुळे आता पोटनिवडणूक होत आहे.

या मतदारसंघातून जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना कॉंग्रेसनं उमेदवारी दिली आहे आणि त्याच महाविकास आघाडीच्याही उमेदवार आहेत. पण त्यामुळे अगोदर इथे शिवसेनेचे आमदार असलेले क्षीरसागर नाराज झाले, कारण याचा अर्थ त्यांचा मतदारसंघ आघाडीमध्ये शिवसेनेनं कॉंग्रेसला सोडला असा होतो.

त्यावरून क्षीरसागर हे नाराज झाले. त्यांनी पोटनिवडणूक झाल्यावर लगेच निवडणुकीची तयारी सुरु केली होती. पण जागा कॉंग्रेसला गेली. नाराज क्षीरसागर हे संपर्कातून बाहेर गेले. जेव्हा महाविकास आघाडीचा मेळावा झाला तेव्हा ते त्यालाही गैरहजर राहिले.

नंतर त्यांच्या कोल्हापूरातल्या त्यांच्या घराबाहेर हजारो कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं. लगेचच उद्धव ठाकरेंनी त्यांना मुंबईला बोलावून स्वत: समजूत काढली. तूर्तास त्यांनी शांत होणं स्वीकारलं असलं तरीही कोल्हापूरातल्या शिवसेनेतला असंतोष हा महाविकास आघाडीला कशी मदत करणार हा प्रश्न आहेच.

निधीसोबतच अशा अनेक स्थानिक राजकारणातल्या प्रश्नांमुळे महाविकास आघाडीतला शिवसेनेचा असंतोष अशा प्रकरणांमुळे आणि विधानांमुळे समोर येतो आहे.

काही काळापूर्वी कॉंग्रेसच्या आमदारांचीही अशीच नाराजी होती. राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकांच्या तोंडावर या नाराजीला शिवसेना पक्ष म्हणून आणि उद्धव ठाकरे प्रमुख म्हणून कसं शमवणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)