नरेंद्र मोदी सरकारच्या काळात EDचे 2974 छापे, 2005 पासून 23 जणच दोषी #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. मोदी सरकारच्या काळात ईडीचे 2974 छापे, आतापर्यंत 23 जणच दोषी
अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीनं (ED) 2005 मध्ये प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग (PMLA) अॅक्ट नुसार किती छापे टाकले, किती कारवाया करण्यात आल्या, आतापर्यंत कितीजण दोषी ठरले यासंदर्भातील माहिती दिली आहे.
2005 मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर 2014 पर्यंत काँग्रेसचं सरकार केंद्रात सत्तेत होतं. 2014 ते 2022 पर्यंत नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आहे. लोकसभेत या काळातील ईडीच्या छाप्यांबद्दलची आकडेवारी मांडण्यात आली.
काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या काळात 112 छापे टाकण्यात आले आहेत. ईडीनं गेल्या आठ वर्षांत नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर 2974 छापे टाकले आहेत. 2005 पासून ईडी कारवाया करत असली तरी केवळ 23 व्यक्तींना शिक्षा झाल्याचं समोर आलंय.
केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्त्वातील यूपीए सरकार स्थापन झाल्यानंतर पीएमएलए कायदा अस्तित्त्वात आला. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वात 2004 ते 2014 या काळात ईडीनं 112 छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्याअंतर्गत 5316.16 कोटींच्या गैरव्यवहारासंदर्भात 104 तक्रारी दाखल झाल्या होत्या, असं लोकसभेत सांगण्यात आलं.
2014 ते 2022 या मोदी सरकाच्या कार्यकाळात ईडीच्या कारवाया वाढल्याचं चित्र आकडेवारीतून दिसून आलं आहे. ईडीनं मोदींच्या कार्यकाळात 2974 छापे टाकले आहेत. तर, 839 तक्रारीअंतर्गत 95 हजार 432 कोटी रुपयांच्या गैरप्रकारांची चौकशी सुरु असल्याची माहिती लोकसभेत सादर करण्यात आली आहे.
टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
2. 'भाजपनं शिवसेनेच्या डोक्यावर पाय ठेवायचा प्रयत्न केला, काँग्रेस एवढी वाईट वागली नाही'
भाजपने शिवसेनेच्या कुठल्याही आमदाराचं काम केलं नाही. शिवसेनेच्या डोक्यावर पाय ठेवण्याचाच प्रयत्न भाजपने त्यावेळी केला आहे. भाजप एवढी वाईट वागली. तर काँग्रेसने असं आमचं काय वाईट केलंय? असं म्हणत शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेससोबत सामोपचाराची भूमिका घेतल्याचं चित्र आहे.
उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या आमदाराचं निधन झाल्यानंतर त्याठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. ती जागा शिवसेनेचा बालेकिल्ला होता त्यामुळे आम्हाला ती जागा मिळाली पाहिजे, असा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. ही जागा काँग्रेसला देण्यावरून शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हेही नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या.
आता या जागावाटपासंबंधी क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यावेळेला तीनही पक्षापैकी एखाद्या पक्षाचा आमदाराचं निधन झालं तर त्याच पक्षाचा उमेदवार द्यायचा हा आघाडीचा करार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने कराराप्रमाणे ही जागा काँग्रेसला देण्यात येत असल्याचं त्यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
"हे सरकार पडत नाही म्हणून महाविकास आघाडीत काही आलबेल नाही असं पसरवलं जातंय. यात भाजप माहिर आहे. भाजपने आमची काळजी करु नये. ही पाच वर्षं नव्हे तर पुढची पाच वर्षं देखील महाविकास आघाडी पूर्ण करेल," असंही क्षीरसागर यांनी म्हटलं.
3. मोदींना दोन तासही झोपू द्यायचं नाही असं 'या' नेत्यांनी ठरवलंय- संजय राऊत
मोदी साहेब खूप काम करतात, ते फक्त दोन तास झोपतात हा चांगला प्रयोग आहे. आता उरलेले दोन तास सुद्धा त्यांना झोपू द्यायचं नाही असं बहुतेक महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी ठरवलेले आहे. त्यानुसार भाजपाचे नेते कामाला लागले आहेत, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/SANJAY RAUT
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 22 तास काम करतात, दोन तास झोपतात. आता तर ते दोन तासही झोप येऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहेत, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.
त्यांच्या या विधानावर संजय राऊत यांनी उपहासात्मक टिप्पणी केली आहे. तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी नागपुरात बोलताना चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर भाष्य केलं.
विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेनेचे सर्व खासदार तीन दिवस विदर्भात राहणार आहेत.
न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.
4. 'द काश्मीर फाइल्स'च्या निर्मात्यांनी 50 टक्के रक्कम दान करावी- करणी सेना
करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरज पाल सिंह अमू यांनी 'द काश्मीर फाइल्स'चे निर्माते, झी स्टुडिओ आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना आवाहन केलं आहे.

फोटो स्रोत, @TARAN_ADARSH
"बहुतेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त घोषित केला आहे, जेणेकरून सर्वसामान्यांनाही तो पाहता येईल. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी पुढे येऊन चित्रपटाच्या कमाईतील 50 टक्के रक्कम दान करावी. ती रक्कम विस्थापित काश्मिरी पंडितांच्या कल्याणासाठी वापरता येईल. यावरून हेही स्पष्ट होईल की, निर्मात्यांनी चित्रपटात जी कथा दाखवली आहे, त्यात ते बळी पडलेल्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत," असं करणी सेनेचे प्रमुख सूरज पाल अमूंनी म्हटलं आहे.
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
5. 'पंतप्रधान वाराणसीतून निवडणूक लढवू शकतात, तर मी आसनसोलमधून का नाही?'
पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ही घोषणा केल्यानंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तिला तिकीट दिल्याची टीका भाजपनं केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आता स्वतः शत्रुघ्न सिन्हा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
"पंतप्रधानांसारख्या राष्ट्रीय व्यक्तीला इतर ठिकाणांहून निवडणूक लढवणं मान्य असेल तर माझ्यासाठीही तेच असले पाहिजे. नरेंद्र मोदी गुजरातचे असून वाराणसीमधून निवडणूक लढवतात, त्यांना कोणी काही म्हणत नाही," असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे.
बंगालच्या विकासासाठी नेहमी उभ्या राहिलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावाखाली आसनसोलचे लोक मला मतदान करतील, असा विश्वासही शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला.
लोकमतनं ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








