शिवसेना खासदाराची नाराजी- 'आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, पण लाभ घेतंय पवार सरकार'

फोटो स्रोत, Getty Images
विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा...
1. 'आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, पण प्रत्यक्षात लाभ घेतंय पवार सरकार'
'आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, पवार सरकार' असं म्हणत शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याने नाराजी व्यक्त केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे इथं ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभाला खासदार गजानन कीर्तीकर उपस्थित होते.
एका आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात, असं कीर्तीकर म्हणाले.
"विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात असून ग्रामविकास मंत्रालयाच्या 25/15 योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहावयास मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही, मुंबईमध्ये नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो. मात्र, निधीची पळवापळवी केली जात आहे," असं गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं.
टीव्ही9 मराठीनं ही बातमी केली आहे.
2. शरद पवारांनी MIMला महाविकास आघाडीत घेण्याबाबत म्हटलं...
एमआयएमने (AIMIM) महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिला आणि राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली.
मात्र एमआयएम ही भाजपची 'बी टीम' आहे असा आरोप करत एमआयएमबरोबर युती होणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यानतंर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रस्तावावर स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी MIMला महाविकास आघाडीत घेण्याची शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळलीये. राष्ट्रवादीमध्ये राज्य पातळीवर असा निर्णय होत नाही, तर केंद्रीय नेतृत्व याबाबत ठरवतं असं पवार म्हणाले.
MIMचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.
झी24 तासनं ही बातमी दिली आहे.
दरम्यान 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटावरून सुरु असलेल्या वादावरही शरद पवार यांनी भाष्य केलं.
"देश सध्या एकविचाराने चाललेला आहे. समाजातील सर्व घटक एकत्र आहेत. असं असताना पुन्हा समाजात दुरावा निर्माण होईल, असं लिखाण किंवा चित्रपट करणं टाळलं पाहिजे. काश्मिरी पंडितांचा प्रश्न उपस्थित करून आज पुन्हा सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असं शरद पवार यांनी म्हटलं.
3. नरेंद्र मोदी आता झोप लागू नये यासाठी प्रयत्न करत आहेत- चंद्रकांत पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन तासच झोपतात, आता झोप लागू नये यासाठी प्रयत्न करत आहेत असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
कोल्हापुरात बोलताना त्यांनी यानंतर मोदी 24 तास जागे राहतील, असंही म्हटलं.

फोटो स्रोत, CHANDRAKANTPATIL
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
"झोपच लागणार नाही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयोग करत आहेत. आता मोदी दोन तास झोपतात, नंतर ते 24 तास देखील झोपणार नाहीत," असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना 2024च्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला.
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
4. माजी मंत्री बिक्रम सिंग मजिठिया यांच्या चौकशीसाठी SITची स्थापना, आप सरकारचा निर्णय
पंजाबमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर आम आदमी पक्षानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आप सरकारनं माजी मंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग मजिठिया यांच्यावर ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीसाठी सहाय्यक पोलिस महानिरीक्षक एस. राहुल यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आलीये.
शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग मजिठिया यांच्याविरुद्ध ड्रग्ज प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आल्यावर त्यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये शरणागती पत्करली होती. 24 फेब्रुवारीला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्या कोठडीची मुदत 8 मार्चपर्यंत होती.
मोहाली जिल्हा न्यायालयाने ही मुदत 24 मार्चपर्यंत वाढवली.
लोकमतनं ही बातमी दिली आहे.
5. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या मुलाविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत यांच्याविरोधात नाशिक इथं फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वैभव यांच्यासह 14 जणांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे.
नाशिकमधल्या गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस इन्स्पेक्टर रियाझ शेख यांनी म्हटलं की, नाशिक न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवार (18 मार्च) वैभव गहलोत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या आम्ही तक्रारदारानं सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करत आहोत आणि त्यानुसार आम्ही प्रत्येकाला चौकशीसाठी समन्स बजावू.
नाशिकमधील सुशांत पाटील या व्यावसायिकाने 17 मार्चला ही तक्रार दाखल केली होती.
इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








