सुप्रिया सुळेंनी केंद्रीय मंत्र्यांना सुनावलं- 'आई-बाप काढू नका' #5मोठ्याबातम्या

विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

1. 'आई-बाप काढू नका' सुप्रिया सुळेंनी सुनावलं केंद्रीय मंत्र्यांना

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून लोकसभेत आक्रमक पवित्रा घेतला.

'पहिल्या सरकारने 60 वर्षांत काय केलं हा डायलॉग जुना झाला, केवळ कलम 370 काढल्याने काश्मिरी नागरिकांच्या आयुष्यात बदल घडत नाही. 2022-23च्या अर्थसंकल्पात भाजप सरकारने काश्मिरी पंडितांसाठी काय तरतूद केली?' असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. जम्मू-काश्मिरमधल्या शिक्षणव्यवस्थेबद्दल भाष्य केल्यानंतर त्यांच्यात आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्यात वाद घातला.

मागच्या सरकारला दोष देण्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा, असा सुप्रिया सुळेंचा पवित्रा होता.

या चर्चेदरम्यान 'तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही इथे पोहोचलात' असं विधान जितेंद्र सिंह यांनी केलं.

यावर 'डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झालेला तुम्हाला चालतो, मग आमच्याबद्दल तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? फादर - मदर को छोड के कुछ भी बोल सकते है, माँ-बाप मत निकालिए' असं सुप्रिया सुळेंनी लोकसभेत जितेंद्र सिंह यांना सुनावल्याचं लोकमतने बातमीत म्हटलंय.

2. पाच राज्यांतल्या निवडणुकांनंतर सोनिया गांधी आक्रमक, पाचही प्रदेशाध्यक्षांची उचलबांगडी

5 राज्यांतल्या निवडणुकांमध्ये पराभव सोसावा लागल्यानंतर काँग्रेसने आत्मचिंतन करण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या पाचही राज्यांतल्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला आहे. काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.

5 राज्यांतल्या पराभवानंतर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक झाली. या बैठकीत या पराभवावर विचारमंथन करण्यात आलं. यानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी सूचना सोनिया गांधींनी दिली आहे.

महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.

3. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी राज्यपालांनी परवानगी नाकारली

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियमांत बदल करण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निवडणुकीसाठी तारीख निश्चित करता येणार नाही, अशी भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. राज्यपालांनी तसं पत्र विधिमंडळ सचिवालयाला पाठवलंय. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड पुन्हा लांबणीवर गेलीय.

लोकसत्ताने ही बातमी दिलीय.

विधानसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक घेण्याची महाविकास आघाडी सरकारची योजना होती. त्यानुसार राज्यपालांकडे परवानगी मागण्यात आली होती. राज्यपालांनी तारीख निश्चित केल्याशिवाय निवडणूक होऊ शकत नाही.

अध्यक्षपदासाठी गुप्तऐवजी खुल्या पद्धतीने मतदान घेण्यासाठी विधानसभा नियमांत डिसेंबर 2021मध्ये बदल करण्यात आले होते. या बदलांना भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असता न्यायालयाने याचिका फेटाळली होती.

4. दूध महागलं, महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाचे दर 2 रुपयांनी वाढले

महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या खरेदीत 3 रुपये तर विक्री दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राज्यभर गाईच्या दूध खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटर प्रत्येकी 3 आणि 2 रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय राज्यातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संघांकडून घेण्यात आला आहे.

त्यामुळे ग्राहकांना आता दुधासाठी दोन रुपये जास्त मोजावे लागतील.

आता गाईच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर 33 रुपये तर, पिशवीबंद दुधाचा किरकोळ विक्री दर प्रति लिटर 52 रुपये असणार आहे. या दूध दरवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी 15 मार्चपासून होईल.

एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

5. कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, पेट्रोल-डिझेलची दरवाढ लांबणीवर

जागतिक बाजारपेठेत तीन आठवड्यांत पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या - ब्रेंट क्रूडच्या किंमती खाली आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती बॅरलमागे 97.44 डॉलरवर आलेल्या आहेत. यामुळे भारतातली इंधन दरवाढ काहीशी पुढे जाण्याची शक्यता असल्याचं हिंदुस्तान टाईम्सने त्यांच्या बातमीत म्हटलंय.

7 मार्चला क्रूड तेलाचे दर बॅरलासाठी 137 डॉलर्सपर्यंत गेले होते. यामुळेच पेट्रोल - डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तर आपण महागाईची झळ रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं होतं.

चीनमध्ये पुन्हा डोकं वर काढलेला कोरोना व्हायरस, रशिया - युक्रेनमधली युद्ध थांबवण्यासाठीची बोलणी याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतींवर झाला आणि ट्रेडिंगदरम्यान कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)