द कश्मीर फाईल्स'ला रोखण्याचं षड्यंत्र सुरूय – नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, @taran_adarsh
'द कश्मीर फाईल्स'या सिनेमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलंय. ते भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत बोलत होते.
हा सिनेमा सगळ्यांनी पहायला हवा, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत. ते म्हणाले, "द कश्मीर फाईल्स हा अतिशय चांगला सिनेमा आहे. तुम्ही सगळ्यांनी तो पाहायला हवा. असे आणखीन सिनेमे तयार व्हायला हवेत."
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा 'द कश्मिर फाईल्स' हा सिनेमा 11 मार्चला रीलिज झाला. 1990च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून काश्मीरी पंडितांना पलायन करावं लागलं होतं. त्यावर हा सिनेमा आधारित आहे.
संसदीय समितीच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान म्हणाले,
"गेल्या 5-6 दिवसांपासून सगळा गट गडबडून गेलाय. आणि सत्य गोष्टींच्या आधारे, कला म्हणून या फिल्मचं परीक्षण करण्याऐवजी त्याचं श्रेय हिरावून घेण्यासाठीची मोहीम चालवण्यात येतेय. एक संपूर्ण इको-सिस्टीम एखादं सत्य समोर आणण्याचं धाडस करते. त्यांना जे सत्य वाटलं ते मांडायचा प्रयत्न त्यांनी केला. पण हे सत्य समजण्याची किंवा स्वीकारण्याची तयारी दाखवण्यात आली नाही.

फोटो स्रोत, @taran_adarsh
जगाने हे पहावं असंही त्यांना वाटत नाही. ज्या प्रकारचं षड्यंत्र गेल्या 5-6 दिवसांपासून करण्यात येतंय. फिल्म माझा विषय नाही. पण जे सत्य आहे ते योग्य स्वरूपात देशासमोर आणणं हे देशाच्या भल्यासाठी असतं. त्याचे अनेक पैलू असू शकतात.
कोणाला एक गोष्ट दिसते, कोणाला दुसरी दिसेल. ज्यांना वाटत असेल ही फिल्म योग्य नाही, त्यांनी दुसरी फिल्म करावी. कोणी मनाई केलीय? पण त्यांना हा प्रश्न पडलाय की जे सत्य इतकी वर्षं दाबून ठेवलं ते तथ्यांच्या आधारे जेव्हा बाहेर आणण्यात येतंय, कोणीतरी मेहनत घेऊन ते बाहेर आणतंय, तर त्यासाठी संपूर्ण इको-सिस्टीम लागलीय. अशावेळी सत्यासाठी जगणाऱ्या लोकांनी सत्यासाठी उभं राहणं ही त्यांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी तुम्ही सगळे पार पाडाल अशी मला आशा आहे."
'द कश्मिर फाईल्स्' सिनेमाच्या टीमने 12 मार्चला पंतप्रधान नरेंदी मोदींची भेट घेतली होती. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या भेटीचा फोटो ट्वीट केला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








