डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल 'झुंड'मध्ये वापरलेली 'ही' प्रतीकं आणि त्यांचे अर्थ

झुंडमधील एक दृश्य

फोटो स्रोत, T-SERIES

    • Author, वंदना
    • Role, संपादक, बीबीसी टीव्ही ( भारतीय भाषा )

'ये समाज के बहिष्कृत लोक हैं, आप कहते है ये झुंड है, मैं कहता हूँ ये हमारी नॅशनल फुटबॉल टीम है'- हे उद्गार आहेत क्रीडा प्रशिक्षक विजय बोराडे (अमिताभ बच्चन) यांचे.

नागपूरच्या झोपडपट्टीतून आलेल्या आपल्या एका विद्यार्थ्याला वर्ल्ड कपसाठी परदेशात जाता यावं, म्हणून न्यायालयासमोर ते अखेरचा अटीतटीचा प्रयत्न करताना असे उद्गार काढतात.

त्यांचा हा विद्यार्थी अंमली पदार्थ, गुन्हेगारी आणि जातीय भेदभावाने ग्रासलेलं जीवन जगत असतो. पण त्याच्यावर इतका उदंड विश्वास दाखवल्यामुळे त्याचं जगणं बदलण्याची शक्यता निर्माण होते.

नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' या चित्रपटात झोपडपट्टीतली काही मुलं एका क्रीडा प्रशिक्षकाला भेटतात आणि फुटबॉलमुळे आपलं आयुष्य बदलू शकतं याची जाणीव त्या मुलांना होते. पण मुळात हा चित्रपट वरच्या संवादात उल्लेख आलेल्या 'बहिष्कृत भारता'बद्दलचा आहे.

झोपडपट्टीतल्या मुलांना शेजारील महाविद्यालयाच्या आवारापासून वेगळं करणाऱ्या 'भिंती'विषयीचा हा चित्रपट आहे. शिवाय, परिघावरील लोकांना अभिजनांपासून वेगळं करणारी अदृश्य भिंतही या चित्रपटात आहे. त्यामुळेच अमिताभ बच्चन यांचं पात्र न्यायालयात म्हणतं- 'या मुलांकडे कितीही गुणवत्ता असली, तरी ते तुमच्यापर्यंत पोचू शकत नाहीत. कारण मधली भिंत खूप उंच आहे.'

आंबेडकर आणि प्रतीकात्मकता

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी एप्रिल 1927 मध्ये दलितांना आवाज मिळवून देणारं 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुरू केलं. या घटनेला जवळपास 90 वर्षं उलटून गेल्यानंतरही आपण बहिष्कृत भारताबद्दलच बोलतो आहोत, हे मोठीच शोकांतिका म्हणावी लागेल.

'झुंड' चित्रपट जवळपास तीन तासांचा आहे आणि काही वेळा त्याची गती वर-खाली होते. 'फँड्री' किंवा 'सैराट' यांच्याइतका एकसंध अनुभव 'झुंड'मधून मिळत नाही. पण त्यातली नैसर्गिक ऊर्जा, निरागसता आणि कठोर वास्तवाचं मिश्रण, या गोष्टी आपल्याला विचार करायला भाग पाडतात.

बहिष्कृत भारत

फोटो स्रोत, GOVERNMENT OF MAHARASHTRA

उदाहरणार्थ- वर उल्लेख आलेल्या झोपडपट्टीतील मुलाला आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेविषयी कळतं, तेव्हा तो आंतरराष्ट्रीय काय नि राष्ट्रीय काय, असा प्रश्न विचारतो. राष्ट्रीय म्हणजे भारत, असं त्याला सांगितलं जातं. तेव्हा, 'भारत मतलब?' असा प्रश्न तो विचारतो. चित्रपटातील हा साधा, निरागस क्षण अनेक खोल अर्थ घेऊन येतो.

या चित्रपटात अनेक ठिकाणी प्रतीकात्मकता आढळते आणि बॉलिवूडच्या अनेक प्रचलित संकेतांना त्यातून आव्हानही दिलं जातं. एखाद्या चित्रपटात आंबेडकर जयंतीचा उत्सव सुरू आहे आणि अमिताभ बच्चन बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रासमोर आदरांजली वाहतायंत, असं दृश्य तुम्ही किती वेळा पाहिलं आहे?

याच दृश्याबद्दल बीबीसी मराठीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी म्हटलं होतं की, "बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून मी चालतो."

त्यांनी पुढं म्हटलं, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटात दिसले, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. असं पहिल्यांदाच झालं आहे की एक मोठे नायक बाबासाहेबांसमोर हात जोडून उभे आहेत. आपल्याकडे असे खूप महापुरूष आहेत ज्यांना आपण पूर्ण पाहत नाही, समजून घेत नाही."

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देश आणि जगासाठी खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी आहेत. ज्यावेळेस मी त्यांचे चित्र बघतो त्यावेळेस मला काहीतरी प्रेरणा मिळतेच," असंही नागराज मंजुळे यांनी म्हटलं.

सर्वसाधारणतः चित्रपटांमध्ये उत्साहवर्धक आणि उत्तेजक पार्श्वसंगीत हे आपल्या उच्चवर्गीय नायकासाठी वापरलं जातं. परंतु, 'झुंड'मध्ये दलित नायकांसाठी असं संगीत राखून ठेवलं आहे.

किंवा, शीर्षक गीतामधले हे बोल पाहा-

अपुन की बस्ती,

गटर मे है पर,

तुम्हारे दिल मे गंद है

गटर की नाली से,

पब्लिक की गाली से,

रास्ते पे आया ये झुंड है

लोगो की फटेगी

बाजू मे हटेगी

आया ये शेरों का झुंड है

अमिताभ भट्टाचार्य यांच्या लेखणीतून उतरलेलं हे गीत बरंच काही सांगून जातं आणि प्रत्येक प्रेक्षक आपापले अर्थ त्यातून काढू शकतो. हे गाणं दमनाविषयीचं आहे, शोषणाविषयीचं आहे, आणि त्याच वेळी ते धाडसाने धारदार विडंबनही करून दाखवतं.

अंकुश गेडाम, रिंकू राजगुरू, रझिया सुहेल आणि व्यावसायिक अभिनयाच्या क्षेत्रात नसलेली इतर सर्व मंडळी त्यांच्या पात्रात अक्षरशः जीव ओततात, आणि आपण पूर्णतः त्यांचे होऊन जातो.

विशेष म्हणजे अमिताभ बच्चनसुद्धा अगदी सहजपणे या व्यावसायिक अभिनयाशी संबंध न आलेल्या कलाकारांमध्ये सरमिसळून गेले आहेत. अमिताभ यांच्यामुळे 'झुंड'मधील इतर कलाकार झाकोळले जात नाहीत.

दिग्दर्शकाने या चित्रपटासाठी पूर्णतः निराळं व्याकरण घडवलं आहे. त्याची गती संथ आणि काही वेळा सुस्त वाटली, तरी ती आपल्याशी खोलवर संवाद साधते.

झुंडमधलं एक दृश्य

फोटो स्रोत, Instagram/Rinku Rajguru

अस्मितेची कल्पना आणि भारताची कल्पना (आयडिया ऑफ इंडिया) याच्याशी संबंधित अस्तित्वलक्ष्यी प्रश्न या चित्रपटात अतिशय चिकित्सकपणे आणि तरीही वस्तुस्थिती दाखवल्याप्रमाणे आले आहेत.

उदाहरणार्थ, फुटबॉलच्या विश्वचषक स्पर्धेसाठी एका आदिवासी मुलीची (रिंकू राजगुरू) निवड होते आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिला तातडीने पासपोर्ट काढणं गरजेचं असतं. या सगळ्या प्रक्रियेत तिला स्वतःचं भारतीयत्व आणि स्वतःची ओळख सिद्ध करावी लागते. स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठी ती 'डिजिटल इंडिया'ची उद्घोषणा करणाऱ्या एका ऑफिससमोरून धावत जाताना दाखवली आहे.

भारतात जन्मलेल्या आणि तिथेच मोठ्या झालेल्या आपल्या मुलीची- मोनिकाची ओळख पटवण्यासाठी ठिकठिकाणी खेटे घालावे लागणारे वडील अखेरीस थकून म्हणतात, 'आम आदमी की कोई किंमत ही नहीं.'

स्वाभाविकपणे ही तरुण मुलं-मुली विजय बोराडे या निवृत्त क्रीडा प्रशिक्षकाशी जोडली जातात, कारण तो त्यांना स्वतःची ओळख, स्वतःची अस्मिता देण्यासाठी प्रयत्न करत असतो.

साध्या कृती आणि प्रसंग मोठ्या घटनांचं निमित्तं

अमिताभ बच्चन यांचं पात्र झोपडपट्टीतील सर्व मुलांना आपल्या घरी बोलावतं आणि प्रत्येकाची कहाणी ऐकतं, तेव्हा बाबू नावाचा एक मुलगा म्हणतो की, पहिल्यांदाच कोणीतरी त्याच्या आयुष्यात इतका रस दाखवतंय. आत्तापर्यंत 'किसी ने नहीं पुछा', असं तो म्हणतो.

हे ऐकल्यावर आपल्या घशात आवंढा येतोच. या खास दृष्टिकोनामुळे 'झुंड' हा अत्यंत निराळा अनुभव देणारा चित्रपट ठरतो. गेली दोन वर्षं ओटीटी मंचांशी परिचय झालेल्या प्रेक्षकांना तीन तासांचा 'झुंड' काहीसा लांबलेला वाटू शकतो, पण तरी त्यातील दृष्टिकोनाचं वैशिष्ट्य मनात ठसतं.

या चित्रपटात केवळ हिंदी आणि मराठीच नव्हे, तर गोंडी भाषाही ऐकायला मिळते. इथेही नागराज यांनी मुख्यप्रवाही कथनाला छेद दिला आहे. चित्रपटगृहातील मोजक्या लोकांना अर्थातच ही बोली कळत होती, कारण त्यांच्यातील काही जण या संवादांवर मोठ्यांदा हसत होते. नागराज यांच्या 'फँड्री' चित्रपटातील कुटुंब कैकाडी बोली बोलताना दाखवलं होतं.

झुंडमधलं एक दृश्य

फोटो स्रोत, Social Media

नागराज यांच्या आधीच्या चित्रपटांप्रमाणे 'झुंड'मध्येसुद्धा जगण्यातील साध्या कृती आणि प्रसंग मोठ्या घटनांचं निमित्तं ठरतात. चित्रपटातील दलित नायक (अंकुश गेडाम) एका उच्चजातीय मुलाच्या नजरेला नजर भिडवून पाहतो, तेव्हा तो आव्हान देतोय असं मानलं जातं आणि अखेर या गुन्ह्यासाठी त्याला मारहाण होते आणि त्याची मानखंडना केली जाते.

'झुंड'मध्ये कटू विनोद मोठ्या प्रमाणात आहे. हे न-कथन सर्व गोष्टींपुढे प्रश्नचिन्ह उमटवतं. 'झुंड'ला क्रीडाविषयक चित्रपट असं संबोधता येईलही, पण एका अर्थी हा चित्रपट राजकीयसुद्धा आहे- त्यातील जातविरोधी कथन, नागरिकांच्या राष्ट्रीय नोंदपटाविषयीची सूक्ष्म टिप्पणी आणि समाजाच्या परिघावरील लोकांचं चित्रण, यातून राजकीयता उलगडत जाते.

दिग्दर्शनाव्यतिरिक्त सुधाकर रेड्डी येंकट्टी यांनी केलेलं उत्कृष्ट चलचित्रण आणि अजय-अतुल यांचं जोरदार संगीतसुद्धा चित्रपटाच्या शिरपेचात तुरा खोवणारं आहे.

हा चित्रपट एकाच वेळी उमेद देणारा आणि अस्वस्थ करणारा आहे. चित्रपटातील एका प्रसंगात अंकुशची एका उच्चजातीय मुलाशी आणि त्याच्या टोळीशी वादावादी होते, कारण अंकुशने उच्चजातीय मुलाचे पाय धरून माफी मागावी, असं त्या टोळीचं म्हणणं असतं. पण अंकुश तसं करायला नकार देतो आणि अखेरीस त्याला तुरुंगात जावं लागतं. त्या वेळी अमिताभ बच्चन आपल्या दलित नायकाला म्हणतात, 'हर बार जीतना जरूरी नहीं है.'

हा सल्ला व्यावहारिक आणि सुज्ञतेचा आहे, पण जी व्यक्ती समाजातील उच्चवर्गीय, अभिजन समूहातील नसेल तिला कुठे संघर्ष करायचा आणि कुठे करायचा नाही हेसुद्धा किती काळजीपूर्वक ठरवावं लागतं यावरचं हे मार्मिक भाष्य आहे.

चैत्यभूमीची पार्श्वभूमी आणि अडचणींवर मात करणारा अंकुश

चित्रपटाच्या अखेरीला अंकुश सर्व अडचणींवर मात करतो आणि 'स्लम वर्ल्ड कप'ला विमानप्रवास करून जाण्यासाठी त्याला पासपोर्ट मिळतो. तो विमानतळावर जाताना पार्श्वभूमीला चैत्यभूमी दिसत असते.

सुरक्षा तपासणीच्या ठिकाणी त्याला त्याचा पट्टा, त्याचे शूज, त्याचं पाकीट आणि त्याने गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांनी ग्रासलेल्या आयुष्यात कायम सोबत बाळगलेला कटर बाजूला काढून ठेवावा लागतो. या अखेरच्या दृश्यचौकटीसुद्धा बऱ्याच अर्थपूर्ण आहेत.

विमान आकाशात झेप घेतं, तेव्हा विमानतळ आणि झोपडपट्टी यांना विभागणाऱ्या भिंतीवरची एक ग्राफिटी दिसते- Crossing the wall is strictly prohibited. (भिंत ओलांडणं निषिद्ध आहे).

'आया ये झुंड है' हे गाणं येता काही काळ माझ्या प्ले-लिस्टमध्ये असणार आहे. 'झुंड'मध्ये काही उणीवा असल्या, तरी आपल्या काळातील हा एक महत्त्वाचा चित्रपट ठरेल. कथनाच्या चौकटी मोडण्याचा प्रयत्न करणारा हा चित्रपट आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)