You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘भारत आमच्यासाठी काही करू शकत नसेल तर आमचं गाव शेजारच्या देशात नेतो’
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी, सोहगी बरवाहून
भारतातल्याच एका गावात जाण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या देशातून रस्ता काढावा लागतो असं म्हटलं तर? अगदी खरंय हे. उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळ यांच्या सीमा ज्या बिंदूपाशी एकत्र होतात तिथे काही गावं आहेत. त्या गावांमध्ये जायचं असेल तर रस्ता जातो नेपाळहून कारण भारताच्याच्या सीमेवरच्या या गावांमध्ये जायला भारतातून रस्ताच नाहीये.
कशी जगतात या गावातली माणसं हेच बघायला आम्ही देशाची सीमा गाठली.
उत्तर प्रदेशमधल्या महाराजगंज जिल्ह्यातलं सोहगी बरवा हे गाव. भारताच्या सीमेवर असलेल्या शेवटच्या गावांपैकी एक. पण इथल्या लोकांना भारतात राहायचं नाहीये, नेपाळमध्ये जायचं आहे. इथे ज्या सोयीसुविधा मिळत नाही त्या तिथे मिळतील असं त्यांना वाटतं.
उत्तर प्रदेशच्या सीमेवरचे दोन जिल्हे, महारागंज आणि कुशीनगर. या दोन जिल्ह्यांमधली दहा गावं इथल्या अगदी दुर्गम भागात वसली आहेत. आसपास पाणथळ, दलदल आणि दाट जंगल.
तुम्ही म्हणाल देशात अशी अनेक गावं आहेत. बरोबर, पण या गावांचं दुर्दैव असं की पावसाळ्यातले चार महिने त्यांचा अक्षरशः देशाशी आणि पर्यायाने जगाशी संबंध पूर्णपणे तुटतो.
असं समजा की ही गावं एका खोलगट बशीत वसली आहेत. पावसाळ्यात पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये नद्या कसं रौद्र रूप धारण करतात आणि समोर येईल तरे सगळं पोटात घेत धावतात हे आपण अनेक वर्षं पाहातोय.
या बशीत वसलेल्या गावांना वेढा घालते नारायणी नदी, जिला गण्डक असं दुसरं नाव आहे. संपूर्ण पावसाळाभर ही गावं अक्षरशः पाण्यात असतात. यायची-जायची एकच पायवाट असते त्यावर बोट चालते.
सोहगी बरवापासून सगळ्यांत जवळचा बांधलेला डांबरी रस्ता तिथून कमीत कमी 12 किलोमीटर नौरंगिया गावात लागतो. बिहारहून नेपाळला जाणारा हा हायवे. तिथून एक फाटा फुटतो आणि मग सुरू होते कच्ची पायवाट. पावसाळ्यात या पायवाटेवरून धो-धो नदी वाहत असते आणि सोहगी बरवा या दुर्गम गावात कोणी गरोदर बाई जरी अडली तरी तिला बोटीत घालून नौरंगियापर्यंत आणवं लागतं.
का? स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षं होऊन गेली तरी या गावांना जोडणारा पूल नाही. एका ओळीत ही गाव वसली आहेत. शेवटच्या गावापाशी पुन्हा ती नारायणी नदी लागते. ज्यावर पूल बांधला तर हे लोक सहज महाराजगंज या जिल्ह्याच्या ठिकाणी पोहचू शकतात.
"पण गरिबांसाठी इतका खर्च कोण करणार हो?" गावात राहाणाऱ्या रोनाली म्हणतात. त्या हात धरून मला त्यांच्या झोपडीपाशी नेतात आणि म्हणतात पाहा माझी झोपडी.
"इकडे या, घर पाहा. आम्हाला ना शेतीवाडी, काही नाही. कोण आमचं ऐकून घेईल? सरकारी योजनेत मिळतं ते घरकुल मिळालं नाहीये. पाणी खाऊन टाकतं सगळं. ना कमाई होते ना काही. काय करायचं आम्ही? गरिबांचं कोणी ऐकून घेत नाही."
त्यांचं पाहून अजून काही बायका अवतीभोवती जमा होतात आणि आपली कहाणी सांगायला लागतात.
तिथल्याच मनोरमा बाई. त्या इकडे तिकडे हात करून मला पाणी कुठवर भरत ते सांगत असतात.
गावात पाहिलं की दिसतं की गावकऱ्यांनी दरवर्षी येणाऱ्या आणि चार महिने नाचणाऱ्या पुराची तजवीज करून ठेवलेली असते. धान्याच्या शेणाने सारवलेल्या, बांबूच्या कणग्या उंचावर बांधलेल्या असतात.
तिथेच किडूकमिडूक सामान विकणारी दुकानं उंचावर असतात.
एकेकाळी हा इतका दुर्गम भाग होता की बिहारमधले, उत्तर प्रदेशमधले, नेपाळमधले जे कोणी गुन्हेगार असायचे ते गुन्हे करून यायचे आणि इथे लपून बसायचे. त्याची या भागात फार दहशत होती. आता हे प्रमाण कमी जरी झालं असतं तरी या लोकांपुढे खूप प्रश्न आहेत. यांच्या मुलांना शाळा नाहीयेत. शाळेत जायचं म्हटलं तरी चार महिने शाळा बंद असणार. जवळपास दवाखाना नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रावर डॉक्टरच येत नाहीत.
आमच्या सोबत असलेले सामाजिक कार्यकर्ते सुनील पांडे यांनी आम्हाला सांगितलं की महाराजगंज जिल्ह्यात कोणा सरकारी अधिकाऱ्याला शिक्षा द्यायची असेल तर त्याची नियुक्ती सोहगी बरवा, शिकारपूर या भागात करतात.
"मोठमोठे आयएसएस, आयपीएस अधिकारी इथे येणार असले तरी त्यांना आधी नेपाळमध्ये जावं लागतं. भारतातून आल्याची नोंदणी करावी लागते आणि मग ते इथे येऊ शकतात. यापेक्षा मोठं दुर्दैव काय असेल?"
शाळा नाही तर मुलं काय करतात विचारल्यावर एक माऊली वैतागून म्हणते, "गोट्या खेळत असतात फक्त."
माझ्या कॅमेऱ्याकडे बोट दाखवून स्वतःच्या लहान मुलाला म्हणते, "तू ऐकत नाहीस ना.. थांब तुझीच तक्रार करते आता."
मुलींच्या नशीबी तर शाळा नाहीच आणि घरची कामं, लहान भावंडांना सांभाळणं असल्या जबाबदाऱ्या.
बायका उत्स्फुर्तपणे सांगत असतात.
किस्मती म्हणते, "कोणी येत नाही इकडे. पुरात कोण येईल? आम्ही जगलो काय किंवा मेलो काय. सगळं पाणी भरतं तेव्हा ना या बाजूला जाऊ शकत, ना त्या बाजूला जाऊ शकत. आम्ही मधोमध मरत राहातो, तडफडत राहातो. पाहाताय ना, तिथे रस्ताच नाहीये. नौरंगियापासून नावेत बसून यावं लागतं. इथून जातानाही नावेत बसून जावं लागतं. सांगा, कोण आहे आमच्यासाठी? कोणी नाही. ती नाव मध्ये बुडली तर सगळंच संपलं मग."
या भागात दलित आणि मागासवर्गीयांची वस्ती जास्त आहे. एव्हाना पुरुषही माझ्याभोवती जमा झालेले असतात.
त्यातलेच एक थोडे शिकलेले शत्रुघ्न गुप्ता. स्वतःची ओळख भाजपचा कार्यकर्ता म्हणून करून देतात, पण तरीही सरकारबद्दल असलेली नाराजी स्पष्ट व्यक्त करतात.
"घाबरू कशाला, जे खरं आहे ते खरं आहे. इतकी वर्षं झाली पण आमच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये."
ते पुढे म्हणतात, "इथले आमदार आले होते निवडणुकीआधी आणि मोठ्या अभिमानानं सांगत होते की मी इथे साडेचार वर्षांनी आलोय. जे लोक वर्षानुवर्ष आमच्याकडे ढुंकून पाहात नाहीत अशांना आम्ही का नेते म्हणावं?"
"एक काम करा ना, आम्हाला नेपाळला देऊन टाका," शत्रुघ्न धक्कादायक विधान करतात.
म्हणजे, तुम्हाला नेपाळ देशात जायचं आहे? असं विचारल्यावर म्हणतात, "मी एकटा नाही. आमचं अख्खं गाव, आमचंच कशाला, इथली सगळी गावं नेपाळमध्ये समाविष्ट करा. कारण भारताला आम्ही जड झालो आहोत."
पुढे सांगतात, "नेपाळ इतका लहान देश आहे पण त्यांनी त्यांच्या लोकांना सोयीसुविधा दिल्यात. इथे हाकेच्या अंतरावर तो देश आहे तर दिसतं की तिथे लोकांसाठी पूल बांधले जात आहेत, रस्ते बांधले जात आहेत. आता भारताचे पंतप्रधान आमच्याकडे लक्ष देत नसतील, भारतात आमच्यासाठी जागा नसेल तर आम्हाला गावासकट नेपाळमध्ये पाठवून द्या. तिथले पंतप्रधान तरी आमच्याकडे लक्ष देतील."
या लोकांकडे इतके पैसेही नाहीयेत की आपलं गाव सोडून दुसरीकडे कुठे जाऊन रहावं.
"आता दुसऱ्या जागी कुठे जाणार? ही जी काय जमीन आहे तिथे घर बांधून राहातोय. पैसा असता तर गोष्ट वेगळी. गरीब माणूस कुठे जाणार?"इथल्या वृद्ध महिला सुरसती म्हणतात.
भाजप सरकारविरोधात रोष असला तरी इथून निवडून भाजपचाच उमेदवार आलाय. कारण सरकारच्या मोफत रेशन योजनेमुळे इथल्या लोकांना कोव्हिडच्या काळात खूप मदत झाली.
किस्मती म्हणतात, "रेशन मिळतंय दर महिन्याला. रेशन खातोय तर असं म्हणणार नाही की मिळत नाहीये. ते मिळतंय."
महाराजगंज जिल्ह्याच्या ठिकाणापासून अगदी चाळीस किलोमीटर अंतर असेल पण ते पार करण्यासाठी आमचे तीन तास जाणार होते. परतीचा प्रवास वेळेत करणं अगदी गरजेचं होतं. संध्याकाळी भारत-नेपाळ बॉर्डर बंद होते त्यामुळे कच्च्या रस्त्यावरून बिहार आणि मग उलट उत्तर प्रदेश असा प्रवास आम्हाला करणं होतं.
लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की बातमी कराल तुम्ही पण आमच्या आयुष्यात काही फरक पडेल का? माझ्याकडे उत्तर नव्हतं. निघताना एका वृद्ध गृहस्थाचं वाक्य मनात घोळत राहिलं...
"ही लंका आहे लंका. चारी बाजूने पाण्याने वेढलेली. आमचं दुर्दैव इतकंच आहे की आमच्याकडे सोनं नाहीये."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)