योगी आदित्यनाथांनी जेव्हा खुन्नसवर भाजपचा उमेदवार पाडला आणि आपला जिंकून आणला

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी, गोरखपूरहून
गोरखपूर आणि भाजप हे समीकरण घट्ट आहे. 1989 पासून ही जागा कायमच भाजपने जिंकली. भाजपच्या या विजयात योगी आदित्यनाथांची मोलाची भूमिका होती. पण याच योगींनी गोरखपूरच्या जागेसाठी एकदा भाजपच्या विरोधात दंड थोपटले होते. गोष्ट आहे 2002 सालची.
उत्तर प्रदेशातल्या पूर्वांचल भागातलं गोरखपूर आज राजकारणात महत्त्वाचं शहर समजलं जातं. गेल्या दोन दशकात उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी राजकारणाचं गड हे शहर उदयाला आलं.
इथूनच उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.
यंदाच्या निवडणुकीत ते पहिल्यांदाच गोरखपूर (शहर) जागेवरून आमदारकी लढवत आहेत.
इथली लढत रंजक आहे कारण या जागेवरून सपाने भाजपचे माजी नेते उपेंद्र शुक्ला यांच्या पत्नी सुभावती शुक्लांना तिकीट दिलं आहे आणि भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आजाद यांनीही गोरखपूरमधूनच उमेदवारी अर्ज भरला आहे.
योगी आदित्यनाथांनी केली भाजपच्या विरोधात बंडखोरी
भाजपचे आणखी एक नेते शिव प्रताप शुक्ला या कथेतलं दुसरं पात्र. 1989 ते 2002 पर्यंत ते गोरखपूरचे आमदार होते.
पण 2002 च्या निवडणुकीत चित्र पालटलं. योगींचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी खटके उडत होते. यातच तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरून योगींचं बिनसलं.
योगींचं म्हणणं होतं की, शिव प्रताप शुक्लांना तिकीट दिलं जाऊ नये. पण शिव प्रताप शुक्ला तेव्हा आमदार होते, त्या आधी उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्रीही बनले होते. योगी आदित्यनाथांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षं जिंकत आलेल्या आमदाराचं तिकीट कापावं इतकं महत्त्व भाजपत आदित्यनाथांना मिळालं नव्हतं. त्यामुळे भाजपने शिव प्रताप शुक्लांनाच तिकीट दिलं.
झालं, योगींनी भाजपशी बंडखोरी करत आपल्या आवडीचा उमेदवार रिंगणात उतरवला. त्यांनी राधा मोहन दास अग्रवाल यांना तिकीट दिलं. अग्रवालांचा पक्ष होता हिंदू महासभा. बरं हे करत सगळं असताना योगी आदित्यनाथ भाजपचेच खासदार होते आणि लोकसभेच त्याचं पक्षाचं प्रतिनिधित्व करत होते.

फोटो स्रोत, Getty Images
राधा मोहन दास अग्रवाल बालरोग तज्ज्ञ होते आणि त्यांना शहरातून पाठिंबा होता. त्यांना जिंकवणं योगी आदित्यनाथांनी आपल्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला होता.
राधा मोहन दास यांच्या विजयासाठी योगींनी जंगजंग पछाडलं आणि 2002 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला.
2002 साली योगी आदित्यनाथांनी हिंदू युवा वाहिनीची स्थापना केली होती हे नमूद करायला हवं.
तेव्हापासून आतापर्यंत राधा मोहन दासच गोरखपूरच्या जागेवरून आमदारकी जिंकत आलेले आहेत. पण आता पहिल्यांदा योगी आदित्यनाथ इथून निवडणुक लढवत आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेकांचे अंदाज होते की योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवतील, पण तसं न होता त्यांनी आपली उमेदवारी गोरखपूरमधूनच जाहीर केली.
तर राष्ट्रीय स्तरावर अशीही चर्चा आहे की अयोध्येतून निवडणूक लढवली असती तर योगी आदित्यनाथांना हिंदुत्ववादी नेता म्हणून मोदीच्या बरोबरीने स्थान मिळेल आणि म्हणूनच त्यांना अयोध्येऐवजी गोरखपूरहून तिकीट दिलं आहे.
पण गोरखपूरमध्ये अनेक वर्षं पत्रकारिता करणारे पत्रकार रशाद लारी यांना तसं वाटत नाही. ते म्हणतात, "योगी आदित्यनाथांनी कुठून निवडणूक लढवावी हा निर्णय भाजप नेतृत्व घेईल किंवा योगी त्यांना घेऊ देतील असं वाटत नाही. आता योगींचं महत्त्व वाढलंय. त्यांना जिथून वाटेल तिथूनच ते निवडणूक लढवणार. यात कोणी दुसरा हस्तक्षेप करू शकत नाही."
भाजपच्या दृष्टीने गोरखपूरची जागा का महत्त्वाची आहे याबद्दल बोलताना ते म्हणतात की, "गोरखपूरच्या ग्रामीण भागात भाजपसाठी नवी आव्हानं उभी राहिलीत. त्यामुळे असा अंदाज आहे की गोरखपूरच्या नऊ जागांपैकी तीन-चार जागा भाजप गमावू शकतं आणि म्हणून डॅमेज कंट्रोलसाठी योगी आदित्यनाथांना इथे आणलं असावं."
गंमत म्हणजे ज्या राधा मोहन दास अग्रवाल यांच्याऐवजी योगी आदित्यनाथ गोरखपूरच्या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत त्याच राधा मोहन दास अग्रवालांसाठी योगी आदित्यनाथांनी भाजपशी बंडखोरी केली.

फोटो स्रोत, MYOGIADITYANATH
गोरखपूरमधल्या अनेक जेष्ठ पत्रकारांनी खाजगीत बोलताना मान्य केलं की योगींनी राधा मोहन अग्रवाल यांचा गोरखपूरमधून पत्ता कट करायचा होता म्हणूनच त्यांनी या वेळी विधानसभेसाठी ती जागा निवडली.
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी राधामोहन अग्रवालांना आपल्या पक्षात येण्याची आणि आमदारकी लढवण्याची खुली ऑफर दिली होती. सुरुवातीला राधामोहन अग्रवालांनी या प्रकरणावर काही प्रतिक्रिया दिली नव्हती, त्यामुळे असा अंदाज बांधला जात होत की ते कदाचित सपात जाऊ शकतात.
असं झालं असतं तर ही निवडणूक भाजपला आणखी अवघड गेली असती. पण काही दिवसांनी राधामोहन अग्रवालांनी योगींना समर्थन जाहीर केलं.
भाजप नेतृत्वाशी सततचे उडणारे खटके
सन 2000 ते 2012 या काळात योगी आदित्यनाथांचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी अनेकदा खटके उडाले आहेत. काही वेळा त्यांनी भाजपच्या विरोधात सरळसरळ आपला उमेदवार उभा करून निवडून आणला तर कधी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी दिग्गज नेत्यांना प्रयत्न करावे लागले.
सध्या जरी योगी आदित्यनाथ भाजपचा एक प्रमुख चेहरा असले तरी त्या काळात त्यांचं नात 'लव्ह-हेट' अशाच प्रकारचं होतं.
रशाद लारी याबद्दल सविस्तर उलगडून सांगतात.
"देशाचं राजकारण आणि गोरखपूरचं राजकारण या दोन्ही गोष्टी संपूर्णतः वेगळ्या आहेत. इथे गोरखनाथ मठाचं वर्चस्व आहे. त्यामुळे आदित्यनाथांना हळूहळू हे कळून चुकलं होतं की या भागात तरायचं असेल तर भाजपला आपल्याशिवाय पर्याय नाही. आपण आहोत म्हणून भाजप आहे आणि म्हणूनच त्यांनी शक्तीप्रदर्शन करायला सुरुवात केली."

फोटो स्रोत, Getty Images
आज जरी भाजप आणि योगी आदित्यनाथ यांचे संबंध चांगले असले तरी सुरुवातीला असं नव्हतं. 2000 च्या दशकात मुळात योगी आदित्यनाथांना भाजपत फार मोठं स्थान नव्हतं. पण त्यांचा दबदबा गोरखपूर भागात खूप होता.
गोरखपूरमधले जेष्ठ पत्रकार मनोज सिंह याबद्दल बोलताना म्हणतात, "ते पूर्वांचलचे ताकदवान नेते होते, पण भाजप मात्र त्यांना कमी लेखायचं. त्यांच्या आणि भाजपच्या संघर्षाचे अनेक किस्से सांगता येतील. गोरखपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला होता.
2002 साली त्यांनी कसं भाजप उमेदवाराला पराभूत करून राधा मोहन दास अग्रवाल यांना निवडून आणलं तो किस्सा तर सर्वश्रुत आहे. भाजपचे उमेदवार शिव प्रताप शुक्ला कोणी लहान नेते नव्हते. त्यांचा समावेश मंत्रिमंडळातही होता. तरी ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले."
योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेली हिंदू युवा वाहिनी एक स्वतंत्र संघटना म्हणून काम करत होती. गोरखपूर आणि आसपासच्या भागात या संस्थेची ताकद वाढत होती त्यामुळे साहजिकच यात काम करणाऱ्या लोकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाही वाढायला लागल्या होत्या.
"योगींचं म्हणणं असायचं की आम्ही या भागातले मोठे नेते आहोत, आमची व्होट बँक आहे, त्यामुळे आमच्या काही लोकांना तिकीट मिळायला हवं, पण भाजप मात्र हिंदू युवा वाहिनीच्या नेत्यांना फारसं महत्त्व देत नव्हता," मनोज सिंह म्हणतात.
मठाचा आशीर्वाद असेल तोच जिंकेल
गोरखपूरमध्ये एक समीकरण कित्येक दशकांपासून रूढ आहे, ते म्हणजे गोरक्षनाथ मठाच्या महंतांचा आशिर्वाद ज्याला असेल तोच जिंकेल. योगी आदित्यनाथ स्वतः तिथे पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले. त्याआधी योगींचे पूर्वासुरी महंत अवैद्यनाथ खासदार होते.
"स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असेल किंवा लोकसभेची, ज्याच्या डोक्यावर मठाच्या महंताचा हात असेल तोच निवडणूक जिंकणार हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य होतं. आदित्यनाथ महंत झाल्यावरही पूर्वांचलच्या राजकारणात भाजपने त्यांचं महत्व जाणून घेतलं नाही. त्यांना कमी लेखलं. त्यामुळे अनेकदा ते भाजपच्या विरोधात उभे ठाकले आणि आपला उमेदवार जिंकून आणला," रशाद लारी म्हणतात.
गोरखपूरचे पत्रकार योगींच्या बंडखोरीचे अनेक किस्से सांगतात. यातलाच एक किस्सा म्हणजे 2009 सालचा. यावेळी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही ते फारच नाराज झाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
"त्यांनी पुन्हा बंडाचा झेंडा रोवला आणि आपले 27-28 उमेदवार संपूर्ण पूर्वांचलच्या प्रदेशात उभं करण्याचं ठरवलं. त्यांनी रीतसर घोषणा केली की मी माझे उमेदवार भाजपच्या विरोधात उतरवीन. तेव्हा भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांनी नाकदुऱ्या काढल्या. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, मुख्तार अब्बास नकवी अशा नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी गोरखनाथ मंदिर गाठलं. मग आदित्यनाथांनी आपलं बंड मागे घेतलं," रशाद पुढे सांगतात.
हिंदू युवा वाहिनीला बाजूला सारलं
2000 ते 2012 या काळात योगी आदित्यनाथ आणि भाजपचे खटके उडत असले तरी 2014 नंतर या प्रकरणावर पडदा पडला. योगी आदित्यनाथांनी आपलं स्थान भाजपत बळकट करून घेतलं होतं आणि पूर्वांचलमध्ये तर त्यांना महत्त्व होतंच.
मनोज सिंह म्हणतात, "भाजपला कळून चुकलं की या भागात टिकायचं असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही आणि योगी आदित्यनाथांनाही कळलं होतं की पूर्वांचल सोडून राष्ट्रीय नेता अशी प्रतिमा बनवायची असेल तर प्रत्येक वेळेस भाजपशी पंगा घेऊन काही उपयोग नाही."

फोटो स्रोत, Getty Images
याचमुळे 2014 नंतर राजकारणात योगी आदित्यनाथांनी आपली संघटना असलेल्या हिंदू युवा वाहिनीचं महत्त्व कमी केलं. त्या संघटनेच्या अनेक नेत्यांना बाजूला सारलं. परिणामी 2017 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये हिंदू युवा वाहिनीच्या अनेक मातब्बर नेत्यांनी बंडखोरी केली. यातले सुनील सिंह एकेकाळी योगी आदित्यनाथांचे अतिशय जवळचे मानले जायचे.
या बंडखोर नेत्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आणि आदित्यनाथांनी त्यांना पक्षातून तसंच संघटनेतून निलंबित केलं. सुनील सिंह आता समाजवादी पक्षात आहेत.
गेली 5 वर्ष हिंदू युवा वाहिनी राजकारणात जवळपास निष्क्रियच होती.
"योगी आदित्यनाथांनी त्यांचे लगाम खेचून ठेवले होते. पण आता ही संघटना पुन्हा सक्रिय झालीय आणि सध्याचं राजकीय वातावरण पाहाता योगींनाही या संघटनेची गरज आहे असं दिसतंय," मनोज सिंह उत्तरतात.
गोरखपूरच्या अनेक विश्लेषकांनी आम्हाला सांगितलं, कोणी स्पष्टच तर कोणी खाजगीत, की यंदा पूर्वांचलमध्ये भाजपपुढे नवी आव्हानं उभी आहेत. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ आणि भाजपचं 'कभी हां, कभी ना' वालं नातं कुठल्या वळणावर पोचणार ते येणारा काळच सांगेल.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









