एकनाथ खडसे : 40 वर्ष हमाली करूनही फडणवीसांना डोक्यावर आणून बसवलं #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Facebook
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. 40 वर्ष हमाली करूनही मला डावलत फडणवीसांना डोक्यावर आणून बसवलं-एकनाथ खडसे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत भाजपनं त्यांच्यावर अन्याय केल्याचं म्हटलं आहे.
एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
"भाजपमध्ये चाळीस वर्षे हमाली केली, उभं आयुष्य पक्षासाठी खर्ची घातलं, पण मुख्यमंत्रीपदाची वेळ आल्यावर फडणवीसांना डोक्यावर बसवलं," असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
'हा नाथाभाऊ मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला होता, पण त्याचवेळी नाव वगळण्यात आलं आणि मला डावलून अन्याय केला,' असंही एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्यांना आम्ही घडवलं, पण तरीही सातत्यानं अपमान झाल्याचा आरोप खडसेंनी यावेळी बोलताना केला.
2. मुंबई मनपातील भ्रष्टाचार समोर आणण्यासाठी विशेष ऑडिटची फडणवीसांची मागणी
मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्याची विशेष कॅग ऑडिटच्या माध्यमातून तपासणी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं.
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC)स्थायी समितीची बैठक ऑनलाइन घेतली जाते, त्यात भाजप नेत्यांना म्यूट केलं जातं. कोरोनाच्या नावाखाली बोलू दिलं जात नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई महानगरपालिकेत ज्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, तेवढा महाराष्ट्रातच काय देशातही कुठे पाहायला मिळणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करतानं म्हटलं आहे.
कोरोनाच्या संपूर्ण काळात कोरोनाशी संबंधित घेतलेल्या निर्णयांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. कॅगच्या विशेष ऑडिटशिवाय हा घोळ लोकांच्या लक्षात येणार नाही, असा दावा फडणवीसांनी केला.
3. राज्यात मास्कमुक्तीच्या चर्चांवर आरोग्य विभागाने दिले 'हे' संकेत
संपूर्ण राज्यामध्ये आता कोरोनाचं संकट कमी होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मासमुक्तीबाबतच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
लोकमतनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र मास्क मुक्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मास्कमुक्ती होणार नसल्याचं या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
राज्याच्या कोव्हिड विषयक कृतीदल यावर अभ्यास करून त्याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय घेईल, असं टास्क फोर्सकडून सांगण्यात आलं आहे.
मास्कच्या वापरामुळं प्रदूषण, धूळ आणि धुरक्यामुळं होणाऱ्या श्वसनांच्या आजारापासूनही संरक्षण होतं. त्यामुळं कोरोनानंतरही निरोगी जीवनशैलीसाठी मास्कचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
4. हिंदी राष्ट्रभाषा आहे का? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
हिंदी ही खरंच आपल्या देशाची राष्ट्रभाषा आहे का? असा सवाल सुप्रीम कोर्टात एका याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानंतर एका तेलुगू भाषकानं सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. टीव्ही9 नं याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई उच्च न्यायालयानं एका प्रकरणात हिंदी हीच देशाची राष्ट्रभाषा असल्याचा निर्णय दिला होता. टूर ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करताना प्रत्येकाला राष्ट्रभाषेचं ज्ञान असायला हवं, असं मतही उच्च न्यायालयानं नोंदवलं होतं.
एका प्रकरणात या व्यावसायिकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. केवळ तेलुगु भाषा समजत असतानाही, त्याला हिंदीतून त्याच्या संविधानात्मक हक्कांची माहिती देण्यात आली होती. त्यावर आक्षेप घेत या व्यक्तीनं जामीनासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला होता.
"टूर-ट्रॅव्हलचा व्यवसाय असल्यानं तुम्हाला राष्ट्रभाषेचं ज्ञान असणं आवश्यकच आहे. हिंदी राष्ट्रभाषा आहे, त्यामुळं आम्ही तुम्हाला दिलासा देऊ शकत नाही, असं न्यायालयानं म्हटलं होतं. त्यानंतर हिंदी राष्ट्रभाषा आहे का? याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली आहे.
5. राजनाथ सिंह यांच्या सभेत बेरोजगार तरुणांची घोषणाबाजी
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या सभेमध्ये भाषणादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना बेरोजगार तरुणांच्या नाराजीचा सामना करावा लागल्याचं पाहायला मिळालं.
एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
उत्तर प्रदेशच्या गोंडा परिसरात भाजपचे स्टार प्रचारक राजनाथ सिंह यांच्या सभेचं आयोजनं करण्यात आलं होतं. पण ते भाषणाला उभे राहताच काही युवकांनी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
लष्करात भरती करण्याची मागणी करण्यासाठी तरुणांकडून ही घोषणाबाजी करण्यात आला. त्याता राजनाथ सिंह यांनी भरती होणार असं सांगत शांत करण्याचा प्रयत्न केला.
तुम्हाला जशी काळजी आहे, तीच आम्हालाही आहे. केवळ कोरोनामुळं काही अडचणी आल्या होत्या, असं तरुणांना सांगत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न राजनाथ यांनी केला.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









