गोवा विधानसभा निवडणूक निकाल : सत्ता स्थापनेसाठी किती जागा हव्या? निकाल कधी आहेत?

देशभरातील पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रामुख्यानं गोव्याच्या निवडणुकीकडं यावेळी सगळ्यांचंच लक्ष लागलेलं पाहायला मिळत आहे. छोटंसं राज्य असलं तरी याठिकाणी या निवडणुकीत असलेली समीकरणं ही अत्यंत रंजक आहेत. 10 मार्चला गोव्यातल्या निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.

14 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात गोवा राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं.

गोवा विधानसभा

गोव्यात 40 विधानसभा मतदारसंघ आहेत.

14 फेब्रुवारीला एकूण 79% मतदारांनी आपलं मत इथे नोंदवलं. 10 मार्चला आता मतमोजणी होऊन या निवडणुकीचे निकाल लागतील.

ज्या पक्षाला 21 किंवा त्यापेक्षा अधिक जागा मिळतील त्याच्या हाती सत्ता असेल.

2017 विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?

40 विधानसभा मतदारसंघ असलेल्या गोव्यामध्ये 2017 च्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला थेट बहुमत मिळालं नाही. काँग्रेसला एकूण 17 जागा मिळाल्या होत्या.

पण प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांच्या साथीनं भाजपने जुळवाजुळव केली आणि सत्तेवर दावा केला.

केंद्रात मंत्री असलेल्या मनोहर पर्रीकरांना भाजपने राज्यात परत पाठवलं आणि त्यांनी पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

पण पर्रीकरांच्या निधनानंतर गोव्यातलं चित्र बदललं. प्रमोद सावंत पर्रीकरांनंतर गोव्याचे मुख्यमंत्री झाले.

उत्पल पर्रीकरांचं बंड

मनोहर पर्रीकरांचा मुलगा उत्पल पर्रीकर यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.

कोणते मुद्दे निर्णायक ठरू शकतात?

दिवंगत नेते मनोहर पर्रीकर हा भाजपचा गोव्यातला सगळ्यात मोठा आणि मजबूत चेहरा होते. भाजपाच्या गेल्या दोन दशकांतल्या इथल्या यशामध्ये मनोहर पर्रिकरांची प्रतिमा, त्यांना ख्रिश्चनांसहित सगळ्या वर्गातून असणारा पाठिंबा, त्यांनी बसवलेलं राजकीय गणित या सगळ्या जमेच्या बाजू होत्या.

पण आता पर्रीकर नसल्याने भाजपकडे हा फायदा नाही. यंदाच्या निवडणुकीत गोव्यासाठीची भाजपचं सूत्रं प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या हाती होती.

गोव्याच्या निवडणुकीत स्थानिक पक्ष तर आहेतच पण आम आदमी पार्टी - आपनेही यंदा गोव्यातून निवडणूक लढवलेली आहे. आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही गोवा भेटीसाठी खास वेळ काढला होता.

ममता बॅनर्जींच्या तृणमूलनेही राज्यात प्रवेश केला असून ममतांनी गोव्याला भेटही दिली.

'आप'हा फॅक्टर इथं निवडणुकीपश्चातही महत्वाचा ठरेल असं म्हटलं जातं आहे. केजरीवाल यांनी गोव्याला वेळ देऊन इथली लढत प्रतिष्ठेची केली आहे. या पक्षांनी लावलेल्या ताकदीमुळे छोट्या आकाराच्या गोव्याच्या मतदारसंघांमध्ये मतांची गणितंही बदलणार आहेत. त्यामुळे हा या निवडणुकीतला लक्ष ठेवण्यासारखा मुद्दा बनला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)