You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठी भाषेला दर्जा नसल्याचे सांगत जेव्हा काशीच्या पंडितांनी एकनाथांचा ग्रंथ नाकारला होता...
- Author, प्राजक्ता धुळप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
प्राचीन काळापासून काशी नगरी म्हणजेच आजच्या वाराणसीचे उल्लेख सापडतात. वाराणसी हे धार्मिक केंद्र बनण्याअगोदर भौगोलिक दृष्ट्या महत्त्वाचं असल्याने व्यापाराचं केंद्र होतं, असं इतिहासकार मानतात. पण पुढे वेगवेगळ्या राजवटींमध्ये तिला सांस्कृतिक वैभव लाभत गेलं.
अनेक शतकं वाराणसी हे जैन, बौद्ध, वैदिक, शैव, वैष्णव अशा अनेक धार्मिक विचारांचं, ज्ञानार्जनाचं, ग्रंथलेखनाचं, खंडन-वादविवादाचं केंद्र राहिलं.
आज भारत तसंच जगभरातील अनेकांच्या मनात वाराणसी हे पाप-पुण्य, मोक्ष, पावित्र्य किंवा कर्मकांडाचं ठिकाण आहे. पण महाराष्ट्रातल्या संताचं आणि वारकरी संप्रदायाचं वाराणसीशी असलेलं नातं यापेक्षा वेगळं आहे.
वारकरी संप्रदाय हा भागवत धर्माचं आचरण करतो. त्यासाठी ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, हरिपाठ, तुकोबांची गाथा अशा संतांनी लिहिलेल्या ग्रंथांची पारायणं करतो. विठ्ठल या वैष्णव देवतेची उपासना केली जाते तर पंढरपूर हे तीर्थक्षेत्र मानतो.
संत एकनाथांनी श्रीमदभागवतच्या एकादशस्कंधावरील टीका वाराणसीत लिहून पूर्ण केली. 1467 श्लोकांवर मराठीत भाष्य केलं. या ग्रंथाला एकनाथी भागवत म्हटलं जातं. या ग्रथांच्या लेखनाचा प्रवास अतिशय रंजक आणि नाट्यमय आहे.
लक्ष्मण पांगारकर यांनी 1911मध्ये लिहिलेल्या संत एकनाथ चरित्रात या घटनेचं वर्णन आहे.
नाथभागवताचे पहिले दोन अध्याय लिहून झाले होते. नित्यपाठ करण्यासाठी त्याची एक प्रत घेऊन नाथांचा शिष्य काशीला गेला. तिथल्या मणिकर्णिका घाटावर संध्याकाळी वाचत बसलेला असताना एका नामांकीत संन्याशाच्या शिष्याने त्याला पाहिलं.
भागवतचा अर्थ मराठीत सांगणारे एकनाथ कोण आहेत हे मग त्या संन्यासी स्वामींनी नाथांच्या शिष्याकडून जाणून घेतलं. आणि क्रोधाने एकनाथांना पैठणहून येण्यासाठी निरोप पाठवलं. पांडित्यावरची संस्कृतची मक्तेदारी मोडणारी घटना घडली होती.
संत एकनाथांची परीक्षा
संत एकनाथ काशीला धर्मशाळेत येऊन राहिले. त्यांची विरोध करणाऱ्या स्वामींशी दिर्घ चर्चा झाली. त्यात असं ठरलं की 10 भागवती विद्वान बसवून त्यांच्यासमोर स्वामींच्या अध्यक्षतेखाली नाथांच्या ग्रंथाची परीक्षा करावी. त्यानुसार चार दिवस या परीक्षा सभा सुरू होत्या. तेव्हा 'नाथांचा ग्रंथ अगदी निर्दोष असून पूर्ण प्रासादिक आहे', असा निर्वाळा देण्यात आला.
त्यानंतर संपूर्ण भागवत ग्रंथ काशीतच राहुन पूर्ण करण्याची विनंती संत एकनाथाना करण्यात आली. पुढल्या सहा महिन्यांत त्यांनी तो ग्रंथ लिहून पूर्ण केला असं त्यांच्या शिष्यांनीच लिहून ठेवलंय. तर त्यांच्या चरित्रकारांनी ते 2 वर्षं काशीत राहिले असावेत असं लिहिलंय.
भागवत ग्रंथ मराठीत लिहून पूर्ण झाल्यावर स्वामींनी काशीतल्या पंडितांना विनंती केली की, 'या अपूर्व ग्रंथाच्या विजयार्थ येथें मोठा उत्सव करावा.'
'पण मराठी भाषेला दर्जा नसल्याने ती ऐकणं हे दूषण आहे' असं सांगत काही पंडितांचा या उत्सवाला आक्षेप होता. तरीही हा विरोध पत्करून स्वामींनी संत एकनाथांची हत्तीवरून मिरवणूक काढायचं ठरवलं. पण एकनाथ - "मी ब्राम्हणांचा दासानुदास । निजकृपेची धरूनी आस । सद्भावे पुजावे या ग्रंथास । तेणे संतोष आम्हासी" या मताचे होते. त्यांनी शेवटपर्यंत हत्तीवर बसायला नकार देत भागवत ग्रंथ अंबारीत मांडला आणि पूजा करून मिरवणूक काढली.
एकनाथी भागवताच्या अनेक प्रती काशीतल्या भाविकांनी करून घेतले. त्यानंतर ते पैठणकडे जायला निघाले.
इतिहासकार आणि संत साहित्याचे अभ्यासक सांगतात त्या काळी काशी हे धार्मिक ग्रंथांच्या अभ्यासाचं महत्त्वाचं ठिकाण होतं.
'प्राकृत काय चोरोपासुनि झाली?'
प्रसिद्द इतिहासकार आणि संस्कृतचे प्राध्यापक शीतला प्रसाद उपाध्याय आजकल या साहित्य-संस्कृती मासिकाच्या काशी विशेष अंकात काशीच्या बौद्धिक खजिन्यावर प्रकाश टाकतात.
ते लिहितात, "काशीच्या सांस्कृतिक इतिहासात सोळावं आणि सतरावं शतक विद्वत्तेच्या दृष्टीने सुवर्णयुग राहिलेलं दिसतं. त्यावेळी इथे मिथिला, बंगदेश, गुर्जर, हिमालयाचा पहाडी प्रदेश, नेपाळ, सुदूर दक्षिण देश- तेलंग, द्रविड देश अशा विविध प्रदेशातील पंडित विद्वान उपस्थित होते."
"याच काळात काशीत महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत कवी एकनाथ यांचा निवास होता. काशीत एकनाथांनी हिंदी तसंच फारसी भाषेचं ज्ञान संपादीत केलं."
संत एकनाथांनी आपला ग्रंथ 1551 साली लिहिला असा उल्लेख वाराणसीचे अभ्यासक करतात.
एकनाथी भागवताचं योगदान सांगताना संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे सांगतात, " श्रीकृष्णाने आपल्या दोन शिष्यांना उपदेश केला. अर्जुनाला केलेला उपदेश आपण भगवतगीता या नावाने ओळखतो. तर दुसरा उपदेश शिष्य आणि चुलतभाऊ असलेल्या उद्धवाला केला. अकराव्या स्कंदात हा उपदेश आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने भगवतगीता मराठीत आणली. म्हणजेच श्रीकृष्णाचा एक उपदेश आणून निम्म काम केलं. श्रीकृष्णाचा दुसरा उपदेश राहिला होता, ते काम एकनाथांनी पूर्ण केलं. त्यामुळे गीता आणि भागवत हे मराठी जनांसाठी ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत रूपाने समोर आलं."
एकनाथांच्या प्राकृत (मराठी) भाषेला संस्कृत पंडितांचा विरोध होता हे उघडच आहे. एकनाथांनी या विद्वानांच्या रोषाला उत्तर देताना म्हटलंय- 'संस्कृत वाणी देवे केली । तरी प्राकृत काय चोरोपासुनि झाली?'
भागवत धर्माची पताका घेतलेल्या महाराष्ट्रातल्या संतांनी संस्कृत पंडितांची मक्तेदारी मोडण्याचं काम केलं आणि ग्रंथ-पोथ्यांमधलं ज्ञान ओवी, अभंग, कथांच्या रुपात बहुजनांसाठी खुलं केलं. या ज्ञानाचा अर्थ रोजच्या जगण्याशी जोडला.
सर्वात श्रेष्ठ तीर्थक्षेत्र कोणतं?
महाराष्ट्रातल्या या संतांनी भारतातल्या पवित्र समजल्या जाणाऱ्या तीर्थस्थळांची तुलना पंढरपूरशी केलेली दिसते. पंढरपूर हे इतर तीर्थक्षेत्रांपेक्षा कसं वेगळं आहे याची मांडणी अनेक संतांनी आपल्या रचनेत केली आहे.
संत ज्ञानेश्वर म्हणतात-
काशी, अयोध्या, कांची, अवंती, मथुरा माया गोमती ।
ऐसी तिर्थे इत्यादिके आहेसी, परी सरी न पवती ये पंढरी ।।
याचा अर्थ, प्रसिद्ध असणाऱ्या या तीर्थक्षेत्रांची तुलना केली तरी पंढरीशी बरोबरी होऊ शकत नाही.
डॉ. सदानंद मोरे अशा अनेक रचनांचा दाखला देतात.
संत एकनाथांचं असंच एक पद आहे-
काशी क्षेत्र श्रेष्ठ सर्वांत पवित्र ।
परी तेथें वेंचे जीवित्व श्रेष्ठ तेव्हा ॥१॥
तैसी नोहे जाण पंढरी हे ।
पेठ वैकुंठा वैकुंठ जुनाट हें ॥२॥
"काशीत कोणी मृत्यू पावलं तर तिथेच त्याला मोक्ष मिळतो, हे काशीचं मोठं वैगुण्य असल्याचं ज्ञानेश्वर सांगतात. पण पंढरपूरमध्ये असं नाही. पंढरपूर वैकुंठाचंही वैकुंठ आहे. तिथे अशा कल्पनांना स्थान नाही."
काशी आणि कर्मकांड
वारकरी संप्रदायासमोर संतांनी पाप-पुण्याच्या संकल्पनांना छेद देणारी भूमिका मांडलेली दिसते. आणि तीर्थक्षेत्रांवर होणाऱ्या कर्मकांडांवर ते रोखठोक टिप्पणी करतात.
एकनाथ म्हणतात-
प्रयागादि क्षेत्रें आहेत कल्पकोडी । तया आहे खोडी एक एक ॥१॥
मुंडन ती काया निराहार राहणें । येथेम न मुंडणें काया कांहीं ॥२॥
म्हणोनी सर्व तीर्थामाजी उत्तम ठाव । एका जनार्दनीं जीव ठसावला ॥३॥
कोणत्याही प्रकारचं कर्मकांड करावं लागत नाही अशी पंढरीचा पुरस्कार संत एकनाथही करतात.
डॉ सदानंद मोरे म्हणतात- "पुण्य आणि मोक्ष मिळवण्यासाठी काशीला जायची गरज नाही हा विचार महाराष्ट्रातल्या संतांनी अगदी तेराव्या शतकापासून मांडला. संत ज्ञानेश्वरांपासून ते तुकोबांपर्यंत सर्वांच्या वाणीतून हाच विचार प्रकट झालेला दिसतो. उदाहरणार्थ हा अभंग पाहा-
वाराणसी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीच्या ॥1॥
पंढरीसी नाहीं कोणा अभिमान । पायां पडे जन एकमेका ॥2॥
तुका ह्मणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरीं यम न ये ॥3॥
इतर तीर्थक्षेत्रांविषयी या संतांची वेगळी दृष्टी असली तरी इतिहासात त्यांनी वेगवेगळ्या कारणाने या प्रसिद्ध स्थळांना भेटी दिल्याचे दाखले आहेत. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतरच्या काळात संत ज्ञानेश्वर बंधू निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई आणि संत नामदेव यांच्यासह काशीला जाऊन आल्याचे उल्लेख सापडतात.
काशीतल्या गंगेचं पाणी गाढवाला?
तीर्थयात्रा करताना गंगा नदीचं पाणी दक्षिणेतल्या समुद्रात नेणं आणि समुद्राचं पाणी गंगेत वाहणं, ही पूर्वापार चालत आलेली प्रथा. असंच एकदा एकनाथ गंगेचं पाणी घेऊन प्रवास करत होते.
संत एकनाथांच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. 'एकदा नाथ काशीची कावड घेऊन रामेश्वरला चालले होते. त्यांचे शिष्यही त्यांच्यासोबत होते. वाटेत वाळवंटात पाण्यावाचून तडफडणारं गाढव त्यांनी पाहिलं आणि आपल्याजवळच्या काशीच्या गंगेचं पाणी (गंगोदक) त्याला पाजलं. हे पाहून शिष्यांना पाणी वाया गेलं आणि यात्रा निष्फळ झाली असं वाटलं. त्यावर एकनाथ म्हणाले, माझी पूजा रामेश्वरला इथेच पावली. देव सर्ववत, सद्रूप आहे.'
पाणी एकोपंत द्रवुनि विकळ तृषित रासभा पाजी
'तें लक्षविप्रभोजनस झाले' म्हणती साधु बापाजी
एका गाढवाला वेळेला पाणी मिळाले त्याचे श्रेय लक्ष ब्राह्मणभोजनाहून जास्त आहे.
एकनाथ महाराजांनी ग्रंथसंपदा तयार करण्यासोबतच आपल्या आचरणातून अनेक वचनांचा पाठ प्रत्यक्षात घालून दिला. समाजातल्या जातीभेदावरही प्रहार करण्याचं काम एकनाथांनी केलं.
"एकनाथ सर्वसामान्य लोकांच्या भावना सांभाळून, त्यांच्या कलेकलेने शिकवणी देणारे संत होते. एकदा विश्वास संपादन केल्यावर लोकांना न आवडणाऱ्या गोष्टी सांगता येतील सं त्यांचं धोरण होतं. ज्ञानेश्वरीत सांगितलेल्या लोकसंग्रह या तत्वाचं तंतोतंत पालन एकनाथांनी आपल्या आयुष्यात केलं, असं म्हणावं लागेल.
कर्मकांडापेक्षा प्रत्यक्ष जिवंत असलेल्या प्राण्याला मदत करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कर्मकांडाची निरर्थकता प्रत्यक्ष कृतीतून दाखवली. सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यातला परमार्थ संतांनी सांगितला"
संत कबीरांची पंढरपूर पालखी
वारकरी संप्रदायाचा वाराणसीशी असलेला महत्त्वाचा दुवा म्हणजे संत कबीर दास. पंधराव्या शतकात होऊन गेलेले कबीर भारतात लोककथा, लोकगीतांमध्ये आजही सांगितले जातात. कबीर हिंदू होते की मुस्लीम यावर मतमतांतरं आहेत. पण कबीरांवर, त्यांच्या विचारांवर, साहित्यावर वेगवेगळ्या धर्माच्या विचारांचा प्रभाव होता.
पारसनास तिवारी यांनी लिहिलेल्या कबीर चरित्रात म्हटलंय "हिंदू देवदेवतांचे भजन करतो म्हणून मुस्लीम कबीरावर नाराज होते, तर दुसरीकडे मूर्तिपूजा, स्पृश्यास्पृश्यता यांची थट्टा उडवतो म्हणून हिंदू त्यांच्यावर चिडलेले असायचे. कबीर रामाचं मात्र गुणगान गायचेय. कारण त्यांचा राम हिंदूच्या रामापेक्षा वेगळा होता."
त्याच काळात वैष्णव आचार्य स्वामी रामानंद काशी यांच्याकडून वैष्णव पंथाची दीक्षा घ्यावी असं कबीरांच्या मनात आलं. आणि त्यांनी ती मोठ्या युक्तीने मिळवली.
कबीरांना कोणत्याच धर्माच्या आणि पंथाच्या मर्यादा नव्हत्या.
गोकुल नाईक बीठुला (विठ्ठल) मेरा मन लागा तोहिं रे ।
बहुतक दिन बिछुरे भए तेरी औसेरि आवौ मोहिं रे ।।
याचा अर्थ 'हे गोकुळनायका! विठ्ठला! माझे मन तुझ्या ठायी रंगले आहे. आफला विरह झाल्याला खूप काळ लोटला आहे' संत कबीरांनीही आपल्या दोह्यात विठ्ठलाचा धावा केला आहे.
संत नामदेवांनी उत्तरेत रुजवलेल्या भक्ती परंपरेचा प्रभावही कबीरांवर होता असं अभ्यासक म्हणतात.
कबीर आणि वारकरी संप्रदायाचं वेगळं नातं असल्याचं मोरे सांगतात. "उत्तरेतल्या कोणत्याही संताला कबीरांइतकी इकडे स्वीकृती मिळाली नाही. कबीरांच्या रचना वारकरी परंपरेचा भाग आहेत. आजही त्यांच्या कथा सांगितल्या जातात. कबीरांना वारकऱ्यांनी आपलं मानलं. खुद्द तुकोबांनी चार ज्येष्ठ संत कोण असं म्हणताना ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि कबीरांचा नामघोष केलाय."
19व्या शतकाच्या अखेरपर्यंत वाराणसीहून कबीराची पालखी पंढरपूर यात्रेत सामील होत होती. न्यायमूर्ती रानडे यांनी आषाढी एकादशीला पुण्यात येणाऱ्या पालख्यांची मोजदाद केल्याची नोंद सापडते. पण कबीरांच्या पालखीची परंपरा का आणि कधी खंडीत झाली याचा तपास लागत नाही."
कबीर पंथाने कबीरांच्या विचारांचा आणि साहित्याचा प्रसार पुढे अनेक शतकं केला. कबीरांचे दोहे जसे वारकरी परंपरेत येतात तसे शीखांचा पवित्र ग्रंथ 'गुरू ग्रंथ साहिब'मध्ये कबीरांच्या दोनशेहून अधिक दोह्यांचा समावेश केलेला आहे.
आजही वाराणसीत कबीर चौरा मठ प्रसिद्ध आहे. तिथे त्यांचं निवासस्थान होतं अशी काहींची श्रद्धा आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)