दिल्लीतून 2024 नंतर मोठा फंड आणता येईल - आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्यं #5 मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Twitter / AUThackeray
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर आज सकाळी प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
1. दिल्लीतून 2024 नंतर मोठा फंड आणता येईल - आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्यं
विकासासाठी निधी हा अत्यंत गरजेचा असतो. दिल्लीतूनही निधी मिळणं गरजेचं असतं. 2024 नंतर शिवसेना खासदारही दिल्लीतून मोठा निधी मिळवू शकतील, असं म्हणत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भविष्याबाबत संकेत दिले आहेत. एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
डोंबिवलीमध्ये आदित्य ठाकरेंच्या हस्ते विविध कामांचं उद्घाटन झालं, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मात्र वेगवेगळे अंदाज बांधून राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.
डोंबिवली-कल्याण शहराकडे विशेष लक्ष असल्याचं सांगताना ते मुंबई ही आई आणि कल्याण डोंबिवली मावशी आहे, त्यामुळं याकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचं म्हटलं.
संजय राऊत यांनी सोमय्यांवर केलेल्या आरोपांबाबतही त्यांना प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांनी आता मॅच सुरू केली आहे, आता त्यांची पुढची बॅटिंग पाहू, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-अजनी वन प्रकल्पाला माझा वैयक्तिक नव्हे तर पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. त्यामुळं येथील वन वाचवण्यासाठी सध्या विचार सुरू असल्याचं ते म्हणाले.
2.राऊत-सोमय्या वादातील जमीन मालक आला समोर, म्हणाला राऊतांकडून कोणताही दबाव नव्हता
भाजप नेते किरिट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यातील वाद हा वाढत चालल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. आता सोमय्यांनी एका जमीन प्रकरणी केलेल्या आरोपात, जमीन मालक समोर आला असून त्यांनं महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं.

फोटो स्रोत, Getty Images
संजय राऊत यांनी अलिबाग याठिकाणी जमीन मालकावर दबाव आणत जमीन विकत घेतल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. मात्र आता जमीन मालकच समोर आला असून त्यानं सोमय्यांचा आरोप फेटाळला आहे.
'मीच संजय राऊत यांना जमीन विकली. पण त्यात कोणताही दबाव माझ्यावर नव्हता. खेळीमेळीच्या वातावरणात हा व्यवहार झाला,' असं त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं.
कोर्लई गावात रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात त्याठिकाणी पक्कं बांधकामच नसल्याचंही समोर आलं आहे.
3.मनमोहन सिंग यांच्या टिकेला सीतारामन यांचे प्रत्युत्तर, म्हणाल्या 'तुमच्याकडून ही आशा नव्हती'
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर केलेल्या आरोपांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी तुमचा खूप सन्मान करते, तुमच्याकडून ही आशा नव्हती, असं सीतारामन म्हणाल्या. एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
मनमोहन सिंग यांना भारताला सर्वात दुबळा देश बनण्यासाठी आणि देशातील भीषण महागाईसाठी ओळखलं जातं, असं सीतारामन प्रतिहल्ला करताना म्हणाल्या. पंजाब निवडणुकीमुळं तर मनमोहन यांनी हे वक्तव्य केलेलं नाही ना, असा सवालही त्यांनी केला.

फोटो स्रोत, Getty Images
सत्तेत असतानाही नेमका कारभार कसा चालतो हे दीर्घकाळ सिंग यांना माहितीच नव्हतं, अशी टीकाही सीतारामन यांनी केली.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या जनतेसाठी एक व्हीडिओ संदेश जारी केला आहे. त्यात त्यांनी अर्थव्यस्था, चीन सीमा वाद यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. सरकारचा राष्ट्रवाद पोकळ आणि तेवढाच धोकादायक असल्याचंही सिंग म्हणाले आहेत.
4. अजिंक्य राहाणेला रणजी स्पर्धेत गवसला फॉर्म, शतकी खेळ करत टीकाकारांना प्रत्युत्तर
गुरुवारपासून रणजी चषक स्पर्धेला सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात भारताचा कसोटी फलंदाज अजिंक्य राहाणेनं शतकी खेळी करत टीकाकारांची तोंडं बंद केली आहे. महाराष्ट्र टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
मुंबईकडून खेळताना राहणेनं ही कामगिरी केली आहे. काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असल्यानं राहणेवर सगळीकडून टीका केली जात होती.

फोटो स्रोत, Getty Images
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील राहाणेचं हे 36 वं शतक आहे. संघाला गरज असताना त्यानं ही कामगिरी करून दाखवली आहे. 14 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं त्यानं शतक पूर्ण केलं.
गेल्यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये राहणेचा फॉर्म अत्यंत खराब राहिला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यात पुढील महिन्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. त्यापूर्वी राहणे फॉर्मात परतल्यानं टीकाकारांना उत्तर मिळालं आहे.
5. आठवडाभरात दुसऱ्यांदा डाऊन झालं ट्विटर, अनेक यूझर्सला आली समस्या
मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरचं सर्व्हर गुरुवारी पुन्हा डाऊन झालं होतं. एका आठवड्यातली असं होण्याची ही दुसरी वेळ आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9.42 वाजेपासून जगभरातील ट्विटर यूझर्सना समस्येचा सामना करावा लागला. झी न्यूजनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
यूझर्स जेव्हा ट्विटर ओपन करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा पेज पर 'Something Went Wrong' असा संदेश येत होता.
अनेक यूझर्सनं त्यांच्या तक्रारींबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. तसंच याबाबत रिपोर्टही केलं आहे. काही यूझर्सच ट्विटर यामुळं पूर्णपणे ठप्प झाल्याचंही पाहायला मिळालं. तक्रारीवरून ही बाब समोर आली.
यापूर्वी 11 फेब्रुवारीलाही ट्विटरचं सर्व्हर जवळपास एका तासासाठी डाऊन होतं. त्यावेळी ट्विटरनं तांत्रिक बगमुळं हा प्रकार घडला असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









