बैलगाडा शर्यत: हात सोडून घोडेस्वारी करणारे 75 वर्षांचे आजोबा म्हणतात, आपला नादच...

आजोबा
    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"घोडीवर बसल्यावर बारा वर्षाचाच असल्यासारखं वाटतं. इतका आनंद होतो."

हात सोडून घोडेस्वारी करणारे 75 वर्षीय मधुकर पाचपुते सांगत होते. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

मधुकर पाचपुतेंना लोक 'मधुनाना' म्हणतात. त्यांचा बैलगाडा शर्यतीमध्ये हात सोडून घोडेस्वारीचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. वयाच्या 75 व्या वर्षी हात सोडून घोडेस्वारी करत असल्याने सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक करण्यात येतंय. 16 फेब्रुवारीला निमगाव दावडी गावात झालेल्या शर्यतीत देखील त्यांनी हात सोडून घोडी चालवली.

पुणे जिल्हयातल्या खेड तालुक्यातील चिंचोशी हे मधुनाना यांचं गाव. मधुनाना हे शेती करतात. परंतु त्यांना घोडेस्वारीची आवड पहिल्यापासून होती. गेल्या 50 वर्षांपासून ते घोडेस्वारी करतायेत. जिथे जिथे बैलगाडा शर्यत होते, तिथे ते त्यांची बैलजोडी उतरवतात आणि त्याच्यासमोर घोडीवर हात सोडून घोडेस्वारी करतात.

बीबीसी मराठीने मधुनाना यांच्याकडून त्यांचा प्रवास जाणून घेतला. घोडेस्वारीची सुरुवात कशी झाली, याबद्दल सांगताना मधुनाना म्हणाले, "आमचे दरगुडे मामा यांच्या पाचसहा पिढ्या बैलगाडा शर्यतीमध्ये उतरत होत्या. मामाकडे गेल्यावर घोड्यावर एक मजा म्हणून बसायचो. जवळपास फेरफटका मारायचो. नंतर मग एक घोडी घेतली. ती फास्ट पळायला लागली. त्यानंतर घोडेस्वारी आवडू लागली. आता गेली 50 वर्षे झालं घोडेस्वारी करतोय. जसजसा सराव चांगला झाला तसं घोडीवर बसल्यावर हात देखील सोडायला लागलो."

आजोबा

वयाच्या 20-25 वर्षापासून मधुनाना घोडेस्वारी करतायेत. गेल्या 30 वर्षांपासून ते बैलगाडा शर्यतीत भाग घेतायेत. त्यांच्या घोडीवर त्यांचं नितांत प्रेम आहे. ती आपल्याला पाडणार नाही, याचा त्यांना विश्वास आहे. तिची ते पोटच्या मुलीसारखी काळजी घेतात. तिच्यावर बसल्यावर अजिबात भीती वाटत नाही, असं ते विश्वासानं सांगतात. ते त्यांच्या घोडीला 'शहाणी घोडी' म्हणतात.

त्यांच्या घोडीबद्दल सांगताना ते म्हणतात, "गेल्या 30 वर्षांपासून हात सोडतो, पण काय वाटत नाही. घोडीवर बसलो की हात जागेवरु सोडणार. घोडी कलायची नाही. डोळे झाकून मी घोडीवर विश्वास ठेवतो. लोक दुसऱ्या घोडीवर बसा म्हणतात, पण मी नाही बसत. मी माझ्यात घोडीवर बसतो. घोडीवर बसलो की असं वाटतं मी बारा वर्षाचाच आहे. इतका आनंद होतो."

बैलगाडा शर्यंत बंद झाल्याने मधुनाना निराश झाले होते. कधी ना कधी ही शर्यत पुन्हा सुरु होईल, या आशेने ते तालीम सुरु ठेवत होते. रात्रीच्या वेळी बैलांना घेऊन घाटात जाऊन ते तालीम करायचे. पोलिसांच्या कारवाईला देखील त्यांना सामोरं जावं लागलं, तरी त्यांनी तालीम सोडली नाही.

आजोबा

परंतु, आता पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु झाल्याने ते खुश झालेत. एखाद्या तरुण मुलासारंख वाटत असल्याचं ते सांगतात. या वयात घोडेस्वारी करत असल्याने पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना देखील आनंद होतो.

मधुनाना दिवसभर शेतातली कामं आणि बैल सांभाळण्याचं काम करतात. या वयात सुद्धा आपण इतके तंदुरस्त आहोत, ही देवाचीच कृपा असल्याचं त्यांना वाटतं.

त्यांचा व्हीडिओ व्हायरल झाल्यापासून त्यांचं सगळीकडून कौतुक होतंय. लांबून लांबून लोक येऊन त्यांचा सत्कार करतायेत. शर्यतीच्या ठिकाणी देखील आवर्जुन त्यांचा उल्लेख करुन त्यांना सन्मानित करण्यात येतंय. हे सगळं पाहून मधुनाना भारावून गेलेत.

मधुनाना म्हणतात, "लोकांनी लय कौतुक केलं. नाराळांनी पोतं भरली आहेत. हार आणून सत्कार करतात. घोडीमुळे हा सत्कार मिळतोय, नाहीतर कोपऱ्यात पडून राहिलो असतो. आधी कधी एवढं कौतुक झालं नाही. लांबून लोकं येऊन त्यांचा सत्कार करतात.''

शर्यत

या वयात काही दुखापत होऊ नये म्हणून नानांच्या घरचे त्यांना घोडेस्वारी करण्यापासून रोखतात. परंतु, त्यांना न जुमानता नाना घोडेस्वारी करतातच.

"मला नाद आहे घोडीचा, मी करणारच. मी घरच्यांचं ऐकत नाही. जेव्हा नको वाटेल, तेव्हा हे बंद करीन. तोपर्यंत हे करत राहणार. आता शर्यत सुरु झाली तर तरुण झाल्यासारखं वाटतंय. प्रत्येक घाटात जावं असं वाटतंय," असं ते सांगतात.

घाटात घोडीवर बसल्यावर इतका आनंद होतो की, ते हात सोडून टाळ्या वाजवतात. आपल्या पश्चात आपल्या नातवंडांनी ही परंपरा पुढे चालवावी, असं देखील त्यांना वाटतं.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)