NSE : मुंबईतलं स्टॉक एक्सचेंज चालवायचा हिमालयातला बाबा, MD होत्या त्याच्या हातचं 'बाहुलं'

भारताच्या सगळ्यात मोठ्या स्टॉक एक्सचेंजच्या मुख्याधिकारी सगळे महत्त्वाचे निर्णय एका बाबाच्या सांगण्यावरून घ्यायच्या. यासाठी त्या गोपनीय माहितीही या बाबाला द्यायच्या असं सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने म्हटलं आहे.

मुंबईत असणाऱ्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) मुख्याधिकारी चित्रा रामकृष्णन हिमालयात राहाणाऱ्या या आध्यात्मिक बाबाचा सल्ला घ्यायच्या.

त्यांनी कथितरित्या संचालक मंडळाच्या बैठकांचे ठराव, बिझनेस प्लॅन, आर्थिक वाढीचा दर अशा गोष्टी या बाबाला सांगितल्याचं म्हटलं जातंय. या बाबाचं नाव समोर आलेलं नाही.

चित्रा रामकृष्णन यांनी 2016 साली NSE सोडलं.

सेबीने म्हटलंय की त्यांनी गोळा केलेल्या कागदपत्रांवरून हे 'स्पष्ट दिसतंय' तो बाबाच NSE चालवत होता. चित्रा रामकृष्णन फक्त त्याच्या 'हातातली एक बाहुली होत्या' आणि आपल्या कार्यकाळ संपेपर्यंत त्याच्या म्हणण्यानुसार काम करत राहिल्या.

"NSE चे आर्थिक आणि व्यावसायिक आराखडे इतरांना दाखवणं ही घोडचूक आहे. यामुळे या स्टॉक एक्सचेंजचा पायाच हादरू शकतो," त्यांनी म्हटलं.

सेबीने चित्रा रामकृष्णन यांना 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे तसंच पुढची तीन वर्ष त्यांना कोणत्याही स्टॉक एक्सचेंजमध्ये किंवा फर्ममध्ये काम करण्यास बंदी घातली आहे.

सेबीने हिमालयातल्या बाबाचा जो इमेल अड्रेस दिला होता त्यावर बीबीसीने मेल केला पण त्यावर उत्तर आलेलं नाही.

या बाबाबद्ल आणखी कोणतीही माहिती सेबीने दिली नाहीये. इतकंच सांगितलं की हा बाबा हिमालयात राहत असावा.

सेबीला दिलेल्या माहितीत रामकृष्णन यांनी म्हटलंय की त्या या बाबाला दोन दशकांपूर्वी गंगेच्या किनाऱ्यावर भेटल्या. त्या म्हणतात की अनेक 'वैयक्तिक आणि व्यावसायिक' बाबींवर त्यांनी या बाबाचा सल्ला घेतला.

"अनेक मोठ्या व्यक्ती आध्यात्मिक गुरू, मार्गदर्शक, कोच किंवा आपल्या क्षेत्रातल्या जेष्ठांचा सल्ला घेत असतात. तसंच मलाही वाटलं की मला या मार्गदर्शनामुळे मी माझं काम चांगल्या पद्धतीने करू शकेन," चित्रा रामकृष्णन म्हणाल्या.

सेबीने म्हटलंय की रामकृष्णन यांच्या कृत्यामुळे मार्केटचं नुकसान झालं नसलं तरी हे वागणं 'विचित्र' आहे. त्याच्या अशा कृत्यामुळे 'नियमांची प्रचंड मोठी पायमल्ली' झाली आहे.

NSE मध्ये आधी काही चौकशी सुरू असताना चित्रा रामकृष्णन आणि या बाबात झालेली इमेलची देवाण घेवाण समोर आली असं सेबीने म्हटलं.

चित्रा रामकृष्णन यांनी 90 च्या दशकात NSE मध्ये काम सुरू केलं आणि 2016 साली वैयक्तिक कारणास्तव त्यांनी हे काम सोडत असल्याचं म्हटलं.

इंडिया बिझनेस प्रतिनिधी निखिल इनामदार यांचं विश्लेषण

या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना सोशल मीडिया युझर्सनी अतर्क्य आणि अशक्य अशी विशेषणं वापरली आहेत. देशातल्या सगळ्यात मोठ्या स्टॉक एक्सचेंजचे महत्त्वाचे आर्थिक आणि व्यावसायिक निर्णय हिमालयातल्या एका 'आध्यात्मिक' बाबाच्या सांगण्यावरून होत होते ही गोष्टच विश्वास ठेवण्यापलीकडची आहे असं अनेकांनी म्हटलंय.

काहींनी तर या सगळ्या प्रकारावर एक थरारक वेबसीरिज होऊ शकते असंही म्हटलं.

तर तज्ज्ञांचं म्हणणं आहे की सेबीच्या तपासणीत जे निष्कर्ष समोर आलेत त्यावरून स्पष्ट दिसतंय की NSE मध्ये किती ढिसाळ कारभार चालतो आणि नियमांची पायमल्ली होते. स्टॉक एक्सचेंजमध्ये ज्या कंपन्या लिस्टेड असतात त्यांच्याबाबतीत मात्र अत्यंत कठोर नियम लागू केले जातात.

"हे एक जागतिक स्तरावरचं स्कॅण्डल आहे," भारतातल्या नामांकित शोधपत्रकार आणि ज्यांच्या लिखाणामुळे सेबीला अनेक नियम बनवावे लागले अशा सुचेता दलाल म्हणतात.

या प्रकरणाची जी चौकशी होतेय ती 'खोटी' असल्याचंही त्या म्हणाल्या. चित्रा रामकृष्णन यांना अटक करून या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी असं दलाल यांना वाटतं.

"सध्या त्यांना फक्त डोळे वटारून सोडून दिलंय."

ही चौकशा आताच का होतेय हाही प्रश्न त्यांनी विचारला. NSE च्या जितक्या चौकशा चालू असतील त्या बंद करायचा हेतू आहे म्हणजे पब्लिक ऑफरिंगच्या वेळी काही त्रास होणार नाही याकडे दलाल लक्ष वेधतात.

पण हा वाद इतक्या लवकर संपेल अशी शक्यता दिसत नाही. हा हिमालयातला बाबा नक्की कोणी आहे या भोवती आता सारे तर्कवितर्क फिरतील.

अमित टंडन आर्थिक कंपन्यांना सल्ला देणारी संस्था IIAS चे संस्थापक आहेत. ते म्हणतात की या प्रकरणावरून आता सिद्ध होतंय की स्टॉक एक्सचेंज संबधित बेकायदेशीर घटना समोर आणण्यासाठी एका सक्षम यंत्रणेची गरज आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)