कर्नाटक हिजाब वाद : शाळेत गणवेशाव्यतिरिक्त कोणताही पोशाख नसावा- आदित्य ठाकरे #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Twiiter / AUThackeray
विविध वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. शाळेत गणवेशाव्यतिरिक्त कोणताही पोशाख नसावा - आदित्य ठाकरे
कर्नाटकमध्ये कॉलेजमध्ये हिजाब घालण्याचा वाद सध्या तापलाय. यावरून तिथली शाळा - कॉलेजेस 3 दिवसांसाठी - 12 फेब्रुवारीपर्यंत बंदीही ठेवण्यात आली होती.
शाळेमध्ये शाळांच्या गणवेशाव्यतिरिक्त कोणताही पोशाख नसावा असं शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.
आदित्य ठाकरे म्हणाले, "जर शाळेमध्ये गणवेश बंधनकारक असेल तर त्या ठिकाणी इतर कोणत्याही पोशाखाला जागा नसावी. त्या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाने सांगितलेला गणवेश बंधनकारक असावा. शाळा अथवा महाविद्यालयं ही शिक्षणाची केंद्रं आहेत. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त शिक्षणालाच स्थान आहे."
ABP माझाने ही बातमी दिली आहे.
2. काँग्रेसमुक्त भारताची सुरुवात गोव्यापासून, गोव्यात भाजपचं सरकार येणार - नरेंद्र मोदी
भाजपने गोव्यामध्ये जी कामं केली ती इतर कोणीही केली नाहीत, त्यामुळे गोवयात भाजपचंच सरकार येणार असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. 10 फेब्रुवारीला त्यांनी गोव्यात प्रचारसभा घेतली.

फोटो स्रोत, ANI
ज्यांना गोव्याची संस्कृती माहिती नाही त्यांनी गोव्याला लुटलं, काँग्रेसमुक्त भारताची सुरुवात गोव्यापासूनच झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.
गोव्यातल्या प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचीही आठवण काढली.
TV9 मराठीने ही बातमी दिली आहे.
3. लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कात नको, वाद थांबवा - पं. हृदयनाथ मंगेशकर
भारतरत्न लता मंगेशकरांचं स्मारक शिवाजी पार्कात व्हावे, अशी आपली इच्छा नसल्याचं सांगत पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी हा वाद थांबवण्याचं आवाहन केलंय.

फोटो स्रोत, Niyogi Books
स्मारक शिवाजी पार्कमध्ये जिथे लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले, तिथेच त्यांचं स्मारक उभारण्यात यावं, अशी मागणी भाजप नेते राम कदम यांनी लताबाईंच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी केली होती आणि त्यावरून वादाला सुरुवात झाली.
याविषयी मंगेशकर कुटुंबीयांनी पहिल्यांदाच मत मांडलंय.
महाराष्ट्र सरकारने 'लता मंगेशकर संगीत विद्यालय' स्थापन करण्याचं आश्वासन दिलं होतं, लतादीदींनीच ती विनंती केली होती आणि आता मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केल्याचं पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी म्हटल्याचं महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या बातमीत म्हटलंय.
4. मोदी सरकारने महागाई काबूत ठेवली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन
कोव्हिडची साथ असूनही नरेंद्र मोदी सरकारने भारतातली महागाई काबूत ठेवली, UPA सरकारच्या काळात तर महागाईच्या दराने दोन आकडी दर गाठला होता, अशी टीका अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलीय.
युपीए सरकारच्या काळात जागतिक अर्थसंकट असताना भारतीय अर्थव्यवस्थेला जगातील 5 कमकुवत अर्थव्यवस्थांपैकी एक म्हटलं गेलं होतं, या काळात चलनवाढीचा दर दोन आकडे झाला होता असं सीतारामन यांनी म्हटलंय.
जागतिक मंदीच्या काळातल्या घसरणीपेक्षा कोव्हिडच्या साथीदरम्यान 2020-21मध्ये झालेली अर्थव्यवस्थेची घसरण मोठी होती पण तरीही मोदी सरकारने अर्थव्यवस्थेला त्यातून बाहेर काढल्याचं निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान म्हणाल्याचं लाईव्ह मिंटने दिलेल्या बातमीत म्हटलंय.
5. वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकार राणा अयुब यांच्यावर ईडीचे मनी लाँडरिंगचे आरोप, 1.77 कोटी जप्त
अंमलबजावणी संचालनायल म्हणजेची ईडीने 10 फेब्रुवारीला वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकार राणा अयुब यांच्यावर कारवाई केली. मनी लाँडरिंगच्या आरोपांखाली करण्यात आलेल्या या कारवाईत 1.77 कोटी जप्त करण्यात आल्याचं सकाळने दिलेल्या बातमीत म्हटलंय.

फोटो स्रोत, ANI
सामाजिक कामांसाठी देणगी म्हणून मिळालेल्या पैशांचा काही भाग राणा अयुब यांनी वैयक्तिक खर्चासाठी वापरल्याचा आरोप ईडीने केलाय.
उत्तर प्रदेश पोलिसांनी गेल्या सप्टेंबरमध्ये दाखल केलेल्या FIR च्या आधारे ईडीने राणा अयुब यांची चौकशी सुरू केली होती.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









