उत्तर प्रदेश निवडणुका : 2007 च्या आठवणी आणि सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग बसपाला मदत करेल?

मायावती

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, राघवेंद्र राव
    • Role, बीबीसी हिंदी

गेल्या वर्षी 9 ऑक्टोबरला बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी लखनऊमध्ये मोठ सभा आयोजित केली होती.

या सभेत बोलताना बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी म्हटलं की उत्तर प्रदेशची जनता समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष दोघांवर नाराज आहे. त्यांना बसपच्या सरकारची आठवण येतेय.

मायावतींनी असाही दावा केला की जनतेला आता सत्ता परिवर्तन हवं आहे त्यामुळे यंदा त्यांच्याच पक्षाचं सरकार येणार.

या सभेनंतर अनेक आठवडे मायावती कोणत्याही मोठ्या निवडणूक प्रचारसभेत किंवा कार्यक्रमात दिसल्या नाहीत. त्यामुळे चर्चा व्हायला लागली की निवडणूक प्रचारातून त्या कुठे गायब आहेत.

राज नगर

फोटो स्रोत, Kashif Siddiqui

काही दिवसांपूर्वी जेव्हा बीबीसीची टीम लखनऊमध्ये बसपाच्या मुख्यालयात पोहचली तेव्हा तिथे शांतता होती. तीन चार कार्यकर्ते वगळता तिथे कोणी नव्हतं. पक्षाचं मुख्यालय पाहून हे एखाद्या राजकीय पक्षाचं कार्यालय आहे आणि हा पक्ष उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन करण्याचा दावा करतोय असं अजिबात वाटत नव्हतं.

पण बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रांचं म्हणणं होतं की जमिनीवर त्यांच्या पक्षाच्या प्रचार त्यांच्या विरोधकांच्या तुलनेत खूप पुढे आहे.

याच दाव्याची पडताळी करायला आम्ही आग्र्याच्या राजनगर भागात गेलो.

आग्र्यात खूप मोठ्या प्रमाणावर दलित राहातात आणि म्हणूनच याला भारताची दलित राजधानीही म्हटलं जातं. राजनगर चर्म उद्योगाचं केंद्र आहे आणि इथे जाटव समाजाचं प्राबल्य आहे.

जाटव समाजाला बसपची व्होट बँक म्हणूनही पाहिलं जातं. इथल्या लोकांशी आम्ही बोललो.

गुरुदेव गौतम

फोटो स्रोत, Kashif Siddiqui

फोटो कॅप्शन, गुरुदेव गौतम

गुरुदेव गौतम यांचा बूट बनवण्याचा व्यवसाय आहे. त्यांचं म्हणणं आहे की कोव्हिड साथीच्या काळात त्यांच्या व्यवसायावर फार वाईट परिणाम झाला. उत्तर प्रदेश सरकारने त्या लोकांना मदत करण्यासाठी काही केलं नाही.

त्यांनी म्हटलं, "लॉकडाऊन लागल्यानंतर आमची अवस्था फारच वाईट झाली. आम्ही रोज 100-150 बुटांचे जोड बनवायचो, आज 50 ही बनत नाहीत. जेवायचे वांधे झालेत. मजूर नोकऱ्या सोडून गेले. आमच्याकडे पैसेच नाहीयेत. सरकार आम्हाला पैसे देत नाही, व्यवसायासाठी कर्ज मिळत नाही, तिथेही दलाल बसलेत."

गुरुदेव गौतम यांना आता मायावतींचं सरकार येईल अशी आशा आहे. ते म्हणतात, "2007 साली बहनजी जिंकल्या आणि बसपचं सरकार बनलं. त्यांनी फक्त बूट उद्योग नाही तर सगळ्यांसाठी चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी भेदभाव केला नाही. त्यांचे विचार सगळ्यांसाठी सारखेच होते."

असं मानणारे गुरुदेव गौतम एकटेच नाहीयेत. राजगनगरमध्ये आम्ही अशा अनेक लोकांना भेटलो जे 2007 साली सत्तेत आलेल्या बसप सरकारची तुलना 2012 साली बनलेल्या समाजवादी पक्ष आणि 2017 साली बनलेल्या भाजप सरकारशी करताना दिसतात.

राजनगरमध्ये राहाणाऱ्या महिलांचं म्हणणं होतं की गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये असुरक्षिततेतची भावना वाढली आहे आणि फक्त मायावती या समस्येवर तोडगा काढू शकतात.

गीता देवी

फोटो स्रोत, Kashif Siddiqui

फोटो कॅप्शन, गीता देवी

राजनगरमध्ये राहाणाऱ्या गीती देवींनी महागाई, बेरोजगारी आणि महिला सुरक्षा हे मुद्दे मांडले.

त्या म्हणतात, "बहनजींच्या सत्ता काळात इतकी सुरक्षितता होती की रात-बेरात्री कुठेही जात होतो. काही त्रास नव्हता. आता सहा वाजले तर वाटतं की कुठून गुंड तर येणार नाहीत ना. मनात कायम भीती असते. आमची इच्छा आहे की बहनजींचं सरकार यावं."

बसपचे कार्यकर्ते अनिल सोनी यांचं म्हणणं आहे की पक्षाला पाठिंबा देणाऱ्या लोकांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला आहे.

ते म्हणतात, "आम्ही पायी पायी चालून मतदारांच्या घरी गेलो. फक्त एका नाही सगळ्या जातींच्या मतदारांपर्यंत पोहचलो. ब्राह्मण ते वाल्मिकी प्रत्येक समाजाच्या घरात आमचे उमेदवार गेले. उमेदवारांची घोषणा बहनजी मायावतींनी चार महिने आधीच केली होती. आमचा गृहपाठ पक्का आहे. आता फक्त परिक्षांची तयारी करायची आहे आणि आम्ही तयार आहोत."

अनिल सोनी म्हणतात की कोव्हिड साथीच्या काळात लोकांना जो त्रास झाला त्याचा परिणाम या निवडणुकांमध्ये दिसेल.

ते म्हणतात, "जो माणूस एक हजार किलोमीटर पायी चालला तो आपल्या पायाला झालेल्या जखमा विसरून जाईल का? लोकांना ऑक्सिजन सिलिंडर मिळाले नाहीत, औषधं मिळाली नाहीत, रेशनचं धान्य मिळालं नाही, रोजगार मिळाला नाही. हे सगळं लोक विसरून जातील का? नाही विसरणार. आपलं दुःख नाही विसरता येत माणसाला."

ब्राह्मण मतांवर नजर

निमुळत्या गल्ल्यांच्या या भागात प्राथमिक सुविधांची वानवा आहे. पण राजनगरसारखे अनेक भाग बसपचा गड समजला जातात.

इथले अनेक लोक आजही म्हणतात की ते बसपसाठीच मतदान करतील. पण पक्षाची नजर ब्राह्मण मतांवरही आहे.

बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ता अनिल सोनी

फोटो स्रोत, Kashif Siddiqui

फोटो कॅप्शन, बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ता अनिल सोनी

त्यांना वाटतं की ब्राह्मण मतदारांनी त्यांची साथ दिली तर 2007 सारखंच त्यांचं सरकार पुन्हा येईल.

बहुजन समाज पक्षाचा आरोप आहे की गेल्या दोन सरकारांच्या काळात ब्राह्मणांकडे दुर्लक्ष झालं आणि त्यांच्यावर अत्याचार झाले. यामुळेच ब्राह्मण बसपची साथ देतील.

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा म्हणतात, "योगी सरकारच्या 'थांबवा आणि मारा' या धोरणाअंतर्गत 500 हून अधिक ब्राम्हणांची हत्या झाली आहे आणि 100 हून जास्त ब्राह्मणांचं एनकाउंटर झालं आहे. ब्राह्मण समाजाला हे दिसतंय. तुम्ही असं म्हणू शकत नाही की त्यांनी डोळे आणि कान बंद करून घ्यावेत."

"ब्राह्मण समाज विचार करतो. तो पाहतोय की एकीकडे बसपचं राज्य होतं आणि त्याआधी ब्राह्मणांची कशी दशा होती. बसपने त्यांना पुढे नेलं. दुसरीकडे त्यांना हे दिसतंय की समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात काय झालं. ज्या भारतीय जनता पक्षाकडून त्यांना अपेक्षा होती त्यांनी तर ब्राह्मणांना झटकून टाकलं."

बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा
फोटो कॅप्शन, बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा

2007 सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात बसपने एकूण 403 जागांपैकी 206 जागा जिंकून पूर्ण बहुमताने सरकार बनवलं होतं. या विजयाचं एक मोठं कारण म्हणजे पक्षाचं सोशल इंजिनिअरिंग ज्यामुळे ते ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरले.

बसपला ब्राह्मण मतदारांचं समर्थन मिळेल का?

प्राध्यापक अपूर्वानंद दिल्ली विद्यापीठाच्या हिंदी विभागात काम करतात. ते प्रसिद्ध विश्लेषक आणि स्तंभलेखक आहेत. त्यांच्या मते 2007 च्या विजयाची पुनरावृत्ती करणं बसपसाठी अवघड ठरेल.

ते म्हणतात, "ब्राह्मणांकडे वर्णवादी दृष्टीकोनातून पाहिलं तर भारतीय जनता पक्षाच्या रूपात त्यांना विचारधारेशी जुळणारा पक्ष मिळाला आहे. या पक्षाची कास ते सहजासहजी सोडणार नाहीत."

अपूर्वानंद यांच्यामते, "योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यामुळे राजपूत आणि बाह्मणांमध्ये दरी आलीये. यामुळे कदाचित ब्राह्मण आपली निष्ठा बदलू शकतात. पण त्यांनी आपला पक्ष बदलला तरी ते अशा पक्षाच्या जवळ जातील जिथे त्यांना सत्तेत वाटा मिळेल आणि वाटाघाटी करताना त्यांचा वरचष्मा राहील."

प्रा.अपूर्वानंद

फोटो स्रोत, Twitter/Apoorvanand

फोटो कॅप्शन, प्रा.अपूर्वानंद

"आता बहुजन समाज पक्षाला ज्यांचा जातींचा पाठिंबा आहे त्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या जातीच्या लोकांना हा भरवसा नाहीये की सत्तेत त्यांना वाटा मिळेल. त्यामुळेच 2007 च्या समीकरणाची पुनरावृत्ती होऊ शकणार नाही."

अपूर्वानंद पुढे म्हणतात, "2007 ते 2022 या काळात बरंच काही बदललं आहे. ब्राह्मण काय विचार करतात? हिंदुत्वाच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण कुठे आहेत? हे प्रश्न आहेत.

बसपने आपल्या जुन्या फॉर्म्युल्यावर काम करायचं ठरवलं तरी ब्राह्मण आता पूर्वीसारखे राहिले नाहीयेत, ते बदललेत. कडव्या हिंदुत्वाच्या राजकारणाने उच्च जातींची विचारधारा कशी बदलली आहे याबद्द्ल आता आपल्याला काहीच माहिती नाहीये."

प्रबुद्ध संमेलनांचा परिणाम?

बहुजन समाज पक्षाने गेल्या काही महिन्यात ब्राह्मणांना आकर्षित करण्यासाठी राज्यात अनेक प्रबुद्ध संमेलनं केली. पण या संमेलनांनी पक्षाला निवडणुकीत फायदा होईल का?

प्रा अपूर्वानंद म्हणतात, "हे फक्त प्रतिकात्मक कार्यक्रम आहेत. उत्तर प्रदेशात ठाकूर-ब्राह्मण वादाची चर्चा होते, त्यामुळे प्रत्येक पक्ष तो मुद्दा उचलून धरतो. प्रत्येक पक्षाला वाटतं की त्यांनी ब्राह्मणांना आपल्या बाजूने वळवलं तर ते जिंकतील. मला असं वाटत नाही."

मतदार

फोटो स्रोत, Kashif Siddiqui

ते म्हणतात, मागासलेल्या आणि अति-मागासलेल्या जातींची काय समीकरणं बनतात यावरही निवडणुकांचे निकाल ठरतील.

प्रा रविकांत चंदन लखनऊ विद्यापीठात हिंदी विभागात काम करतात आणि दलित राजकारणातले तज्ज्ञ आहेत.

ते म्हणतात, "अयोध्येत बसपने जे प्रबुद्ध संमेलन केलं तिथे पहिल्यांदा असं झालं की बसपाच्या व्यासपीठावरून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे असं वाटलं की मायावतींनी आपल्या विचारधारेपासून फारकत घेतली आहे. पण तसं नाहीये. हा त्याच्या निवडणूक रणनितीचा भाग आहे. त्यांना असं वाटतं की योगी आदित्यनाथांच्या सरकारमध्ये ब्राह्मणांचा जो अपमान झाला आहे त्यामुळे ते बसपासोबत जाऊ शकतात."

'बसप दुबळा नाही'

प्राध्यापक रविकांत यांच्यामते समाजवादी पक्षाच्या इतिहासात यादव आणि मुस्लीम वरचढ होते. याच कारणामुळे ब्राह्मण समुदाय बसपसोबत जाऊ शकतो.

ते म्हणतात, "भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत फक्त दोन पक्षांची टक्कर आहे असं चित्र उभं केलं आहे. ते दाखवत आहेत की त्यांची लढाई फक्त समाजवादी पक्षाशी आहे. उच्च जातींपुढे कोणताही पर्याय राहायला नको या प्रयत्नात भाजप आहे. ब्राह्मण नाराज आहेत आणि ठाकुरही फारसे खूश नाहीत."

"योगी आदित्यनाथांच्या सरकारमध्ये ठाकुर प्रशासकांना जागा मिळाली यात काही वाद नाही. त्यांच्या माफियांना संरक्षण मिळालं हेही खरं आहे. पण सर्वसामान्य ठाकुरांच्या पारड्यात काही पडलं नाही. पण ज्या उच्च जाती भाजप सरकारवर नाराज आहेत त्या सपात जाऊ शकत नाहीत कारण त्यांना वाटतंय की यादवांची गुंडगिरी सुरू होईल किंवा मुसलमानांना संरक्षण मिळेल."

रविकांत यांच्यामते मायावती सध्या गप्प आहेत आणि हा त्यांच्या रणनितीचा भाग आहे कारण त्या उच्च जातींना कोणताही चुकीचा संदेश देऊ इच्छित नाहीत.

ते म्हणतात, "जसजशी निवडणुकीचा प्रचार तापतोय, बसपा मजबूत होताना दिसतेय. गेल्या काही आठवड्यात चित्र बदललं आहे. बसपला दुबळं समजलं जातेय पण ते दुबळे नाहीत. निवडणूक फक्त दोन पक्षात होतेय असं चित्र उभं राहिलं आणि बसप शक्तीशाली दिसली तर ब्राह्मण मतं बसपकडे जातील असा त्यांना आत्मविश्वास आहे. पण असं होईल की नाही यावर मला संशय आहे."

ते पुढे म्हणतात, "या निवडणुकीत सपाच्या विरोधात मतदारांचं ध्रुवीकरण करणं सोपं आहे. भाजपची इच्छा आहे की बसप निवडणुकीत कुठेही दिसायला नको. पण त्यांना कमी लेखून चालणार नाही."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)