उत्तर प्रदेश निवडणूक: शेकडो मृतदेहांचं दफन करण्यात आलं, त्या गंगा किनारी आता काय स्थिती?

गंगा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, गुरप्रीत सैनी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, प्रयागराज

"रात्रभर मी प्रेताशेजारी पडून होते. संध्याकाळी पाच वाजता ते मरण पावले होते, दुसऱ्या दिवशी सकाळी गावातले लोक त्यांना श्रुंगवेरपूर धामला घेऊन गेले आणि त्यांना दफन करण्यात आलं. खूप त्रास झाला. लाकडासाठी पैसेच नव्हते."

तीस वर्षाच्या रंजिता यांचे पती शिव मूरत यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि अखेरीस 25 एप्रिल 2021 रोजी ते मरण पावले.

कोरोनाची दुसरी लाट विक्राळ रूप धारण करत होती, तो हा काळ आहे. त्या वेळी गंगेच्या काळी दफन करण्यात आलेल्या मृतदेहांची छायाचित्रं उत्तर प्रदेशातील संकट किती गंभीर झालंय याची वार्ता देत होते.

प्रयागराजमधील श्रुंगवेरपूर धाम आणि फाफामऊ घाट इथली छायाचित्रं जगभरातील प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झाली.

त्या वेळची आठवण काढताना रंजिता उदास होतात. त्यांचा एक मुलगा नऊ वर्षांचा आहे, तर दुसरा नऊ वर्षांचा आहे. सध्या त्या मुलांसोबत माहेरी राहतात.

आपल्या नवऱ्याचं लेबर कार्ड घेऊन त्या अनेकदा सरकारी कचेऱ्यांची पायपीट करून आल्या आहेत, पण त्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई मिळालेली नाही.

तिसऱ्या लाटेसंदर्भातील भीती

त्या दिवसांची आठवण आली तर संतोषी यांनासुद्धा रडू कोसळतं. "आमचा छोटा मुलगा तिथे गेला होता. तो येऊन म्हणाला, "अम्मा, असा-असा खड्डा खोदला नि त्यात पापांना दफन केलं. आम्ही त्याला असं बोलू नकोस म्हणून सांगत राहिलो."

संतोषी यांचे पती सुभेदार पाल मुंबईत शिवणकाम करत असत. 2020 साली पहिल्यांदा टाळेबंदीची घोषणा झाली, तेव्हा ते उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथल्या मेंडारा या त्यांच्या गावी परतले.

रंजिता
फोटो कॅप्शन, रंजिता

चार मुलांना घेऊन ते कशीबशी उपजीविका करत होते, आणि एप्रिल महिन्यात सकाळी सुभेदार पाल यांनी शेवटचा श्वास घेतला.

त्यांच्या कुटुंबीय त्यांना जवळच्या एका रुग्णालयात घेऊन गेले, पण तिथल्या डॉक्टरांनी सुभेदार यांनी कोरोना झाल्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जायला सांगितलं.

त्यांचे कुटुंबीय सुभेदार पाल यांना घेऊन रुग्णालय शोधत राहिले आणि दरम्यानच्या काळात त्यांनी प्राण सोडला.

"त्यानंतर काही सरकारी माणसं आली होती, त्यांनी काही लिहून घेतलं, पण अजूनपर्यंत काहीच मदत मिळालेली नाही," असं संतोषी सांगतात.

जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज

सध्या नातेवाईकांकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीवर त्या मुलांचं नि स्वतःचं पोट कसंबसं भरत आहेत. त्यांचा मोठा मुलगा 16 वर्षांचा आहे. त्याने आता शिक्षण सोडलं असून तो शिवणकाम शिकतो आहे. मुंबईला जाऊन वडिलांच्या जागी काम करून घर चालवण्याची जबाबदारी आता त्याच्यावर आहे.

पण कोरोनामुळे रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याचं ऐकल्यावर संतोषी घाबरल्या आहेत. त्यांना आपल्या कुटुंबाचा आणखी एक सदस्य गमवायचा नाही.

अशीच भीती सावित्री देवी यांच्याही मनात आहे. त्यांच्या दोन मुली व चार मुलगे आहेत. दुसऱ्या लाटेवेळी त्यांचे पती तुलसीराम यांचं निधन झालं, तेव्हा कुटुंबियांनी गावापासून काही किलोमीटरांवर असणाऱ्या श्रुंगवेरपूर धाम इथेच त्यांचा मृतदेह दफन केला.

उत्तर प्रदेश निवडणूक

सध्या त्या रोजगार हमी योजनेत मजुरी करून गुजराण करत आहेत. सरकारच्या वतीने कोव्हिडमध्ये मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई दिली जाते.

या संदर्भात 50 हजारांचा सहाय्य निधी मिळावा याकरता सावित्री देवी यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे, पण 'इतर कुटुंबांप्रमाणे आपल्यालाही मदत मिळालेली नाही,' असं त्या म्हणतात.

तिसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली भीती त्यांच्या डोळ्यांमध्ये बघायला मिळते. उत्तर प्रदेश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेकदा केला आहे.

दुसऱ्या लाटेवेळी भारतामध्ये कोव्हिडची सर्वाधिक यशस्वी हाताळणी उत्तर प्रदेशाने केली, असाही दावा त्यांनी पूर्वीच केला आहे.

तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी सज्ज?

उत्तर प्रदेश आरोग्य विभागाचे महासंचालक डॉक्टर वेदव्रत सिंग बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "गेल्या वेळची परिस्थिती बघता या वेळी ग्रामीण भागांसाठी नव्या स्वरूपाची व्यवस्था स्वीकारण्यात आली आहे."

ते म्हणाले, "ग्रामीण भागांमध्ये आम्ही नवीन व्यवस्था उभारली आहे. आरोग्य केंद्रांना आम्ही रॅपिड अँटिजेन चाचणीचं किट पुरवतो आहोत, जेणेकरून गावातच चाचणी होईल. तसंच देखरेख समित्यांकडे आम्ही प्राथमिक औषधं देऊन ठेवली आहेत, त्यामुळे लक्षणं दिसणारा कोणी रुग्ण सापडला तर त्याला लगेचच औषधं देता येतील."

"प्रयागराजधील मेंडारा गावाची लोकसंख्या सुमारे सहा हजार आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान इथे 57 जण मृत्युमुखी पडले," असा गावकऱ्यांचा दावा हे. परंतु सरकारी कागदपत्रांमध्ये येतील एकाही मृत्यूची नोंद नाही.

डॉ वेद ब्रत सिंह
फोटो कॅप्शन, डॉ वेद ब्रत सिंह

कोरोनाची दुसरी लाट शिखरावर गेली असताना उत्तर प्रदेशात एप्रिल 2021 दरम्यान 3438 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आणि मे 2021 मध्ये 8108 मृत्यूंची नोंद झाली.

परंतु, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्षातील मृतांची आकडेवारी याहून बरीच जास्त असावी.

रोगप्रतिकारक सज्जतेची स्थिती

आम्ही मेंडारा गावातील आरोग्य केंद्रात गेलो, तेव्हा तिथे उपस्थित एएनएम सुधा द्विवेदी यांनी सांगितलं की "तिसऱ्या लाटेसंदर्भात अजून त्यांना कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत."

द्विवेदी बीबीसीला म्हणाल्या, "सध्या लशीची केवळ पहिली नि दुसरा डोस दिला जात आहे. नवीन विषाणूंसंदर्भात अजून आपल्या लोकांचं प्रशिक्षण झालेलं नाही. देखरेख समितीला सामुदायिक आरोग्य केंद्राकडून औषधं मिळत आहेत, पण त्यांची विभागणी होते, आणि सध्या काही औषध आलेलं नाही."

देखरेख समितीमध्ये सरपंच, सीएचओ, एएनएम व गावातील 'आशा' कार्यकर्त्या यांचा समावेश असतो.

सुधा द्विवेदी

या गावाचं सामुदायिक आरोग्य केंद्र आठ किलोमीटर दूर कौडिहार भागात आहे. तिथे एकूण तीस पलंग आहेत, त्यातील 20 पलंग कोव्हिडच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

देखरेख समिती

इथल्या निदान विभागाचे अधीक्षक डॉक्टर दीपक तिवारी बीबीसीला म्हणाले की, ऑक्सिजन सिलेंडर व कॉन्सट्रेटर हे ऑक्सिजनचे स्त्रोत सुरू राहायला हवेत, असे आदेश त्यांना मिळाले आहेत.

रुग्णालयाकडे 11 कॉन्सन्ट्रेटर आहेत, ते सर्व कार्यरत आहेत. त्याच सोबत पाच ऑक्सिजन सिलेंडर आहेत. कॉन्सन्ट्रेटर मिळाल्यामुळे तिसऱ्या लाटेला रुग्णालय सहजपणे सामोरं जाऊ शकेल, असं डॉक्टर तिवारी यांना वाटतं.

उत्तर प्रदेश निवडणूक

सामुदायिक आरोग्य केंद्र पंचक्रोशीतील 76 ग्रामसभांना सेवा पुरवतं. इतक्या ग्रामसभांना सेवा पुरवण्यासाठी 11 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, पाच सिलेंडर, 20 पलंग, दोन रुग्णवाहिका पुरेशा आहेत का, असं आम्ही डॉक्टर तिवारींना विचारलं.

त्यावर ते म्हणाले, "हे आव्हानात्मक असेल. पण सर्व रुग्ण इथे येत नाहीत. आम्ही बहुतांश रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवतो. देखरेख समितीकडून एखाद्या रुग्णाची माहिती मिळाली की, आमची रॅपिट रिस्पॉन्स टीम उपकरणं घेऊन तिथे जाते. त्यानुसार मग चाचणी करून औषधं दिली जातात."

उत्तर प्रदेश सरकारची नाचक्की

जिल्हा दंडाधिकारी खत्री सांगतात की, संपूर्ण प्रयागराजमध्ये कोव्हिडच्या लाटेला सामोरं जाण्यासाठी साडेपाच हजार पलंग तयार ठेवण्यात आले आहेत आणि सरकारी जागांवर नऊ ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.

ग्रामीण भागांमधील रुग्णालयातल्या सेवासुविधा वाढवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

शिक्षक असणाले विनयकुमार पटेल सांगतात की, गंगेच्या काठावरसुद्धा सरकारने काही तयारी करून ठेवायला हवी. थंडीमुळे अचानक मृत्युमुखी पडलेल्या एका शेजाऱ्याच्या मृतदेहाचं दफन करण्यासाठी ते काही गावकऱ्यांसोबत फाफामऊ घाटावर गेले होते.

वास्तविक अचानक मृत्यू झाला किंवा सर्पदंशाने वा त्वचेच्या आजाराने कोणी मरण पावलं, तर त्यांना गंगेच्या किनारी दफन करण्याची परंपरा कित्येक वर्षांपासून सुरू आहे.

परंतु दुसऱ्या लाटेवेळी उत्तर प्रदेश सरकारची नाचक्की झाल्यामुळे नदीकाठी मृतदेहांचं दफन करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले.

श्रुंगवेरपूर धाम इथे तर हा प्रतिबंध अजूनही लागू आहे, परंतु फाफामऊ घाट इथे मात्र कोरोनाचा भर ओसरल्यावर दफनविधीसाठी मृतदेह येऊ लागले.

दुसऱ्या लाटेवेळी विनयकुमार यांचे मोठे काका राधेश्याम यांचं कोरोनामुळे निधन झालं. त्यांचा मृतदेह दफन फाफामऊ घाटावरच दफन करण्यात आला.

ते सांगतात की, "सर्वसाधारणतः दीड हजार ते दोन हजार रुपयांना मिळणारी लाकडं त्या वेळी काळ्या बाजारात तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांना विकली जात होती. या संदर्भात काळ्या बाजारातील व्यवहार होऊ नये यासाठी सरकारने तजवीज करावी," अशी विनयकुमार यांची इच्छा आहे.

सर्वसाधारणपणे इथे दिवसाकाठी पंचवीस ते तीस मृतदेह येतात, दुसऱ्या लाटेवेळी परिस्थिती इतकी बिघडली होती की रोज 125 ते 130 मृतदेह येत असत, असं फाफामऊ घाटावर भेटलेल्या एका पंडितजींनी सांगितलं. त्यांच्या मते दफन करणाऱ्यांची संख्या 30 ते 35 होती.

गंगा नदीमधील पाणी वाढलं, तेव्हा काही मृतदेह वाहून गेले, तर काही रेतीखाली आणखी गाडले गेले.

उत्तर प्रदेश निवडणूक

अलीकडेच 'गंगा: रिइमॅजिनिंग, रिजुविनेटिंग, रिकनेक्टिंग' या पुस्तकात राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे माजी महासंचालक राजीव रंजन यांनी या संदर्भात लिहिलं आहे. रंजन यांची सेवा 31 डिसेंबरला समाप्त झाली. दुसऱ्या लाटेवेळी गंगेच्या प्रदेशात कोणते भयावह परिणाम दिसून आले, हे त्यांनी सदर पुस्तकात नोंदवलं आहे.

नदी वाचवण्यासाठी गेली पाच वर्षं जे काही काम झालं ते आता नष्ट केलं जातं आहे, असं इंडियन एक्सप्रेसच्या वृत्ताचा दाखला देऊन रंजन लिहितात.

कोरोना साथीदरम्यान मृतांची संख्या अनेक पटींनी वाढली, तेव्हा स्मशानभूमींवर गर्दी व्हायला लागली, अशा वेळी गंगेच्या काठावरून मृतदेह नदीत फेकून देणं हा सोपा पर्याय झाला.

जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार गंगा नदीमध्ये सुमारे 300 मृतदेह फेकण्यात आले, त्यामुळे एक हजारांहून अधिक प्रेतं अशी फेकण्यात आली हे वृत्तपत्रांमधील उल्लेख चुकीचे आहेत, असंही ते लिहितात.

केवळ मृतदेह फेकल्याने नव्हे तर इतरही काही कारणांमुळे गंगा नदी तेव्हापासून प्रदूषित होते आहे, असं फाफामऊ घाटावर भेटलेल्या एका पंडितांनी सांगितलं.

ते म्हणतात, "कोरोना किटपासून ते कपडालत्ता, अंत्यसंस्कारांची सामग्री सर्व ठिकाणी पसरलेली असायची. आम्ही काठीने ते उचलून फेकून द्यायचो. धडपणे स्वच्छताही राखता येत नव्हती."

गंगेच्या काठावरील एका गावात राहणारे किशोरीलाल दुवा यांना ते गेल्या वर्षीसारखे दिवस परत येऊ नयेत असं वाटतं.

गेल्या वेळच्या पंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील परिस्थिती बिकट झाली.

उत्तर प्रदेश निवडणूक

फोटो स्रोत, Getty Images

दुवा म्हणतात, "या वेळी काय होईल, कसं होईल, याची चिंता सर्वांनाच वाटते आहे. त्यामुळे शक्यतो सर्व जण लस घेत आहेत."

या वेळी सरकार अधिक सज्ज राहील, अशी आशा ते नोंदवतात.

सध्या सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी आपण सज्ज असल्याचा दावा केला आहे. परंतु, हळूहळू कोरोनाशी संबंधित रुग्णसंख्या वाढायला लागल्यावर आणि राज्यातील निवडणुका जवळ आलेल्या असताना, उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागांत राहणाऱ्या लोकांसमोरच्या चिंता आणखी वाढत चालल्या आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)