नितेश राणेंना संतोष परब हल्ल्याप्रकरणी 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

नितेश राणे, नीलम राणे

फोटो स्रोत, Facebook

संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नितेश राणे आज (2 फेब्रुवारी) न्यायालयासमोर शरण आले होते.

न्यायालयाने दिलेल्या निकालाचा मी आदर करतो. सरेंडर करण्यासाठी मी न्यायालयासमोर जातोय, असं म्हणत भाजपा नेते नितेश राणे कणकवलीच्या दिवाणी न्यायालयात हजर झाले होते.

दरम्यान, शरणागती पत्करण्यासाठी जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी या सरकारने मला बेकायदेशीरपणे अटक करण्याचे प्रयत्न केले होते. आता न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवत मी शरणागती पत्करत आहे, असं म्हटलं होतं.

त्यानंतर नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी दहा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर नितेश यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

यासंबंधी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलतना सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं की, नितेश यांना जी न्यायालयीन कोठडी सुनावली होती, ती युक्तीवादानंतर सुनावण्यात आली नव्हती. त्यांनी शरणागती पत्करल्यावर ते ताब्यात घेणं होतं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना कुठे ठेवायचं हा प्रश्न होता, त्यावेळी आम्ही युक्तिवाद केला आणि पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाला आमचा युक्तिवाद पटला.

जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता जामीन

संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता.

नितेश राणे

फोटो स्रोत, FACEBOOK/NITESH RANE

मंगळवारी सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन नाकारला होता आणि नितेश राणे यांना 10 दिवसांत शरण येण्याची मुदत देण्यात आली होती.

त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नितेश राणे हे 28 जानेवारीला न्यायालयासमोर हजर झाले.

नितेश राणे यांच्या वकीलाने राणे यांची बाजू कोर्टासमोर मांडत नियमित जामिनासाठी अर्ज केला. त्यावर गेल्या दोन दिवसांपासून न्यायालयात वकिलांचा युक्तिवाद पार पडला.

न्यायालयाबाहेर बाचाबाची

जामीन फेटाळल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर निलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर पोलिसांनी काही वेळ नितेश राणे यांना थांबवण्यास सांगितलं. आम्ही वरिष्ठांशी बोलत आहोत असं पोलिसांचं म्हणणं होतं.

यावेळी राणे समर्थकांची मोठी गर्दी न्यायालयाबाहेर जमली. नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांनी पोलिसांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. तुम्ही कोणत्या अधिकाराखाली आम्हाला थांबवत आहात असा प्रश्न पोलिसांना त्याठिकाणी विचारण्यात आला.

निलेश राणे

फोटो स्रोत, MUSHTAQ

सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून 10 दिवस संरक्षण दिल्याचंही निलेश राणे यांनी सांगितलं.

नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयानं दिलं अटकेपासून 10 दिवसांचं संरक्षण

संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं ट्विट करत म्हटलंय की, "सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राचे भाजप आमदार नितेश राणे यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले आहे.

"सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या महिन्यात दाखल झालेल्या प्रकरणात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ट्रायल कोर्टासमोर शरण जाण्याचे आणि नियमित जामीन घेण्याचे निर्देश त्यांना दिले आहेत."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

याआधी मुंबई उच्च न्यायालयानं नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीण अर्ज फेटाळला होता.

त्यावेळी संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे मुख्य आरोपी असल्याची माहिती राज्य सरकारने कोर्टाला दिली होती. तर माझ्यावर दाखल गुन्हा राजकीय षड़यंत्राचा भाग असल्याचा आरोप नितेश राणे यांनी कोर्टात केला होता.

काय आहे प्रकरण?

संतोष परब हे सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातले शिवसैनिक आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख होते.

18 डिसेंबरला दुचाकीवरून जात असताना आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता.

नितेश राणे, भाजप, शिवसेना, संतोष परब, सिंधुदुर्ग

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, नितेश राणे

एका गाडीनं आपल्याला आधी धडक मारली, त्यानंतर गाडीतून उतरलेल्या व्यक्तीनं चाकूनं हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोराने नीतेश राणेंना कळवायला पाहिजे, असा उल्लेख केल्याचं संतोष परब यांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

याप्रकरणी पोलीसांनी मुख्य आरोपी सचिन सातपुतेसह चार जणांना अटक केली. त्यानंतर नितेश राणे यांचीही पोलीसांनी चौकशी केली. पण नितेश यांनी आपल्यावरचे आरोप साफ नाकारले होते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)