विराट कोहली: अनुष्का शर्माने नवऱ्यासाठी लिहिले भावनिक पत्र

फोटो स्रोत, ANI
भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहलीने भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर याबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहेत.
दरम्यान, विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने यासंदर्भात विराट कोहलीला एक भावनिक पत्र लिहून आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
माजी कर्णधार विराट कोहलीने शनिवारी (15 जानेवारी) आपण भारतीय संघाचं कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली होती.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या टी-20 विश्वचषकापूर्वी त्याने भारतीय टी-20 संघाचं कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर दोनच महिन्यात त्याला एकदिवसीय संघाचं कर्णधारपदही सोडावं लागलं. त्याच्याऐवजी रोहित शर्माची वर्णी कर्णधारपदावर लावण्यात आली होती.
आता भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्व करतानाही विराट कोहली दिसणार नाही. म्हणजेच, पाच महिन्यात एक-एक करत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून विराट कोहली दूर झाला आहे.
या पार्श्वभूमीवर विराट कोहलीला पत्नी अनुष्का शर्माने एक पत्र लिहिलं. यामध्ये तिने 2014 च्या विराट कोहलीला कर्णधारपद मिळालेल्या प्रसंगावेळच्या आठवणी जाग्या केल्या.

फोटो स्रोत, ANI
पत्रात अनुष्का लिहिते, "मला अजूनही 2014 चा तो दिवस लक्षात आहे. त्यावेळी तुला कर्णधार बनवण्यात आल्याचं तू मला सांगितलं होतंस. त्यावेळी महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता."
"मला आठवतं, त्या दिवशी तू, धोनी आणि मी असं आपण तिघे गप्पा मारत होतो. मी मजेत म्हणाले, बघ तुझी दाढी आता लवकर पांढरी होऊ लागेल. त्यावरून आपण किती हसलो होतो."
'आव्हानं फक्त मैदानातच होती, असं नव्हे'
आपल्या पत्रात अनुष्का पुढे लिहिते, "कर्णधार म्हणून विराट कोहली आणि टीम इंडियाने जे प्राप्त केलं, त्यावर मला अभिमान आहे."

फोटो स्रोत, Ani
"त्या दिवसानंतर मी तुझी दाढी पांढरी होण्यासोबतच आणखी खूप काही पाहिलं. तुझ्या आजूबाजूला आणि तुझ्या व्यक्तिमत्वात झालेली सुधारणा पाहिली. आणि हो, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून तुझी आणि तुझ्या नेतृत्वाखाली संघाला मिळालेलं यश याचा मला गर्व आहे. पण तुझ्या व्यक्तिमत्वाबाबत तू जे यश मिळवलं, त्याचा मला जास्त अभिमान आहे."
आपल्या भावनिक पत्रात गेल्या 7 वर्षांत विराट कोहलीसमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचाही अनुष्काने उल्लेख केला.
ती लिहिते, "2014 मध्ये आपण किती लहान आणि साधे-भोळे होतो. तेव्हा आपला चांगुलपणा, सकारात्मक विचार आणि लक्ष्य आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी पुरेसं आहे, असं आपल्याला वाटायचं. जीवनात पुढे जाण्यासाठी या गोष्टी खरोखरच महत्त्वाच्या आहेत. पण आव्हानांचा सामना केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, हे सुद्धा तितकंच खरं."
अनुष्का पुढे लिहिते, "आपण तोंड दिलेल्या आव्हानांपैकी बहुतांश आव्हानं ही मैदानावरची नव्हतीच मुळी. पण हेच तर आयुष्य आहे. ते आपल्याला तावून-सुलाखून घेतं. पण माझ्या प्रिय विराट, मला तुझ्यावर खूप गर्व आहे. तू तुझ्या चांगुलपणाच्या आड कुणालाच येऊ दिलं नाहीस."

फोटो स्रोत, ANI
"जेव्हा विराट कोहली एखाद्या पराभवानंतर पाणावलेले डोळे घेऊन बसायचा, तेसुद्धा मी पाहिलं, पण तू कधी उमेद सोडली नाहीस," असं अनुष्का म्हणते.
तिने पत्रात लिहिलं, "तू ज्या प्रकारे संघाचं नेतृत्व केलं, ते एक उदाहरण बनलं आहे. शरिरातील संपूर्ण ऊर्जा समर्पित करून तू मैदानावर विजय मिळवायचा. कधी-कधी पराभव मिळायचा. त्यावेळी मी तुझ्या बाजूलाच बसलेली असायचे. तेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असायचे. अजूनही काही करता येऊ शकेल का, याचा विचार तू तेव्हा करत होतास.
'तू इतरांपेक्षा वेगळा'
आपल्या 400 शब्दांच्या लांबलचक पोस्टमध्ये अनुष्काने विराट कोहलीच्या अनेक वैशिष्ट्यांचा उल्लेख केला. विराट हा इतरांपेक्षा खूपच वेगळा असल्याचं तिने म्हटलं आहे.
ती लिहिते, "तू वेगळा आहेस. म्हणूनच प्रत्येकजण तुझ्याकडून तशीच अपेक्षा करतो. तू स्पष्टवक्ता आहेस. दिखाऊपणाला तू थारा देत नाहीस. तुझ्यातली हीच गोष्ट माझ्या आणि इतर अनेक चाहत्यांच्या नजरेत तुला महान बनवते. तुझ्या कृतीमागे तुझा चांगला उद्देश होता. प्रत्येक जण त्याच्यातील खरा अर्थ समजू शकणार नाही. पण तुला जवळून समजून घेण्याचा प्रयत्न करणारे लोकच अतिशय नशीबवान आहेत."
कमतरता लपवण्याचा प्रयत्न कधीच तू केला नाहीस
आपल्या पोस्टमध्ये अनुष्काने शेवटी लिहिलं, "तू परफेक्ट नाहीस. तुझ्यात काही कमतरताही आहेत. पण त्या लपवून ठेवण्याचा प्रयत्न तू कधी केलास? तू प्रत्येकवेळी योग्य आणि अवघड काम करण्यासाठी उभा राहायचा. पण वैयक्तिक लालसेपोटी कधीच काही केलं नाही, हे मला माहिती आहे. कारण जेव्हा एखादा व्यक्ती एखादी गोष्ट मजबुतीने पकडतो तेव्हा तो स्वतःला मर्यादेत ठेवत असतो. पण माझं प्रेम अमर्याद आहे, हे मला माहिती आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








