मुमताज महल : शाहजहानने आग्र्यामध्ये ताजमहाल नेमका कसा बांधला?

शाहजहान

फोटो स्रोत, WALKER AND CO

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

शाहजहानची उंची ही सर्वसाधारणपणे मध्यम होती, मात्र पिळदार शरीर आणि भारदस्त खांदे अशी शरीरयष्टी होती. शहजादा असेपर्यंत त्यांनी वडील जहाँगीर आणि आजोबा अकबर यांच्याप्रमाणे फक्त मिशी ठेवली होती. पण बादशाह बनल्यानंतर त्यांनी दाढी ठेवायला सुरुवात केली.

शाहजहान यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग मोगलांची शान आणि वैभव दाखवण्यासाठीच होता. शाहजहान यांचा स्वभाव वडील जहाँगीर यांच्यासारखा सतत बदणारा (मूड स्विंग) नव्हता. ते मितभाषी आणि विनम्र होते. कायम औपचारिकपणे बोलायचे.

"स्वतःवर नियंत्रण हा शाहजहान यांच्यातील सर्वात मोठा गुण होता. त्याची झलक दारुबाबतच्या त्यांच्या दृष्टीकोनावरून पाहायला मिळते. 24 व्या वर्षी त्यांनी सर्वप्रथम दारु सेवन केली. तीही त्यांच्या वडिलांनी बळजबरी केली म्हणून.

त्यानंतर पुढची सहा वर्ष ते अधून-मधून अशी कधीतरीच दारु प्यायले. 1620 मध्ये जेव्हा ते दक्षिणेच्या मोहिमेवर निघाले, तेव्हा त्यांनी पूर्णपणे दारू सोडली आणि त्यांच्याकडे असलेला दारुचा संपूर्ण साठा चंबळ नदीत फेकून दिला," एम्परर्स ऑफ द पीकॉक थ्रोन द सागा ऑफ द ग्रेट मुगल्स हे पुस्तक लिहिणारे अब्राहम इराली यांनी असं लिहिलं आहे.

मुमताज महल यांच्याप्रती समर्पित

शाहजहान एक रुढीवादी मुस्लीम असले तरी ते संत किंवा संन्याशी नव्हते. उंची राहणीमानावर त्यांचं वडील जहाँगीर यांच्याप्रमाणेच प्रेम होतं.

"राजकारणाशिवाय इतर ठिकाणी रमण्यासाठी शाहजहान संगीत आणि नृत्य यांची मदत घेत होते. विविध संगीत वाद्य आणि शेरो-शायरी ऐकणं ही त्यांची सवय होती. तेही चांगलं गात होते. त्यांच्याबरोबर कायम गाणाऱ्या आणि नाचणाऱ्या मुलींचा एक समूह त्यांच्या सोबत असायचा. त्यांना कंचन नावाने ओळखलं जात होतं" असं इटालियन इतिहासकार निकोलाओ मनूची यांनी लिहिलं आहे.

शाहजहान

फोटो स्रोत, WALKER AND CO.

तसं पाहता शाहजहान यांच्या अय्याशीची अनेक प्रकरणं प्रसिद्ध आहेत, मात्र जोपर्यंत त्यांची पहिली पत्नी मुमताज महल जीवंत होत्या तोपर्यंत शाहजहान पूर्णपणे त्यांच्याप्रती समर्पित होते. त्यांच्या इतर पत्नींनाही त्यांच्या जीवनामध्ये फारसं असं महत्त्वं नव्हतं.

"इतर महिलांप्रती शाहजहान यांच्या भावना मुमताज महलसाठी असलेल्या त्यांच्या भावनांच्या एक हजाराव्या भागाएवढ्याही नव्हत्या. महालात असो वा बाहेर, ते त्यांच्याशिवाय राहत नव्हते," असं शाहजहान यांच्या दरबारातील इतिहासकार इनायत खान यांनी 'शाहजहान नामा' या पुस्तकात लिहिलं आहे.

अखेरच्या क्षणांत मुमताज यांनी घेतलं वचन

मुमताज यांच्यावर शाहजहान यांचं प्रचंड प्रेम होतं. त्या खूप सुंदर तर होत्याच पण ज्याप्रमाणे जहाँगीर राजकारणाबाबत नूरजहाँ यांच्यावर अवलंबून होते, तसे शाहजहान मुमताज यांच्यावर अवलंबून होते. शाहजहान यांनी गादी सांभाळल्यानंतर चार महिन्यातच मुमताज यांचं निधन झालं, अन्यथा मोगल सिंहासनावर त्याचा खूप परिणाम दिसू शकला असता, असंही म्हटलं जातं.

"अखेरच्या क्षणी मुमताज खूप अशक्त झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी बादशहाकडून एक वचन घेतलं. ते म्हणजे ते इतर कोणत्याही महिलेबरोबर ते मुलं जन्माला घालणार नाहीत. त्यांनी म्हटलं की, मी स्वप्नात एक एवढा सुंदर महाल आणि बाग पाहिली जी जगात कुठेही नाही. तुम्ही माझ्या स्मरणार्थ तसाच एक मकबरा तयार करा," असं इनायत खान यांनी लिहिलं आहे.

मुमताज

फोटो स्रोत, WALKER AND CO.

मुमताज यांनी 17 जून, 1631 ला बुऱ्हानपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला, 14 व्या मुलाला जन्म देताना 30 तास त्या प्रसववेदना सहन करत होत्या.

त्यापूर्वी शाहजहाननं ईश्वरानं पत्नीला वाचवाचं म्हणून गरजवंतांना पैसे वाटले. सगळे प्रयत्न केल्यानांतरही वैद्य, हकीम त्यांना वाचवू शकले नाहीत.

शाहजहानची दाढी अचानक झाली पांढरी

इनायत खान यांच्या मते, "शाहजहान यांच्यावर मुमताज यांच्या निधनाचा खूप परिणाम झाला. ते दुःखात एवढे बुडालेले होते की, त्यानंतर आठवडाभर ते कक्षातून बाहेरही आले नाही आणि कुठल्याही राजकीय कामातही सहभागी झाले नाहीत. त्यांनी संगीत ऐकणं, गाणं आणि चांगली वस्त्रं परिधान करणं, हे सर्वकाही सोडलं. पुढे दोन वर्षांपर्यंत त्यांनी दर बुधवारी केवळ पांढरी वस्त्रं परिधान केली होती. कारण बुधवारीच मुमताज यांचं निधन झालं होते. सतत रडल्यान त्यांचे डोळे खराब होऊ लागले होते. त्यामुळं नाईलाजानं त्यांना चष्मा परिधान करावा लागला होता."

शाहजहान

फोटो स्रोत, WALKER AND CO.

"या घटनेपूर्वी त्यांच्या दाढी आणि मिशांमध्ये एखाद-दुसराच पांढरा केस आढळायचा. तो केसही ते हातानं उपटून टाकायचे. पण काही दिवसांतच त्यांची जवळपास एक तृतीयांश दाढी पांढरी झाली. एक वेळ अशीही आळी की त्यांनी गादी सोडण्याचा विचार केला. पण बादशहा असणं ही एक पवित्र जबाबदारी आहे, खासगी कारणामुळं ती सोडता येणार नाही, असा विचार त्यांनी नंतर केला."

मुमताज महल यांना तीनवेळा केलं दफन

मुमताज महल यांना बुऱ्हानपूरच्या तापी नदीच्या किनाऱ्यावर एका बागेत दफन करण्यात आलं. सहा महिन्यांनी त्यांचं पार्थिव तिथून काढून 15 वर्षीय शहजादे शाह शुजा यांच्या देखरेखीत 8 जानेवारी, 1632 ला त्यांना पुन्हा एकदा यमुनेच्या किनाऱ्यावर दफन करण्यात आलं. पण ते त्यांच्या विश्रामाचं अखेरचं स्थान नव्हतं.

त्याचठिकाणी शाहजहाननं त्यांचा मकबरा तयार केला. त्याला त्यांनी 'रउजा-ए-मुनव्वरा' असं नाव दिलं नंतर त्याला ताजमहाल म्हटलं जाऊ लागलं. मीर अब्दुल करीम आणि मकरमत खान यांना हा मकबरा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

मुमताज महल

फोटो स्रोत, PENGUIN VIKING

फोटो कॅप्शन, मुमताज महल

मुकम्मत खान जहांगीरच्या शासन काळात दक्षिण इराणच्या शिराज शहरातून भारतात आले होते. शाहजहान यांनी त्यांना बांधकाम मंत्री बनवलं होतं. 1641 मध्ये त्यांना दिल्लीचं गव्हर्नर बनवण्यात आलं. त्यांनाच शाहजहानाबाद या नव्या शहरात लाल किल्ला तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.

ताजमहाल 1560 च्या दशकात तयार करण्यात आलेल्या दिल्लीतील हुमायूँच्या मकबऱ्याप्रमाणे तयार करण्यात आला होता. त्यासाठी 42 एकर जमीन निवडण्यात आली होती. त्याच्या 139 फूट उंच असेल्या चारही मिनारांवर सर्वात वर एक छत्री बसवण्यात आली होती.

मकरानाहून आणलं संगमरवर

ताजमहाल तयार करण्याच्या निर्णयानंतर शाहजहान समोरचं पहिलं आव्हान या मकबऱ्यासाठी जागा शोधणं हे होतं.

ताजमहालवर पुस्तक लिहिणारे डायना आणि मायकल प्रेस्टन यांनी याबाबत वर्णन केलं आहे. "शाहजहानची पहिली अट होती की, ताजमहालसाठीची जागा शांत आणि आग्रा शहरापासून दूर असावी. तर दुसरी अट अशी होती, की ही वास्तू एवढी मोठी असावी की ती दूरूनच दिसू शकेल, आणि तिसरी अट म्हणजे ती यमुना नदीच्या जवळ असावी म्हणजे यातील बागांसाठी पाणी कमी पडणार नाही. शाहजहान यांची अशीही इच्छा होती, की ताजमहाल आग्र्यामधील किल्ल्यावरून दिसावा ज्याठिकाणी ते राहत होते. त्यासाठी शाहजहाननं आग्र्याच्या किल्ल्यापासून दीड किलोमीटर अंतरावरची जागा निवडली."

ताजमहाल

फोटो स्रोत, WALKER AND CO.

ताजमहाल तयार करण्याचं काम जानेवारी 1632 मध्ये सुरू झालं होतं. तोपर्यंत शाहजहान दक्षिणेमध्येच होते.

"सर्वात आधी हा परिसर स्वच्छ करून जमीन सारखी करण्यात आली. त्यानंतर हजारो मजुरांनी दिवस-रात्र काम करत यासाठी खोलवर पायाभरणीसाठी खोदकाम केलं. जवळून वाहणाऱ्या यमुना नदीचं पाणी जमिनीतून स्त्राव होऊन येऊ नये आणि जून तसंच सप्टेंबरमध्ये यमुनेला येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळं ताजमहालला नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात आली.

"त्यानंतर आधी 970 फूट लांब आणि 364 फूट रुंद बांधकाम करण्यात आलं आणि नंतर त्यावर मकबरा तयार करण्यात आला," असं त्यावेळी भारताच्या प्रवासावर आलेले पीटर मंडी यांनी त्यांच्या 'ट्रॅव्हल्स ऑफ पीटर मंडी इन यूरोप अँड एशिया' मध्ये लिहिलं आहे.

ताजमहाल

फोटो स्रोत, WALKER AND CO.

यासाठी वापरण्यात आलेलं संगमरवर 200 मैल लांब असलेल्या मकरानाहून आणण्यात आलं. "ताजमहालसाठी वापरण्यात आलेले संगमरवराचे काही तुकडे एवढे मोठे होते की, त्यांना बैल आणि लांब शिंगं असलेल्या रेड्यांच्या मदतीनं आगऱ्यापर्यंत आणलं होतं. ते खास प्रकारे तयार केलेल्या बैलगाड्यांमधून आणण्यात आलं त्या बैलगाड्या जवळपास 25 ते 30 जनावरं ओढत होती," असं पोर्तुगालचे पर्यटक सिबेस्टियाओ मेनरीक यांनी लिहिलं आहे.

मजुरांचे हात कापल्याचा किस्सा खरा नाही

"ताजमहाल तयार करण्यासाठी बांबू आणि लाकडांच्या फळ्या आणि विटांच्या मदतीनं मचाण तयार करण्यात आली होती. काम पूर्ण झाल्यानंतर शाहजहानला असं सांगण्यात आलं की, विटांची ही मचाणं पाडायला जवळपास पाच वर्षे लागतील. त्यावर शाहजहानने पाडलेल्या सर्व विटा मजुरांच्या असतील, असा आदेश दिला," ताजमहाल पॅशन अँड जीनियस अॅट द हार्ट ऑफ द मुगल एम्पायर' पुस्तकाचे लेखक डायना आणि मायकल प्रेस्टन यांनी तसं लिहिलं आहे.

"त्याचा परिणाम म्हणजे त्यांनी लगेचच एका रात्रीत ती मचाणं पाडली. ताजमहाल पूर्ण बनण्यापूर्वी इतरांना दिसू नये म्हणून हे मचाण तयार केलं होतं, या सर्व अख्यायिका आहेत. तसंच एका व्यक्तीनं बाहेरून ताजमहाल तयार होताना पाहिला तर त्याचे डोळे फोडण्यात आले, हे देखील खरं नाही."

शाहजहान

फोटो स्रोत, PENGUIN VIKING

ताजमहालमधील प्रत्येक गाईड अजूनही जगातील हे आठवं आश्चर्य पुन्हा तयार करता येऊ नये म्हणून, शाहजहाननं मजुरांचे हात कापल्याचा किस्सा आवर्जून सांगतात. पण या घटनेचे काहीही पुरावे नाहीत. तसंच इतिहासकारांनीही तसा उल्लेख केलेला नाही.

"ताजमहाल तयार करणारे बहुतांश मजूर कन्नौजचे हिंदु होते. फुलांचं नक्षीकाम करणाऱ्यांना पोखरामधून बोलावण्यात आलं होतं. काश्मीरमधील रामलालला बागेची जबाबदारी देण्यात आली होती," असं शाहजहानच्या 'शाहजहाँ द राइज अँड फॉल ऑफ द मुगल एम्परर' हे चरित्र लिहिणाऱ्या फर्गुस निकोल यांनी लिहिलं आहे.

कुराणातील आयतं आणि फुलांचं नक्षीकाम

अमानत खान यांना ताजमहालवर कुराणाच्या आयतांचं नक्षीकाम करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्या एकाच व्यक्तीला शाहजहाननं ताजमहालवर त्यांचं नाव लिहिण्याची परवानगी दिली होती.

ताजमहाल

फोटो स्रोत, WALKER AND CO.

कुराणातील आयतांशिवाय फुलांचं नक्षीकामही अत्यंत सुंदर होतं. "ताजमहालाच्या भींतीवरील काही फुलं एवढी खरी वाटतात की, तुम्ही आपोआप ती खरी तर नाही हे तपासण्यासाठी पुढं सरकता असं," रशियन लेखिका हेलेना ब्लावत्सकी यांनी 200 वर्षानंतर लिहिलं होतं.

बहुमूल्य रत्नांची सजावट

ताजमहालच्या इमारतीमध्ये 40 वेगवेगळी रत्नं लावण्यात आली होती. शाहजहाननं आशियातील वेगवेगळ्या भागांतून ती मागवली होती.

ताजमहाल

फोटो स्रोत, WALKER AND CO.

"हिरव्या रंगाचं रत्न जेड हे सिल्क रूटमधून काशगर, चीनमधून आणलं होतं. निळ्या रंगाचे रत्न लॅपीज लजुली अफगाणिस्तानच्या खाणींमधून मागवलं होतं. फिरोजा तिबेटमधून, मुंगा अरब आणि लाल सागरातून मागवण्यात आले होते. पिवळे अंबर बर्मा आणि माणिक श्रीलंकेतून आणले होते. लहसुनिया हे रत्न इजिप्तच्या नाईल खोऱ्यातून मागवलं होतं. नीलम अशुभ समजलं जातं, त्यामुळं त्याचा वापर अगदीच किंचित करण्यात आला होता," असं डायना आणि मायकल प्रेस्टन यांनी लिहिलं आहे.

चार कोटींचा खर्च

शाहजहानच्या काळातील इतिहासकार अब्दुल हमीद लाहोरी यांनी ताजमहाल तयार करण्यासाठी 50 लाख रुपये लागले असं सांगितलं. तर इतर इतिहासकारांच्या मते, ही किंमत केवळ मजुरांना दिलेल्या वेतनाची आहे. त्यात वास्तूसाठी लागलेल्या साहित्याच्या खर्चाचा समावेश नाही.

ताजमहाल

फोटो स्रोत, WALKER AND CO

नंतर समोर आलेल्या दस्तावेजांच्या आधारे काही इतिहासकारांनी ताजमहाल तयार करण्यासाठी 4 कोटी खर्च आल्याचा अंदाज बांधला आहे. यासाठी लागलेला संपूर्ण खर्च सरकारी खजिन्यातून आणि आगरा प्रांताच्या खजिन्यातून देण्यात आला. आगामी काळात ताज महलच्या देखरेखीसाठी आगऱ्याच्या आसपासच्या तीस गावांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर करावा असं शाहजहाननं सांगितलं होतं.

मुमताज महलच्या जवळच शाहजहानला केलं दफन

1659 मध्ये शाहजहानचा मुलगा औरंगजेबनं पित्याला गादीवरून पायउतार करत कैद केलं, त्यानंतर काही दिवसांत ते आजारी पडले. त्यांना जेव्हा वाटलं की, त्यांच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे, तेव्हा त्यांनी अशा ठिकाणी ठेवण्याची विनंती केली, जिथून कायम ताजमहाल पाहता येत होता.

मुमताज आणि शाहजहानची कबर

फोटो स्रोत, WALKER AND CO

फोटो कॅप्शन, मुमताज आणि शाहजहानची कबर

त्याचठिकाणी 21 जानेवारी 1666 रोजी शाहजहान यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्यांची मुलगी जहान आरा त्यांच्याबरोबर होती. चंदनापासून तयार केलेल्या शवपेटीत त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं.

राजकीय इतमामात पित्याचा अंत्यसंस्कार व्हावा अशी मुलीची इच्छा होती. पण औरंगजेबानं याला परवानगी दिली नाही. त्यांनी अगदी साधेपणानं कुराणाच्या आयतांच्या उच्चारणात ताजमहालमध्ये पत्नी मुमताज महलच्या बाजुला दफन करण्यात आलं.

इंग्रजांच्या काळात गेली रया

मुघलांच्या पतनानंतर 1803 मध्ये ब्रिटिश जनरल लेकनं आगरा याठिकाणी कब्जा केला. त्यानंतर ताजमहालाच्या भींतींवरील मौल्यवान रत्नं, गालिचे आणि भिंतींवरील शोभेच्या वस्तू तिथून गायब होऊ लागल्या.

ब्रिटिशांनी ताजमहालच्या आत असलेली मशीद भाड्यानं दिली आणि त्याच्या चारही बाजुंना हनिमून कॉटेज तयार केले. मकबऱ्याच्या चबुतऱ्यावर सैनिक बँड वाजवला जाऊ लागला आणि ताजमहालच्या बागेमध्ये सहली आणि पार्ट्या होऊ लागल्या.

या दरम्यान अशी अफवा उडाली की, 1830 दरम्यान ब्रिटीश गव्हर्नर विल्यम बँटिंक यांनी ताजमहाल पाडून त्याचं संगमरवर लिलावात विकण्याचं ठरवलं आहे.

ताजमहाल

फोटो स्रोत, RAGHU RAI

1857 च्या क्रांतीदरम्यान ब्रिटिश सैनिकांनी काही मुघलांच्या इमारतींचं नुकसान केलं. त्यापैकी एक होती, मुमताज महल यांचे पिता आसफ खान यांचा महल. पण ताज महल मात्र सुरक्षित राहिला. विसाव्या शकताच्या सुरुवातीला ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड कर्झननं ताज महलाच्या दुरुस्तीमध्ये रस दाखवला.

1965 मध्ये भारत पाकिस्तानच्या युद्धादरम्यान जवळच्या विमानतळावरून पाकिस्तानच्या हल्ल्याची शक्यता पाहता, भारत सरकारनं ताजमहाल झाकण्यासाठी काळ्या रंगाचं विशाल कापड तयार केलं. आकाशातून चंद्र चांदण्यांच्या प्रकाशात ताजमहाल दिसू नये, म्हणून तो झाकण्यात आला होता.

ते कापड 1995 पर्यंत सुरक्षित होतं. पण उंदरांनी त्याला अनेक ठिकाणी कुरतडलं त्यामुळं नंतर ते नष्ट करण्यात आलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)