ओमिक्रॉन कोरोना लस : 12 ते 15 वयोगटातल्या मुलांचं आजपासून लसीकरण, कोणती लस देणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, राघवेंद्र रॉय
- Role, बीबीसी प्रतिनिधी
बुधवारी 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगतल्या मुलांचं लसीकरण सुरू करणार असल्याचं सरकारने जाहीर केलंय. तर 60 वर्षांवरच्या सरसकट सर्वांना आता बूस्टर डोस घेता येणार आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी याविषयीची घोषणा केलीय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
आतापर्यंत सहव्याधी (Co-morbidity) असणाऱ्या 60 वर्षांवरील नागरिकांनाच बूस्टर डोस घेता येत होता. आता मात्र सहव्याधींची अट काढण्यात आली असून 60 वर्षांवरील सरसकट सगळ्यांना बूस्टर डोस घेता येईल.
12 ते 14 वयोगटाचं लसीकरण
सरकारने 12 ते 14 वयोगटातलं लसीकरण सुरू करण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे 2008, 2009 आणि 2010 मध्ये जन्म झालेल्या मुलांनाही आता कोव्हिड प्रतिबंधक लशीचा डोस घेता येईल.
या वयोगटाच्या लसीकरणासाठी वेगळी लस वापरण्यात येणार आहे. हैदराबादच्या बायोलॉजिकल इव्हान्स कंपनीने तयार केलेली 'कॉर्बेवॅक्स' (Corbevax) लस या वयोगटाला देण्यात येईल.
भारत सरकारने कोर्बेवॅक्स लशीला मान्यता मिळण्यापूर्वीच या लशीच्या डोसेससाठीची ऑर्डर नोंदवली होतीय . स्पाईक प्रोटीन वापरून ही लस तयार करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात औषध नियामकांकडून कोर्बेवॅक्स लशीला 12 ते 18 वयोगटासाठीच्या तातडीच्या वापरासाठीची मान्यता देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सप्टेंबर 2021मध्ये बायोलॉजिकल ई कंपनीला क्लिनिकल ट्रायलसाठीची परवानगी देण्यात आली.
या कोर्बेवॅक्स लशीचे दोन डोस घ्यावे लागतील. पहिला डोस घेतल्यानंतर मुलांना 28 दिवसांनतर या लशीचा दुसरा डोस घ्यावा लागेल.
15 ते 18 वयोगटाल्या मुलांचं लसीकरण यापूर्वीच 3 जानेवारीपासून सुरू झालेलं आहे.
तर 10 जानेवारी 2022 पासून आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी तसंच 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लशीचा बूस्टर डोस (तिसरा डोस) देण्यात येतोय.
कसं होणार लहान मुलांचं लसीकरण?
15 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांचं लसीकरण करत असताना केवळ भारत बायोटेक या कंपनीने बनवलेली कोव्हॅक्सीन हीच लस त्यांना देण्यात येतेय.
लस मिळवण्यासाठी 15 पेक्षा अधिक वयाच्या मुलांनी आधीच्याच Co-Win वेबसाईटवर रजिस्टर करायचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2007 किंवा त्यापेक्षा आधी जन्म झालेल्या किशोरवयीन मुला-मुलींना याचा लाभ घेता येईल.
त्यासाठी Co-Win वेबसाईटवर आधीपासून वापरलेल्या किंवा नव्या मोबाईल नंबरचा वापर केला जाऊ शकतो.
ज्यांना शक्य नाही, ते व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करू शकतात.
डॉ. सुनिला गर्ग या इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव अँड सोशल मेडिसीन संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
त्या लॅन्सेट कोव्हिड-19 कमिशन इंडिया टास्क फोर्सच्या सदस्यही आहेत.
त्या म्हणतात, "मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कारण या वयोगटातील मुलं प्रौढ होण्याच्या मार्गावरच असतात. त्यामुळे प्रौढांना दिल्या जाणाऱ्या लशीचा डोस त्यांना दिला जाऊ शकतो.
कोव्हॅक्सिन लस कशामुळे?
कोव्हॅक्सिन लशीचे निर्माते भारत बायोटेकने याबाबत बोलताना म्हटलं, "पहिल्या टप्प्यात कोव्हॅक्सिन लस लहान मुलांसाठी सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं आढळून आलं."
भारत बायोटेकची चाचणी जून 2021 ते सप्टेंबर 2021 दरम्यान 525 लहान मुलांवर करण्यात आली.
ही चाचणी तीन वयोगटांमध्ये विभाजित करण्यात आली होती. पहिला गट 12 ते 18, दुसरा गट 6 ते 12 तर तिसरा गट 2 ते 6 वर्षे वयोगटाचा होता.
या चाचणीतून मिळालेली माहिती सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनला ऑक्टोबर 2021 मध्ये देण्यात आली.
नुकतीच ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया यांनीही या लशीच्या 12 ते 18 वयोगटाकरिता वापरासाठी मंजुरी दिली.
या चाचणीदरम्यान मुलांवर कोणताच प्रतिकूल परिणाम आढळून आला नाही. 374 मुलांमध्ये सौम्य स्वरूपात काही लक्षणं दिसून आली. पण त्यापैकी 78.6 टक्के मुलांची तब्येत एका दिवसात ठणठणीत बरी झाली.
इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी होणारी वेदना हेच प्रमुख लक्षणं बहुतांश जणांमध्ये आढळून आलं.
भारत बायोटेकने म्हटलं, "कोव्हॅक्सिन विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आली आहे. प्रौढ आणि मुले यांना समान लस देण्यात येऊ शकते."
ओमिक्रॉनच्या भीतीने निर्णय घेतला?
सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यांच्या मते, "ओमिक्रॉनमुळे लहान मुलांना धोका वाढलेला नाही. जितका धोका मुलांना आधीपासून होता, तितकाच अजूनही आहे. त्यामुळे हा निर्णय ओमिक्रॉनशी जोडून पाहू नये."
डॉ. लहरिया म्हणतात, "मुलांमध्ये गंभीर आजार होण्याचं प्रमाण मुळातच कमी असतं. पण लहान मुलांकडून इतरांना होणारा संसर्ग रोखणं महत्त्वाचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images /MENAHEM KAHANA
ते सांगतात, "मुलांना लस देण्याबाबत संपूर्ण सहमती नव्हती. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना कधीच लस दिली जाणार नाही. कोणत्या वयाच्या मुलांना प्राथमिकता द्यावी, हाच प्रमुख प्रश्न होता."
डॉ. लहरिया यांच्या मते, "प्रौढांचं लसीकरण यालाच सर्वाधिक प्राधान्य आहे. मुलांमध्ये 12 ते 17 वयाची मुले हायरिस्कमध्ये असल्याने त्यांना लस देता येऊ शकते."
तर डॉ. सुनीला गर्ग यांच्या मते, "ओमिक्रॉन व्हेरियंट आल्यापासून हे संपूर्ण प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलं आहे."
लहान मुलांना लस दिली पाहिजे, असं लोक म्हणत होते. पण हा निर्णय घेतल्यानंतर काही लोकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. 80 च्या दशकातही लसीकरण अभियानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात लोकांनी उदासीनता दर्शवली होती. तेच यावेळीही पुन्हा दिसून येतं."
त्या म्हणतात, "आधीपासूनच व्याधींनी ग्रस्त असलेल्या मुलांसाठी लस वरदान ठरू शकते. नुकत्याच आलेल्या राष्ट्रीय पोषण सर्वेक्षणात मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचं दिसून येतं. 100 पैकी 4 मुलांमध्ये ही समस्या आहे."
आता पुढे काय?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आगामी काळात 15 पेक्षा कमी वयाच्या मुलांचंही लसीकरण सुरू केलं जाऊ शकतं.
डॉ. सुनीला गर्ग म्हणतात, "आता 15 पेक्षा कमी वयाच्या मुलांच्या लसीकरणाबाबतही विचार करायला हवा. 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना लस देता येऊ शकते."
डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणतात, "आगामी काळात नेझल व्हॅक्सीन येणार आहे. ती मुलांना आजारापसोबतच संसर्ग पसरवण्यापासूनही वाचवेल. काही देशांनी 12 पेक्षा कमी वयाच्या मुलांनाही लस देणं सुरू केलं आहे. बहुतांश देशांमध्ये मुलांचं लसीकरण अजूनही सुरू झालेलं नाही. पण बहुतांश देश सध्या तरी 12 ते 17 वयोगटातील मुलांच्या लसीकरणालाच प्राधान्य देत आहेत. देशातील परिस्थिती, प्रक्रिया यांवरही बरंच काही अवलंबून असू शकतं."
डॉ. सुनिला गर्ग यांच्या मते, झायकोव्ह-डी, कोर्बेव्हॅक्स आणि नेझल व्हॅक्सीन आल्यानंतर 15 वर्षांच्या खालील वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत विचार करण्यास हरकत नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








