महाड: महिला सरपंचाची हत्या आणि विवस्त्रावस्थेत आढळला मृतदेह, त्या दिवशी नेमकं काय झालं?

घटनास्थळ

फोटो स्रोत, Mahad Police

फोटो कॅप्शन, घटनास्थळ
    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी, महाडहून

मुलाचे लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले होते. घरात कामाची लगबग सुरू होती, पण आपल्या मुलाला बोहल्यावर चढल्याचे पाहायला मिळाले नाही.

19 फेब्रुवारी रोजी घरात लग्न होतं पण त्याच्या काही दिवस आधी म्हणजेच 27 डिसेंबरला महाड तालुक्यातील एका गावच्या महिला सरपंचाचा मृतदेह रस्त्यालगतच्या झाडीत विवस्त्रावस्थेत आढळला.

28 डिसेंबर रोजी ही बातमी माध्यमांमध्ये आली. घटना घडून केवळ एकच दिवस झाला असल्याने या गावात नेमकं काय घडलं याची कल्पना बाहेरच्या जगाला नव्हती. ही घटना कशी घडली, त्या दिवशी काय झालं, या पाठीमागे काय कारण होतं हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीची टीम 29 डिसेंबर रोजी पुण्याहून महाडकडे रवाना झाली.

महाड पोलिसांनी त्या दिवशी काय घडलं याचा घटनाक्रम उलगडून सांगितला.

त्या दिवशी काय घडलं?

48 वर्षीय महिला सरपंच दुपारी 12 वाजता जळणासाठी लाकडं आणण्यासाठी बाहेर पडल्या. त्या वेळी त्यांची आई देखील त्यांच्यासोबत होती.

काही काळासाठी दोघी बरोबर होत्या. सरपण नेण्यासाठी येणाऱ्या गाडीसोबत येते असं सांगून पीडितेनी आईला परत पाठवून दिले होते. त्यानंतर त्या एकट्याच सरपण गोळा करण्यासाठी गेल्या.

दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृतदेह विवस्त्रावस्थेत गावातील एका व्यक्तीला रस्त्याच्या कडेला आढळून आला होता. त्या व्यक्तीने पोलीस पाटलांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला.

पोलिसांना काय दिसले?

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांच्या आठ टीम तयार करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी सात संशयितांची तपासणी देखील केली होती.

पीडितेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी महाड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला होता. त्यानंतर पुढे पोस्ट मॉर्टमसाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला.

महिला शोषण, लैंगिक अत्याचार, सुरक्षा

तपासादरम्यान पोलिसांनी डॉग स्कॉडची मदत घेतली. त्याचबरोबर घटनास्थळावरचे फिंगरप्रिंट देखील घेतले होते.

संशयितांनी दिलेल्या जबाबांवरुन पोलिसांना अंदाज आला की हत्या कुणी केली. पोलिसांनी 30 वर्षीय अमीर जाधव याला उर्वरित संशयितांपासून बाजूला केले आणि त्याची कसून जबाब घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. प्रथमदर्शनी पुराव्यांनुसार पोलिसांनी त्याच्यावर हत्येचा आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.

आरोपी अमीर जाधव हा मुंबईत एके ठिकाणी स्वयंपाक्याचे काम करतो. लॉकडाऊननंतर तो गावात आला. तो पीडितेचा नातेवाईक आणि शेजारी आहे. अमीर आणि पीडिता यांच्यात पूर्ववैमनस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सरपण आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पीडितेवर लाकडाच्या ओंडक्याने आघात केला. त्यानंतर त्याने त्यांच्यावर बलात्कार केला अशी शक्यता आहे. आपले कृत्य उघड होऊ नये म्हणून त्याने बेशुद्धावस्थेतील पीडितेची दगडाच्या सहाय्याने हत्या केली. त्याने त्यांचा मृतदेह फरफटत झाडीत नेला आणि तिथून तो पसार झाला, असं पोलिसांनी सांगितले.

सह पोलीस अधीक्षक निलेश तांबे

फोटो स्रोत, Rahul Gaikwad/BBC

फोटो कॅप्शन, सह पोलीस अधीक्षक निलेश तांबे

महाडचे सह पोलीस अधिक्षक निलेश तांबे म्हणाले, "आरोपी अमीर जाधवला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. अमीर हा मृत महिलेचा नातेवाईक आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पूर्व वैमनस्यातून खून झाल्याचे समोर आले आहे.

"आरोपीने महिलेला लाकडी फाट्याने मारले तसेच रस्त्यापासून आत नेऊन दगडाने देखील मारल्याचे समोर आले आहे. आरोपीवर बलात्काराचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर त्याबाबतची अधिक स्पष्टता येऊ शकेल," तांबे यांनी सांगितले.

गावावर शोककळा

हे गाव महाड तालुक्यात आहे. या गावात अवघी 20 घरे आहेत. गावातील तरुण कामानिमित्त मुंबई आणि इतर ठिकाणी असल्याने गावातील बहुतांश लोक हे वयोवृद्ध आहेत. गावातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती आहे.

मृत महिलेचा मुलगा मुंबईत राहतो. त्याचं 19 फेब्रुवारी रोजी लग्न होतं पण त्याआधी ही घटना घडल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

घटनेचे तीव्र पडसाद

या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. सोशल माध्यमांवर अनेकांनी या घटनेबाबत अस्वस्थता व्यक्त केली आहे.

हत्येची घटना समोर आल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी रात्री उशिरा या गावाला भेट दिली.

त्यांनी पोलिसांच्या तपासाची देखील माहिती घेतली होती. त्यावेळी माध्यमांशी बोलताना आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येईल असं त्या म्हणाल्या होत्या. तसेच सरकारकडून चांगले वकील देखील नेमण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील बुधवारी गावाला भेट दिली. या प्रकरणात आणखी आरोपी असतील असा संशय त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)